जागतिक आरोग्य संघटनेचा आयोग चीनवर टीका करण्याची शक्यता कमीच

वृत्तसंस्था
Saturday, 26 September 2020

डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानमो घेब्रेयेसूस यांनी जुलैमध्ये या आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली. कोरोनाचा विषाणू चीनमधील वुहानमध्ये उगम पावल्याचे मानले जाते.

न्यूयॉर्क - कोरोनाच्या जागतिक साथीप्रकरणी चौकशीसाठी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) स्थापन केलेला स्वतंत्र आयोग अद्ययावत माहितीचे पहिले सादरीकरण येत्या पाच व सहा ऑगस्ट रोजी करेल. अंतिम अहवाल पुढील वर्षी सादर करण्यात येईल.

डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानमो घेब्रेयेसूस यांनी जुलैमध्ये या आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली. कोरोनाचा विषाणू चीनमधील वुहानमध्ये उगम पावल्याचे मानले जाते. संसर्गजन्य साथीच्या प्रारंभीच्या टप्प्यात चीनने स्थानिक पातळीवरील प्रवासावर कित्येक आठवडे निर्बंध घातले, पण त्याचवेळी चीनमधून इतर देशांत विमाने पाठविणे नेहमीप्रमाणे सुरू ठेवले. त्यामुळे ही साथ जगभर पसरली असा आरोप करण्यात आला. डब्ल्यूएचओचे प्रमुख तसेच चीनने केलेल्या हाताळणीवर सर्वदूर तीव्र टीका झाली. त्या पार्श्वभूमीवर हा आयोग स्थापन करण्यात आला.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अमेरिकेने तशी मागणी नेटाने केली. त्याचवेळी डब्ल्यूएचओला सोडचिठ्ठी देत अमेरिकेने दडपण आणले. संयुक्त राष्ट्रांच्या नुकत्याच झालेल्या सभेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर टीकेची झोड उठविली. जगावर ही साथ लादल्याबद्दल चीनला जबाबदार ठरवावे, अशी मागणी त्यांनी केली.

...तसे होणे कठीण
न्यूझीलंडच्या माजी पंतप्रधान हेलन क्लार्क आणि लायबेरियाच्या माजी अध्यक्ष इलन जॉन्सन सरलीफ यांच्या संयुक्त अद्यक्षतेखाली आयोग स्थापण्यात आला. चीनच्या संदर्भात कोरोना साथीच्या हाताळणीवरून डब्ल्यूएचओवर आयोग टीका करेल असे होणे कठीण असेल, असे मत भारत तसेच संयुक्त राष्ट्रांतील राजनैतिक अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. मुळात आयोगाची घोषणा करताना स्वतः टेड्रोस यांनी दोष काढण्याच्या कामासाठी आयोग स्थापन केला नसल्याचे स्पष्ट केले होते. पुढील जागतिक साथीच्या वेळी  जगाच्या प्रतिसादात सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्याचा उद्देश असल्याचे ते म्हणाले होते. क्लार्क यांनी गेल्या आठवड्यात आयोगाच्या पहिल्या बैठकीत हेच सांगितले होते.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काय घडले आणि कशामुळे यावर स्वतंत्र आयोगाने प्रकाश टाकलाच पाहिजे अशीच आमची सुस्पष्ट भूमिका आहे, पण आम्ही दोषारोप करण्याच्या उद्योगात गुंतणार नाही.
- हेलन क्लार्क

पुढील जागतिक साथीच्यावेळी सामना करण्यास जग सरस स्थितीत असेल अशी दक्षता घेण्यासाठी आम्ही काम करू. त्यासाठी धाडसी, विश्वासार्ह, भक्कम आणि अंमलबजावणी करण्यासारखे उपाय आमच्या अहवालातून मिळतील.
- इलन जॉन्सन सरलीफ

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नियमीत माहिती
पुढील वर्षी मे महिन्यात होणाऱ्या जागतिक आरोग्य परिषदेत अंतिम अहवाल अपेक्षित
 त्याआधी आयोगाकडून इतर बैठकांबाबत नियमीतपणे अद्ययावत माहिती दिली जाणार

 नोव्हेंबरमध्ये पुढील बैठक
 आयोगावर भारताच्या निवृत्त केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुडान यांची नियुक्ती
 चीनमधील कोरोनाच्या मुकाबल्यात आघाडीवर राहिलेले आणि त्याबद्दल प्रशंसा झालेले फुप्फुसशास्त्र तज्ञ झोंग नानशान हे सुद्धा प्रतिनिधी

बोलकी आकडेवारी
जगात तीन कोटी दहा लाख लोकांना कोरोनाचा झाला असून बळींची संख्या दहा लाखाच्या घरात गेली आहे. त्या तुलनेत चीनमधील एकूण रुग्णांची संख्या 86 हजाराच्या आसपास आहे, जी ओमानसारख्या छोट्या देशाच्या 95 हजार रुग्णांच्या तुलनेत फारच कमी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Health Organization is less likely to criticize China