योग ही भारताची जगाला देणगी : पंतप्रधान मोदींचे गौरवोद्‌गार 

PM Narendra Modi
PM Narendra Modi

ब्युनोस आयर्स : आरोग्य आणि शांततेसाठी योग ही भारताने जगाला दिलेली एक मोठी देणगी आहे, योगाच्या माध्यमातून प्रत्येक जण आनंदाशी जोडल्या जातो असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.

ते येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. ''काही तासांपूर्वी मी पंधरा हजार किलोमीटरचा प्रवास करून 24 तासांच्या अवधीत येथे आलो. तुमचे प्रेम आणि उत्साहामुळे हे शक्‍य झाले. मला बाहेरून येथे आल्यासारखे वाटत नाही,'' असेही त्यांनी नमूद केले. 

'योगा फॉर पीस' या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांचेही मोदींनी मनापासून कौतुक केले, यापेक्षा अधिक चांगले नाव या उपक्रमाला देणे शक्‍यच नव्हते असे गौरवोद्‌गार त्यांनी या वेळी काढले. 'जी-20' देशांच्या संमेलनात सहभागी होण्यासाठी येथे आलेल्या मोदींनी या विशेष कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

मन शांत राहिले तर कुटुंब, समाज, देश आणि जगभरात शांतता नांदू शकते. योगामुळेच आता भारत आणि अर्जेंटिना ही दोन राष्ट्रे जोडली गेली आहेत. दोन देश आणि लोकांना या माध्यमातून जोडल्या जात आहे असे मोदींनी नमूद केले. 

सौदींच्या युवराजांशी चर्चा 
'जी-20' देशांच्या संमेलनासाठी येथे आलेल्या मोदींनी आज सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद बिन सलमान यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी उभय नेत्यांनी दोन्ही देशांमधील आर्थिक, सांस्कृतिक आणि ऊर्जाविषयक संबंध अधिक बळकट करण्यावर भर दिला.

याशिवाय तंत्रज्ञानक्षेत्र, अपारंपरिक ऊर्जा आणि अन्नसुरक्षा क्षेत्रातील गुंतवणुकीबाबत देखील या वेळी चर्चा करण्यात आली. सलमान यांच्यासोबतची चर्चा फलदायी ठरल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. 

गुटेरस यांची भेट 
वाढत्या वैश्‍विक तापमानाच्या समस्येच्या निराकरणासंदर्भात मोदींनी आज संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटानिओ गुटेरस यांच्याशी देखील संवाद साधला. या समस्येच्या निराकरणात भारत नेमकी काय भूमिका पार पाडू शकतो याबाबत दोघांमध्ये खल झाल्याचे समजते. मागील दोन महिन्यांतील मोदी आणि गुटेरस यांची ही दुसरी भेट आहे. पोलंडमध्ये होऊ घातलेल्या 'सीओपी-24' या संमेलनाचा या बैठकीत उल्लेख झाला. 

मर्केल यांच्या विमानात बिघाड 
बर्लिन : जर्मनीच्या चॅन्सलर अंजेला मर्केल यांच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचे कोलान येथे आपत्कालिन लॅंडिंग करण्यात आले, यामुळे मर्केल यांना 'जी-20' देशांच्या संमेलनाच्या उद्‌घाटन समारंभास उपस्थित राहता आले नाही. मर्केल यांच्यासोबत काही जर्मन पत्रकारांना विमानतळावरच मुक्काम करावा लागला. यानंतर मर्केल माद्रिदला जातील आणि तेथून त्या ब्युनोस आयरिसला रवाना होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

चीन अमेरिका वाटाघाटी 
वॉशिंग्टन : द्विपक्षीय व्यापारी कराराच्या अनुषंगाने अमेरिका आणि चीनमधील वाटाघाटी आता अंतिम टप्प्प्यात पोचल्या असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज स्पष्ट केले. पण यातून हाती येणाऱ्या निष्कर्षांना आमचा देश बांधील नसेल असे सांगायलाही ते विसरले नाहीत.

'जी-20' देशांच्या संमेलनात ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी चिनपिंग यांच्यात चर्चा होणार असून, त्या पार्श्‍वभूमीवर ट्रम्प यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. अमेरिका आणि चीन या दोन देशांतील व्यापार आणि त्यावर आकारला जाणारा कर या दोन्ही बाबी नेहमीच वादाचा विषय ठरत आल्या आहेत. ट्रम्प यांचे प्रशासन चीनकडून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर अडीचशे अब्ज डॉलरपेक्षाही अधिक कर आकारते. हे धोरण आणखी कठोर करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. चीनला अधिक व्यापाराच्या सवलती देण्यास ट्रम्प यांनी विरोध केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com