Goa Election 2022 Big Fight | गोवेकरांचे या पाच तुल्यबळ लढतींकडे सर्वाधिक लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Goa Election 2022 Big Fights

गोवेकरांचे या पाच तुल्यबळ लढतींकडे सर्वाधिक लक्ष

Goa Election 2022 Big Fights पणजी - गोव्यात यावेळी सत्ता मिळवण्यासाठी सत्तारुढ भाजप व कॉंग्रेसमध्ये अटीतटीची लढत निवडणुकीत अनुभवायला मिळाली. गोव्याच्या स्वभावानुसार येथील प्रचार जरी शांत, सुशेगाद झाला तरी मतदान मात्र अफाट चुरशीने झाले. सुमारे साडेअकरा लाख मतदार ३०१ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद केले आहे. आता सर्वांच्या नजरा १० मार्च म्हणजेच गुरुवारी होणाऱ्या मतमोजणीकडे लागलेल्या आहेत.

येथील मतदारसंघात २२ ते ३० हजारच मते असल्याने लढती चुरशीने होतात. काहीशे मतेही निकाल फिरवतात. भाजप किंवा कॉंग्रेसला बहुमत मिळणार का?, आप व तृणमुलच्या उमेदवारांना किती मते, जागा मिळणार? याबाबत मतदारांच्या मनात भारी कुतूहल आहे. अनेक लढती चुरशीने होणार असल्या तरी तमाम गोवेकरांचे पुढील पाच मतदारसंघाकडे लक्ष लागलेले आहे. त्याचा थोडक्यात आढावा.

पणजीकडे देशाचे लक्ष (Panaji Constituency)

पणजीत दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पलने (Utpal Parrikar) बंडखोरी केल्याने देशाचे लक्ष येथे लागले आहे. भाजपचे उमेदवार बाबुश मोन्सेरात व अपक्ष उत्पल यांच्यातच तुल्यबळ लढत आहे. गेल्या वेळी मोन्सेरात अवघ्या १७५८ मतांनी विजयी झाले होते. पणजीचे दोनदा आयुक्त राहिलेले सनदी अधिकारी एल्विस गोम्स कॉंग्रेसचे उमेदवार आहेत. आपचे वाल्मिकी नाईक व उत्पल यांना किती मते मिळतील यावर त्यांची सारी भिस्त आहे.

मुख्यमंत्री हॅटट्रिक करणार का? (Pramod Sawant)

साखळी मतदारसंघात राज्याचे तरुण मुख्यमंत्री प्रमोद सावंत तिसऱ्यांदा लढत आहेत. पर्रिकर यांच्या निधनानंतर अचानक सावंत मुख्यमंत्री झाले. खाणींचे साम्राज्य असलेल्या या भागात सध्या खाणी बंद असल्याने मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे. कॉंग्रेसचे धर्मेश सगलानी यांनी याच मुद्यावर रान पेटवत सावंत यांच्यापुढे आव्हान निर्माण केले आहे.

तृणमुल, आप खाते खोलणार? (TMC, AAP)

बाणावली मतदारसंघात प्रामुख्याने तृणमुल कॉंग्रेसचे चर्चिल आलेमाव, आपचे वेन्झी वियेगस तसेच कॉंग्रेसचे अंथनी डायस यांच्यात तिरंगी लढत आहे. चर्चिल आलेमाव यांचा हा परंपरागत मतदारसंघ आहे. येथे कदाचित आप, तसेच तृणमुलला विजयाची मोठी आशा आहे.

मडगावमध्येही चुरस

मडगावमध्ये कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत (Digambar Kamat) यांच्याविरुदध भाजपकडून विद्यमान उपमुख्यमंत्री मनोहर आजगांवकर यांनी दंड थोपटले आहेत. कामत यांचा येथे मोठा प्रभाव मानला जातो. कॉंग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला नसला तरी सत्ता मिळाल्यास कामतच मुख्यमंत्री होतील असे सध्याचे चित्र आहे.

राणेंच्या घरातील लढाई

चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले ८३ वर्षीय प्रतापसिंग राणे पोरियम मतदारसंघातून क़ॉंग्रेसकडून सलग ११ वेळा विजयी झाले. यंदाही ते उभे होते. पण त्यांच्या स्नुषा दिव्या राणे याच येथून भाजपकडून उभ्या राहिल्या. त्यामुळे प्रतापसिंग राणे यांना माघार घ्यावी लागली. कॉंग्रेसने आता येथे रणजीत राणे यांना उमेदवारी दिली आहे. क़ॉंग्रेसचा हा गड यंदा भाजपकडे जाणार का याबाबत सर्वत्र उत्सुकता आहे.

Web Title: People Goa Watching To See Who Will Win Election Between Bjp And Congress

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..