esakal | जगातील पहिली फ्लाईंग कार उड्डाणासाठी सज्ज; अमेरिकेत FAAनं दिली परवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

Worlds First Flying Car Officially Cleared for Takeoff by the FAA

जर कारमध्ये बसून आकाशात उडण्याचं तुमचं स्वप्न असेल तर तुमचं हे स्वप्न आता फार काळ दूर राहिलेलं नाही. 

जगातील पहिली फ्लाईंग कार उड्डाणासाठी सज्ज; अमेरिकेत FAAनं दिली परवानगी

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

जर कारमध्ये बसून आकाशात उडण्याचं तुमचं स्वप्न असेल तर तुमचं हे स्वप्न आता फार काळ दूर राहिलेलं नाही. कारण जगातील पहिली उडणारी कार आता उड्डाणासाठी सज्ज झाली आहे. अमेरिकेत या कारला फेडरल एव्हिएशन ऑथरिटीनं (FAA) उड्डाणासाठी परवानगी दिली आहे. डेलीमेलने याबाबत वृत्त दिलं आहे.

या उडणाऱ्या कारचे वैशिष्ट्य म्हणजे ती आकाशात 10,000 फूटांवरुन एका तासात 100 माइल (सुमारे 160 किमी) प्रवास करु शकते. चीनच्या टेराफुजिया कंपनीने या जमिनीवर धावू आणि आकाशात उडू शकणाऱ्या विशेष हलक्या स्पोर्ट्स कारला सुरक्षितरित्या उड्डाणाचं प्रमाणपत्र मंजूर केलं आहे. या कारला 27 फुटांचे दोन पंख (विंगस्पॅन) असून ते खालच्या बाजूला दुमडले जाऊ शकतात. त्यामुळे ती कार गॅरेजमध्येही सहज बसू शकते. दोन प्रवाशांची क्षमता असणाऱ्या या रस्ते आणि आकाशात प्रवास करु शकणाऱ्या कारच्या उड्डाणासाठी 2022 वर्ष उजाडणार आहे. 

सध्या पायलट्स आणि फ्लाईट स्कूलसाठी परवानगी
डेलीमेलच्या वृत्तानुसार, या कारचे फ्लाईट व्हर्जन सध्या पायलट्स आणि फ्लाईट स्कूल्ससाठी (विमान उड्डाण प्रशिक्षण शाळा) उपलब्ध आहे. पुढील वर्षापर्यंत किंवा तत्पूर्वी या कारला कायदेशीर मान्यता मिळेल. सध्या या कारने रस्त्यांवर धावण्यासाठीची रस्ता सुरक्षा मानकं पूर्ण केलेली नाहीत. 

या कारसाठी दोन प्रकारचे परवाने आवश्यक
दरम्यान, टेराफुजिया कंपनीने एक निवेदन प्रसिद्ध केलं असून यामध्ये आवाहन केलं आहे की, ज्यांना हे विमान विकत घेण्यामध्ये रस असेल त्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आणि स्पोर्ट्स पायलट प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. टेराफुजियाचे महाव्यवस्थापक केविन कोलबर्न म्हणाले, "आमच्या टीमनं या खास कारच्या निर्मितीवर पूर्णपणे लक्ष केंद्रीत केलं आहे. या कारचा दर्जा सुधारण्यासाठी टीमने डिझानच्या कठीण बाबी पूर्ण केल्या आहेत. या कारच्या 80 दिवसांच्या उड्डाणाच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. या कारच्या तांत्रिक बाबींची पूर्तता करणारे 150 कागदपत्रे FAA कडे पाठवण्यात आले असून याचं यशस्वीरित्या लेखापरिक्षणही पार पडलं आहे"

उडणाऱ्या कारची ही आहेत वैशिष्ट्ये
टेराफुजिया कंपनीच्या माहितीप्रमाणं, ही विशेष कार प्रिमियम गॅसोलिन किंवा 100 LL विमानाचं इंधनावर चालू शकते. या कारला हायब्रिड-इलेक्ट्रिक मोटर आहे. कुठल्याही वाहनाप्रमाणे या कारसाठी चार चाकांचे हायड्रॉलिक डिस्कब्रेक्स देण्यात आले आहेत. याला कार्बन फायबर सेफ्टी पिंजरा आणि एअरफ्रेम पॅराशूटही देण्यात आलं आहे. या कारचे वजन 1,300 पाउंड (590 किलो) असून याला फिक्स्ड लँडिंग गियर असून 27 फुटांचे रुंद पंख आहेत. एक कार गॅरेजमध्ये बसेल इतक्या आकारासाठी या कारच्या पंखांची घडीही घालता येते. यामुळे लँडिंग झाल्यानंतर केवळ एका मिनिटांत ती रस्त्यांवर सामान्य कारप्रमाणे धावू शकते. 
 

loading image