HIVतून पूर्णपणे बरा झालेल्या जगातील पहिल्या व्यक्तीचा कँसरमुळे मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 30 September 2020

एचआयव्हीतून बरा झालेल्या जगातील पहिल्या व्यक्तीचा कँसरमुळे मृत्यू झाला आहे

लंडन- एचआयव्हीतून बरा झालेल्या जगातील पहिल्या व्यक्तीचा कँसरमुळे मृत्यू झाला आहे. टीमोथी रे ब्राऊन हे एचआयव्हीमधून (AIDS) पूर्णपणे बरे झालेले पहिले व्यक्ती ठरले होते. एचआयव्हीची एकदा लागण झाल्यास त्यातून बरे होता येत नाही, असा आजपर्यंत समज होता. पण टीमोथी यांच्याबाबतीत चमत्कार दिसून आला होता. एचआयव्हीची लागण झाल्यानंतर काही वर्षांनी त्यांच्यातील एचआयव्हीचे विषाणू पूर्ण नाहीसे झाले होते. अनेक तज्ज्ञांनी या घटनेवर आश्चर्य व्यक्त केले होते.   

टीमोथी एचआयव्हीतून बरे झाले असले तरी त्यांना कँसर झाल्याचे निष्पण झाले होते. 5 महिने ल्यूकेमीयाशी leukaemia लढल्यानंतर कॅलिफोर्निया येथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा सहकारी टीम हॉईफेगन यांनी फेसबुक पोस्ट करुन याबाबतची माहिती दिली आहे. टीमोथी यांचा जन्म 11 मार्च 1966 साली झाला होता. 

'जय श्री राम': न्यायालयाच्या निर्णयानंतर अडवाणी यांचा घोष

टीमोथी यांनी एचआयव्हीवर मात केल्याने एक आशेचा किरण निर्माण झालाय. अनेक डॉक्टर आणि एचआयव्हीशी लढणाऱ्या अनेक रुग्णांना एक दिवस या विषाणूवर मात करता येईल असं वाटू लागलं आहे. टीमोथी यांचा अभ्यास करुन अनेक डॉक्टरांनी एचीआयव्ही संबंधात अधिक अभ्यास सुरु केला होता. 

टीमोथी ब्राऊन यांना 1995 साली एचआयव्ही झाल्याचे समोर आले होते, त्यानंतर 2006 साली त्यांना कँसर झाल्याचेही निष्पण झाले होते. उपचारानंतर ब्राऊन एचआयव्हीतून बरे झाले होते. मात्र, त्यांना कँसरची लागण झाली होती आणि मागील वर्षापासून त्यांची प्रकृती बिघडत गेली. जर्मन डॉक्टर ब्राऊन यांच्यावर उपचार करत होते. त्यांच्यावर करण्यात आलेल्या उपचारामुळे आणि स्टिम सेल्स ट्रान्सप्लांटमुळे त्यांची इम्युन सिस्टिम नष्ट झाली होती, असं त्यांनी सांगितलं आहे.  

कोरोनाकाळात मुकेश अंबानी यांनी किती कोटी कमावले?

जगभरात आतापर्यंत 3.7 कोटी लोकांना एचआयव्हीची लागण झाली आहे. शिवाय आतापर्यंत 3.5 कोटी लोकांचा या विषाणूमुळे जीव गेला आहे. 1980 च्या दशकापासून एचआयव्हीचा प्रादुर्भाव वाढत गेला आहे. एचआयव्हीवर मात करण्यासाठी गेल्या तीन दशकांत वैद्यकीय क्षेत्राने मोठी प्रगती केली आहे. अँटीरेट्रोव्हायरल थेरेपीमुळे antiretroviral therapies एचआयव्ही झालेल्या रुग्णांना अनेक वर्ष जगणे शक्य झाले आहे. 

(edited by- kartik pujari)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World First Patient Cured Of HIV Dies After Cancer Returns