
2020 वर्ष कोरोना महामारीसाठी ओळखलं जाईल, पण या वर्षात इतरही अनेक घटना घडल्या ज्या सातत्याने चर्चत राहिल्या.
नवी दिल्ली- (Look back 2020) 2020 वर्ष कोरोना महामारीसाठी ओळखलं जाईल, पण या वर्षात इतरही अनेक घटना घडल्या ज्या सातत्याने चर्चत राहिल्या. 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय पातळवीर घडलेल्या आणि बातम्यांमध्ये राहिलेल्या घटनांचा आपण थोडक्यात आढावा घेऊ...
चीनमधून कोरोनाचा प्रसार
2020 च्या सुरुवातीलाच चीनच्या वुहान शहरातून जगभरात कोरोना महामारीचा प्रसार झाला. चीनमधून निघालेल्या या विषाणूने सर्व जगात आपले हातपाय पसरले. नोव्हेंबर 2019 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. 30 जानेवारी 2020 ला जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना महामारीला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केले. जगभरात आतापर्यंत 7 करोड 28 लाखांच्या पुढे कोरोना रुग्ण सापडले आहेत. 16 लाख 21 हजारांपेक्षा अधिक लोकांचा या विषाणूने बळी घेतला. अजूनही या विषाणूचा प्रभाव कमी झालेला नाही.
बगदादमध्ये इराणचे सेनाध्यक्ष कासिम सुलेमानी यांची हत्या
3 जानेवारी 2020 ला इराकमध्ये बगदाद हवाई अड्ड्यावर अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात कासिम सुलेमानीची हत्या झाली. कासिम सुलेमानी इराणचे सर्वात शक्तीशाली सैन्य कमांडर होते. सुलेमानी थेट इराणचे सर्वोच्च नेता आयतुल्लाह सुलेमानी यांना रिपोर्ट करायचे. सुलेमानी यांच्या हत्त्येमुळे इराण आणि अमेरिकेचे संबंध टोकाला गेले आहेत.
पाकिस्तानच्या याहया खानने केला होता 30 लाख बांगलादेशींचा 'नरसंहार'
जॉर्ज फ्लॉईड यांचा मृत्यू
25 मे रोजी अमेरिकेच्या मिनेसोटातील मिनेपोलिस शहरात 46 वर्षाच्या जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय नागरिकाचा पोलिस कारवाईत मृत्यू झाला. घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये दिसत होतं की, पोलिस अधिकारी जॉर्ज यांच्या मानेवर आपला गुडघा ठेवून उभा आहे. त्यामुळे जॉर्ज यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
जॉर्ज यांच्या मृत्यूने अमेरिकेसह सर्व जगात संतापाची लाट पसरली. अमेरिकेतील अनेक ठिकाणी 'ब्लॅक लाईव्ह मॅटर' आंदोलन पुन्हा सुरु करण्यात आलं. अनेक ठिकाणी हिंसक निदर्शने झाली, ज्यात 19 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. 1400 लोकांना अटक करण्यात आली. जगभरात अनेक ठिकाणी याप्रकरणी आंदोलनं झाल्याचे पाहायला मिळालं.
जपानचे शिंजो आबे यांनी पद सोडले
जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव 28 ऑगस्ट रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. 14 सप्टेंबरला मंत्रिमंडळ प्रमुख सचिव योशिहिदे सुगा यांना जपानच्या सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाचा नेता म्हणून निवडण्यात आला. योशिहिदे सुगा यांना अबे यांच्या जवळचे मानले जाते.
फ्रान्समध्ये शार्ली हेब्दो नियतकालिकाने पुन्हा वादग्रस्त कार्टून छापले
1 सप्टेंबरला फ्रान्समध्ये व्यंगचित्र नियतकालिक 'शार्ली हेब्दो'ने मोहम्मद पैगंबरांचे वादग्रस्त कार्टून पुन्हा छापण्याचा निर्णय घेतला. जेणेकरुन आरोपींचा खटला पुन्हा सुरु होईल. शार्ली हेब्दोने 2015 मध्ये मोहम्मद पैंगबराचे कार्टून छापले होते. 7 जानेवारी 2015 ला दहशतवाद्यांनी शार्ली हेब्दोच्या कार्यालयात घुसून अंधाधुंद गोळीबार केला. ज्यात संपादकासह 12 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी 2 सप्टेंबर 2020 मध्ये फ्रान्समध्ये खटला सुरु करण्यात आला होता.
iPhone आणि Android वापरणाऱ्यांनो, 2021 पासून या फोन्सवर व्हॉट्सऍप होणार बंद!
कार्टून पुन्हा छापल्याने फ्रान्समध्ये अनेक ठिकाणी हिंसक घटना पाहायला मिळाल्या. सप्टेंबरमध्ये एका मुस्लीम व्यक्तीने दोन लोकांवर चाकू हल्ला केला. 17 ऑक्टोबर रोजी शाळेत पैगंबरांचे चित्र दाखवल्याने एका 18 वर्षीय युवकाने शिक्षकाची गळा कापून हत्या केली. फान्सचे राष्ट्रपती इम्यॅन्यूएल मॅक्रॉन यांनी या घटनेला इस्लामिक दहशतवाद ठरवलं. त्यानंतर इस्लामिक राष्ट्रांतून त्यांच्यावर टीका झाली.
ट्रम्प यांची सत्ता गेली, बायडेन अमेरिकेचे नवे राष्ट्रपती
अमेरिकेच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन यांचा विजय झाला. त्यामुळे अमेरिकेचे 46 वे राष्ट्रपती होण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांनी उपराष्ट्रपती म्हणून भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची निवड केली आहे. बायडेन 20 जानेवारीला राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी अद्याप आपला पराभव मान्य केलेला नाही.