- महेंद्र गोखले, फिटनेसविषयक प्रशिक्षक
बरेच लोक मनात काही विशिष्ट उद्दिष्टे समोर ठेवून फिटनेस अॅक्टिव्हिटीमध्ये सहभागी होतात, परंतु प्रामाणिकपणे सांगायचे तर ही उद्दिष्टे योग्य आहेत याची त्यांना खात्री नसते. त्यामुळे अशी उद्दिष्टे ठरवताना योग्य मार्गदर्शन घेणे गरजेचे असते. हे गरजेचे का असते हे आज तुम्हाला हा लेख वाचल्यावर नक्कीच कळेल.
सगळीकडे सर्वांत जास्त आढळणारे फिटनेसचे उद्दिष्ट म्हणजे वजन कमी करणे. बहुतेक सर्वजण, विशेषतः स्त्रिया, वजन कमी करण्यासाठी अनेक व्यायाम करतात; पण दुर्दैवाने यात सपशेल अपयशी ठरतात.
फिटनेसच्या अॅक्टिव्हिटीमध्ये सहभागी होताना आपली तब्येत, आरोग्य चांगले राहिले पाहिजे हाच खरेतर मुख्य हेतू असला पाहिजे. शरीर सुदृढ असावे, आपण निरोगी, आनंदी आणि योग्य आहार घेऊन आयुष्य जगावे हा खरेतर मूळ हेतू असला पाहिजे. वजन कमी होणे हा या सगळ्यांचा साईड इफेक्ट आहे असे म्हणता येईल.
व्यायामाची योग्य उद्दिष्टे ठरवा
आपले फिटनेसचे उद्दिष्ट साध्य होणार किंवा नाही हे त्याच्या हेतूवर अवलंबून आहे. आपले वय, आपली कार्यक्षम क्षमता, आपले ज्ञान आणि अनुभव, आपले सध्याचे आरोग्य आणि क्षमता, या सर्व गोष्टींचा विचार उद्दिष्टे ठरवताना करायला हवा.
उद्दिष्टे निश्चित करताना, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की व्यायाम करणे ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे; या उद्दिष्टांचा क्रम लॉजिकल असला पाहिजे.
व्यायामादरम्यान, आपण ठरवलेली उद्दिष्टे खरोखरच आपल्या फिटनेसची पातळी, ज्ञान आणि आवडीमध्ये बसतात की नाही हे वारंवार तपासून घेणे गरजेचे आहे. कधीही आपल्याला वाटले, की ही उद्दिष्टे आपल्याला हवी ती आणि योग्य नाहीत तर पुन्हा त्यांचे अवलोकन करून ती ठरवावीत. त्यामध्ये ती साध्य करण्याचा कालावधीदेखील बदलावा लागू शकतो.
कोणतीही उद्दिष्टे असली, तरी दररोज त्यात सक्रियता असणे ही ती उद्दीष्टे साध्य करण्याची महत्त्वाची पायरी आहे.
वास्तव आणि उद्दिष्टपूर्ती
उद्दिष्टे वास्तववादी आणि तरीही आव्हानात्मक असणे आवश्यक आहे; आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास सक्षम असावे, परंतु ते खूप सहजही नसावे. उद्दिष्टे आपल्याला आव्हान देणारी असावी, आपल्या गुणांचा कस लागावा आणि त्यातून आपल्याला प्रेरणा मिळावी- कारण एकदा आपण ती साध्य केल्यावर आपल्याला सतत प्रोत्साहन मिळत राहील, काही साध्य केल्याचे समाधान मिळेल आणि स्वतःचा अभिमानही वाटेल.
प्रमाणाबाहेर किंवा आवाक्याबाहेरची उद्दिष्टे ठेवली तर ती आपण साध्य करू शकत नाही आणि त्यामुळे आपली इच्छा कमी होते कारण आपल्या मनावर सतत तणाव, चिंता आणि अपयशाची भावना किंवा भीती निर्माण होत राहते.
उद्दिष्टे साध्य करण्याच्या प्रवासात साध्य केलेल्या गोष्टींबद्दल जागरूक असावे.
मोजण्यायोग्य उद्दिष्टे
फिटनेसची उद्दिष्टे मोजण्यायोग्य असली पाहिजेत, तरच ती साध्य केली की नाही हे ठरवता येते. आपल्या प्रगतीचा आलेख पाहिल्यावर आपण आपल्या ध्येयापासून किती जवळ किंवा दूर आहोत हे कळते.
आपल्या उद्दिष्टांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी, आपण वर्कआऊट डायरी वापरू शकतो, त्यात आपण आपली प्रगती, आपल्या जवळच्या व्यक्तींकडून मिळालेले अभिप्राय नोंदवू शकतो. काही अॅप्सचीही मदत घेऊ शकतो.
साध्य करण्याचा कालावधी
आपली सर्व उद्दिष्ट्ये साध्य करणारी एक ‘तारीख’ आपण निश्चित केली पाहिजे.
सहसा, काहीसे अनिश्चित आणि दीर्घकालीन ध्येय ठेवावे (कमीतकमी एका वर्षासाठी). शेवटी, आपण ते साध्य करू की नाही हे आपल्याला माहित नाही कारण ते बऱ्याचदा जीवनातील इतर घटकांवर देखील अवलंबून असते ज्यावर कदाचित आपले कमी नियंत्रण असेल. परंतु आपल्या रोजच्या वेळापत्रकानुसार आपण योग्य दिशेने जात आहोत याची खात्री करणे दीर्घकालीन उद्दीष्टे साध्य करण्यासाठी महत्वाचे आहे.
स्वतःलाच स्वतःची खात्री देण्यासाठी छोटी छोटी ध्येये ठेवणे आणि ती साध्य करणे देखील गरजेचे आहे. (लहान कालावधीसाठी, उदा. चार आठवडे) तसेच ही ध्येये आपल्या आयुष्यातील इतर काही परिस्थितीमुळे बदलू शकतात.
ध्येयांचे वैशिष्ट्य
छोटी-छोटी (अल्प-मुदतीची) उद्दीष्टे विशिष्ट आणि सोपी असावीत. आपण ठरवलेली उद्दीष्टे जितकी निश्चित किंवा विशिष्ट असतील तितके आपण योग्य मार्गावर आहोत हे तपासणे सोपे होते.
आपण एखाद्या प्रशिक्षकाकडे व्यायाम करत असलो तर त्याच्या ध्येये ठरवण्याच्या क्षमतेवर आणि त्याच्या व्यावसायिक अनुभवावर विश्वास ठेवला पाहिजे.
तुम्ही अधिक अनुभवी ऍथलिट असाल तर बऱ्याच वेळा तुमच्या कामगिरीची उद्दिष्टे तुम्ही आणि तुमचे प्रशिक्षक मिळून ठरवता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.