ट्रम्प यांना विषारी पत्र पाठविणाऱ्या महिलेस अटक; यापूर्वीही घडल्या आहेत अशा घटना

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 21 September 2020

संबंधित पाकीट ट्रम्प यांच्या नावे व्हाइट हाउसमध्ये गेल्या आठवड्यात आले होते.

वॉशिंग्टन, ता. २१ (पीटीआय) ः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने व्हाइट हाउसमध्ये आलेल्या पाकिटात ‘रिसिन’ हा विषारी पदार्थ आढळल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. हे पाकिट पाठविणाऱ्या संशयित महिलेला अमेरिका-कॅनडा सीमेवर अटक केल्याची माहिती विधी व कायदे संचालनालयाच्या तीन अधिकाऱ्यांनी रविवारी (ता. २०) दिली.

संबंधित पाकीट ट्रम्प यांच्या नावे व्हाइट हाउसमध्ये गेल्या आठवड्यात आले होते. ते ट्रम्प यांच्यापर्यंत पोचण्यापूर्वी तपासणी झाली असता त्यात विषारी पदार्थ असल्याचे उघडकीस आले. हे पाकीट कॅनडाहून आले होते, असे रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिस दलाच्या वतीने सांगण्यात आले. व्हाइट हाउस आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने आलेली पत्र जेथे तपासतात त्या सरकारी केंद्रावर या पाकिटाची दोनदा तपासणी करण्यात आली. प्राथमिक तपासानुसार त्यात ‘रिसिन’ नावाचा विषारी पदार्थ असल्याचे निदर्शनास आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. एरंडाच्या बियांमधून ‘रिसिन’ मिळते.

अमेरिकेशी मैत्री कराल तर जीवे मारु; चीनने तैवानच्या राष्ट्रपतींना दिली उघड धमकी

पत्रांमधून ‘रिसिन’ पाठवून अमेरिकेचे अध्यक्ष व अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याच्या यापूर्वी घडलेल्या घटना

२०१८ ः ट्रम्प व त्यांच्या प्रशासनाच्या नावे पाकिटातून विषारी पदार्थ पाठविल्याची माहिती अमेरिकी नौदलाच्या वरिष्ठाने दिली होती.
२०१४ ः तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा व अन्य अधिकाऱ्यांच्या नावे पाठविलेल्या पत्रावर विषारी भुकटी पसरलेली होती. हे कृत्य करणाऱ्या मिसिसिपी येथील आरोपीला २५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.

विषारी रिसिनचे घातक परिणाम

एरंडाच्या बियांमध्ये रिसिन हा विषारी पदार्थ मिळतो. याचा वापर दहशतवादी हल्ल्यांतही केला जातो. भुकटी, गोळ्या किंवा ॲसिडच्या रूपात त्याचा उपयोग केला जातो. कोणत्याही मार्गाने हे विष जर शरीरात गेले तर त्या व्यक्तीला उलट्या होऊ लागतात. पोट व आतड्यांत अंतर्गत रक्तस्राव होतो. त्यामुळे फुफ्फुस, मूत्रपिंड निकामी होऊन मृत्यू येण्याची शक्यता असते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman arrested for sending poisonous letter to Trump