Winter Crisis : थंडीपासून बचावासाठी शहरे सोडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Winter Crisis Ukraine

Winter Crisis : थंडीपासून बचावासाठी शहरे सोडा

किव्ह : रशियाच्या हल्ल्यांमुळे युक्रेनमधील अनेक शहरांमधील इमारती मोडकळीस आल्या असल्याने येथील नागरिकांसमोर निवाऱ्याचा प्रश्‍न असतानाच आता वाढत्या थंडीचा सामना या लोकांना करावा लागत आहे. खेरसन आणि इतर काही शहरांमधील इमारतींची स्थिती बिकट असल्याने या शहरांमधील नागरिकांनी थंडीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी काही काळासाठी इतर शहरांमध्ये स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन युक्रेन सरकारने केले आहे.

रशियाने किव्हसह अनेक शहरांवर हवाई हल्ल्यांसह तोफगोळ्यांचा मारा करत अनेक उंच निवासी इमारतींवरही बाँबचा मारा केला आहे. त्यामुळे या इमारतींमधील अनेक नागरिकांना छावण्यांमध्ये, शाळांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. युक्रेनच्या वीज केंद्रांवरही हल्ले होत असल्याने देशाचा सुमारे निम्मा वीजपुरवठा अनियमित झाला आहे. हिवाळा सुरु झाल्याने येथे थंडी वाढत आहे.

युक्रेनने खेरसन, मायकोलेव्ह आणि इतर काही भागाचा ताबा रशियाकडून मिळविला असला तरी रशियन सैनिकांनी येथे प्रचंड नुकसान केले आहे. त्यामुळे या शहरांमधील इमारती नागरिकांचे थंडीपासून संरक्षण करण्यास सक्षम नाहीत. तीव्र थंडीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी नागरिकांनी मध्य आणि पश्‍चिमेकडील इतर शहरांमध्ये जावे, त्यांच्या प्रवासाची सर्व सोय केली जाईल, असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे.

थंडीपासून पुरेसा बचाव करण्यास घर नसल्याने आणि वीजही नसल्याने थंडीचा सामना कसा करायचा, याची चिंता सामान्य नागरिकांना भेडसावत असल्याचे सूत्रांनी सांगितले. युक्रेनमधील अनेक शहरांमध्ये पाणी पुरवठाही विस्कळीत झाला असल्याने नागरिकांना सरकारतर्फे पाण्याचे कॅन पुरविण्यात येत आहेत.

झॅपोरिझ्झियामध्ये बाँबस्फोट

युरोपमधील सर्वांत मोठा अणुप्रकल्प असलेल्या युक्रेनमधील झॅपोरिझ्झिया प्रकल्पाजवळ आज बाराहून अधिक शक्तीशाली बाँबस्फोट झाले. या प्रकल्पावर सध्या रशियाचा ताबा आहे. प्रकल्पाला धोका निर्माण झाला असल्याने या भागातील युद्ध तातडीने थांबवावे, असे आवाहन आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने केले आहे.