प्लेगची महामारी पुन्हा येणार ?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

जंगलातील ससा खाल्ल्याने ब्यूबोनीक प्लेग या भयंकर रोगाची लागण झाली आहे.

हाँग-काँग : चीनच्या मंगोलिया प्रांतातील एका शिकाऱ्याला ससा खाणे महाग पडले आहे. जंगलातील ससा खाल्ल्याने ब्यूबोनीक प्लेग या भयंकर रोगाची लागण झाली आहे. ही माहिती तेथील स्थानिक आरोग्य विभागाने दिली आहे. 

मंगोलिया प्रांतातील हुडे काउंटी येथे शिकारीसाठी गेलेल्या शिकाऱ्याने एका सस्याची शिकार केली आणि स्वत:च तो ससा खाल्ला देखील. यानंतर काही दिवसांतच त्याची प्रकृती बिघडल्याने तो डॅाक्टरांकडे गेला असता, त्याला ब्युबोनीक प्लेग झाल्याचे निदान तेथील डॅाक्टरांनी केले. ब्यूबोनीक प्लेग हा एक दुर्मिळ आजार असून शक्यतो मनुष्यांमध्ये हा रोग दिसून येत नाही. ब्यूबॉनिक प्लेग हा केवळ संक्रमित पिसू चावल्यास किंवा ज्या प्राण्यांना हा रोग झाला आहे त्यांच्या जास्त संपर्कात आल्यनेच होत असल्याचे जागतिक आरोग्य संस्थेने सांगितले आहे. 

प्लेग एक महामारी

प्लेग हा एक भयंकर रोग म्हणून अगदी पूर्वीपासून प्रचलित आहे. उंदरामधून आलेल्या या रोगाचे जगभरात अनेक बळी याआधी गेले आहेत. इतिहासकारांच्या मते युरोपमध्ये 14 व्या शतकात तब्बल 5 कोटीच्या आसपास लोग प्लेगमुळे दगावल्याचे समोर आले होते. भारतात देखील इंग्रजांची सत्ता असताना प्लेगने थैमान घातले होते. त्यानंतर 1994 साली देखील भारतातील काही प्रदेशात अनेकांना प्लेगची लागण झाली होती. 26 अॅागस्ट, 1994 ते 18 अॅाक्टोबर, 1994 या काळात 693 लोकांना प्लगेची लागण झाली होती. ज्यात जवळपास 56 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. सध्याच्या काळात अमेरिकेत प्लेगचे प्रमाण अधिक असून जागतिक आरोग्य संस्थेने दिलेल्या माहितीनुसार दर वर्षी किमान 7 अमेरिकी व्यक्तींना प्लेगची लागण होत असते. प्लेग हा औषधांनी बरा होत असला तरी, त्याला एक भयंकर रोग म्हणूनच ओळखले जाते. 

web title : Will the plague epidemic come again


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will the plague epidemic come again