
Washington Shooting : वॉशिंग्टनमध्ये गोळीबारात तीन जणांचा मृत्यू
वॉशिंग्टन : वॉशिंग्टनमधील याकिमा भागात आज एका हल्लेखोराने केलेल्या बेछूट गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला. हल्लेखोर २१ वर्षांचा युवक होता. हल्ल्यानंतर त्याने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. अमेरिकेत शस्त्र बाळगण्याची परवानगी मिळाल्यानंतर गोळीबाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असल्याने या मुद्यावरून पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने भर बाजारात गोळीबार केला. त्याने सर्वप्रथम एका पेट्रोल पंपाजवळ बसलेल्या दोघांना गोळी मारून ठार मारले. त्यानंतर एका दुकानाजवळ जात तेथील एका व्यक्तीलाही गोळी मारली.
यानंतर गोंधळ उडाल्यावर तो स्वत:च्या घराजवळ लपून बसला. त्याच्या घरातील लोकांनीच पोलिसांना दूरध्वनी करत बोलावून घेतले. पोलिसांना जवळ येताना पाहून हल्लेखोराने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. त्याने केलेल्या गोळीबारामागील कारण स्पष्ट झालेले नाही.
भारतीयाची हत्या‘
न्यूयॉर्क : अमेरिकेतील जॉर्जिया येथे तीन बुरखाधारी हल्लेखोरांनी एका भारतीय वंशाच्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या केली. पिनल पटेल असे त्यांचे नाव असून गोळीबारात त्यांची पत्नी आणि मुलगी जखमी झाले आहेत. वीस जानेवारीला ही घटना घडली. पटेल आणि त्यांचे कुटुंबीय मोटारीतून घरी जात असताना तीन व्यक्तींनी त्यांची अडवून दमदाटी केली आणि नंतर गोळीबार केला.