Hearing loss : श्रवणदोषासह जन्मतात २०० चिमुकले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

200 babies born with hearing impairment 300 children free from hearing loss cochlear implants in hospital

Hearing loss : श्रवणदोषासह जन्मतात २०० चिमुकले

नागपूर : दिवसेंदिवस बहिरेपणाची समस्या वाढत आहे. २०० वर मुले दरवर्षी नागपुरात जन्माला येत असल्याचे निरीक्षण कान-नाक-घसारोग तज्ज्ञांनी नोंदविले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने तीन मार्च हा दिवस जागतिक श्रवणदिन म्हणून घोषित केला आहे.

ध्वनिप्रदूषण, ८० डेसिबलपेक्षा जास्त कर्णकर्कश आवाज. हेडफोनवर मोठ्याने गाणी ऐकणे यामुळे श्रवणशक्ती घटते. परिणामी श्रवण दोष घेऊन जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या वाढत आहे. दर हजारात तीन ते चार मुलांमध्ये हा दोष असतो.

देशात ६.३ टक्के लोक असे आहेत. जागतिक श्रवणदिनाच्या पार्श्वभूमीवर मेडिकलच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. कांचन तडके, तसेच कान नाक घसारोग तज्ज्ञ यांच्याशी संवाद साधला. दर हजारात तीन ते चार मुले श्रवणदोष घेऊन जन्मतात. उपराजधानीत दरवर्षी साठ हजारावर प्रसूती होतात. यामुळे २०० मुलांना श्रवणदोष असण्याची दाट शक्‍यता असते. जोखमीच्या मुलांमध्ये हे प्रमाण अधिक असते.

श्रवणदोषाती कारणे

-ध्वनिप्रदूषण

-हेडफोनचा अतिवापर

-काही वेळा अपघात-आजार

-जन्मजात व्यंगामुळे बहिरेपणा

-गर्भवती मातेचे कुपोषण

-गर्भाची अपुरी वाढ

-नात्यात विवाह होणे

-आनुवंशिकता

-जन्मानंतर होणारा कावीळ

-डोक्यात ताप चढणे

-जन्मावेळी बाळाचे वजन कमी असणे

तीनशेवर चिमुकल्यांचा श्रवणदोष दूर

केंद्र शासनाने ‘श्रवण क्षमता तपासणी'' साठी प्रचार-प्रसार आणि उपचाराचा निर्णय घेतला आहे. श्रवण दोषांवर मात करण्यासाठी बालकांचे वेळीच निदान करून कॉकलिअर इम्प्लांटचा उपक्रम सुरू झाला आहे.

मेयो, मेडिकलसह राज्यात ७ सरकारी आणि २८ खासगी रुग्णालयात कॉक्लिअर इम्प्लान्टची सोय केली आहे. मेडिकलमधील ११०, मेयोतील ७५ आणि खासगी रुग्णालयातील १२० अशी सुमारे तीनशेवर मुले या दोषातून मुक्त झालीत.

कानाच्या पडद्यामार्फत ध्वनीची कंपने मेंदूपर्यंत पोहोचतच नसल्याने ही मुले अपंगत्वाच्या जोखमीवर उभी असतात. मात्र, कॉक्लिअर इम्प्लांटचे प्रत्यारोपण झाल्याने पुन्हा आत्मविश्‍वासाचे बळ फुंकणे शक्‍य आहे. ओएई चाचणी सक्तीची करावी.

- डॉ. प्रशांत निखाडे, कान-नाक-घसा रोगतज्ज्ञ, नागपूर

प्रत्येक बाळाची श्रवणक्षमता तपासणी आवश्‍यक आहे. मात्र, ते शक्‍य नसल्याने ज्या बाळांमध्ये जोखीम असते, अशांसाठी ‘ओएई'', बेरा'' चाचणीची सोय मेडिकलमध्ये आहे. कॉक्लिआर इम्प्लांटद्वारे श्रवणदोष असलेल्या ११० मुलांच्या कोमेजलेल्या चेहऱ्यांवर हसू फुलवण्यात यश आले आहे.

- डॉ. कांचन तडके, सह.प्राध्यापक, कान-नाक-घसारोग विभाग, मेडिकल