तापाचा ‘ताप’

आजकाल घरोघरी तापाचे रुग्ण सापडत आहेत. तापाबरोबरच उलट्या, जुलाब, सर्दी, खोकला, डोके दुखणे, अंग दुखणे वगैरे इतर लक्षणे दिसून येत असली तरी ताप हे मुख्य लक्षण दिसते.
तापाचा ‘ताप’
तापाचा ‘ताप’sakal
Updated on

डॉ. मालविका तांबे

आजकाल घरोघरी तापाचे रुग्ण सापडत आहेत. तापाबरोबरच उलट्या, जुलाब, सर्दी, खोकला, डोके दुखणे, अंग दुखणे वगैरे इतर लक्षणे दिसून येत असली तरी ताप हे मुख्य लक्षण दिसते. कुणाला सर्दी-खोकला झाला, उलट्या-जुलाब झाले तर फारशी चिंता वाटत नाही, परंतु शरीराचे तापमान वाढू लागले तर मात्र डॉक्टरांकडे पळण्याशिवाय दुसरी सोय नसते.

मनुष्य उष्ण रक्ताचा प्राणी आहे, अर्थात त्याच्या शरीरातील चयापचय क्रिया व्यवस्थित होण्यासाठी शरीराचे एक ठराविक तापमान असणे आवश्यक असते. शरीराचे तापमान त्याहून कमी वा जास्त झाल्यास शरीराच्या चयापचय क्रिया बिघडायला लागतात. मानव शरीराचे सामान्य तापमान साधारण ३७ डिग्री सेंटीग्रेड असते. ताप आला आहे असे आपण म्हणतो तेव्हा हेच तापमान ३७.३ पासून ३९ डिग्री सेंटीग्रेडपर्यंत असू शकते. ३९ ते ४१ डिग्रीपर्यंत तापमान असल्यास हाय ग्रेड फीवर असे म्हटले जाते, जो शरीराला अत्यंत धोकादायक ठरू शकतो. काहींना तापमानात बदल नसतानाही ताप आहे असे जाणवत राहते. ताप शरीरात थकवा, मरगळ वगैरे तर आणतोच, पण मेंदू, मज्जासंस्था, शरीरातील चयापचय क्रिया वगैरेंवर चुकीचा परिणाम करतो. म्हणूनच तापाचे कारण काहीही असले तर शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे अत्यंत गरजेचे असते.

आयुर्वेदात तापाला ज्वर असे म्हटलेले आहे. ताप सर्व रोगांमध्ये प्रधान आहे असे सांगितलेले आहे. या रोगाबद्दल सविस्तर मार्गदर्शन आपल्याला संहितांमध्ये दिसते. शरीराचे तापमान वाढविणारा, संताप करविणारा याला ज्वर असे म्हटले आहे. तापमान म्हटले की तेथे अग्नीचा उल्लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. आहार व विहारात केलेल्या चुकांमुळे शरीरातील अग्नी नष्ट होतो, त्यामुळे तयार झालेला आम अर्थात न पचलेला आहाररस हा शरीरातील सर्व स्रोतसांमध्ये फिरतो आणि स्वेदवह स्रोतासाला अवरुद्ध करतो. त्यामुळे शरीराचे तापमान वाढायला लागते. आयुष्यात कधीच ताप आला नसेल अशी माणसे बोटावर मोजण्याइतकीच असतील. ताप आला की भोजनात अरुची निर्माण होते, शरीरात ताकद नाही असे वाटते, त्याचबरोबरीने घाम येत नाही. त्यामुळे आयुर्वेदात ज्वराबद्दल दिलेली माहिती अचूक आहे.

कुठलाही रोग होण्यापूर्वी त्याची काही लक्षणे आयुर्वेदात सांगितलेली आहेत. ज्वर येण्याची पूर्वलक्षणे याप्रमाणे...

  • अंगात जडपणा येणे

  • अंगावर शहारे येणे

  • थकवा जाणवणे

  • मन कशातही न लागणे

  • डोळ्यांमध्ये गरम जाणवणे व डोळ्यांत चटकन पाणी येणे

  • तोंडाची चव नाहीशी होणे

सध्या आढळणाऱ्या तापांची कारणे पाहिली तर बहुतेक वेळा तापाचे कारण बॅक्टेरिया किंवा व्हायरस असते. शरीरात कुठल्याही प्रकारचे संक्रमण झालेले असले, ॲलर्जी असली तर असा प्रकारच्या तापाचा त्रास जास्त प्रमाणात होताना दिसतो. साधारणपणे हा ताप ५ ते ७ दिवस राहतो. आयुर्वेदात अवधीनुसार ताप तीन प्रकारचा सांगितलेला आहे. त्यापैकी नवज्वर म्हणजे नवीन ताप, जो एका आठवड्याच्या आत आहे, तो बॅक्टेरिया वा व्हायरस यांच्यामुळे होणाऱ्या तापासारखा असू शकेल. कॅन्सर, राजयक्ष्मा, शरीरात मोठ्या प्रमाणावर झालेले बॅक्टेरियांमुळे झालेले संक्रमण वगैरे मोठ्या आजारांना जीर्णज्वर अर्थातजास्त दिवस चालणारा ताप असे म्हटले जाते. नवज्वरात चिकित्सेबरोबरच आयुर्वेदाच्या मताने व्यक्तीने जडान्न टाळावे, भूक असेल तेवढेच अन्न घ्यावे, दुपारची झोप, व्यायाम, मैथुन, स्नान, अभ्यंग, राग करणे, हवा असेल अशा ठिकाणी बसणे शक्यतो टाळावे. एक अजून महत्त्वाचे गोष्ट म्हणजे एकाच व्यक्तीला वर्षातून दोनदा ताप आला तर दोन्ही वेळेला तापाची लक्षणे सारखीच असतील असे नव्हे. त्यामुळे व्हायरस ज्वर असे म्हटले तरी त्याची लक्षणे वेगवेगळी असू शकतात.

आयुर्वेदाच्या मतानुसार दोषांच्या संलग्नतेनुसार शरीरावर दिसणारी तापाची लक्षणे बदलतात.

वातदोषामुळे आलेल्या ज्वरात तापाची येण्या-जाण्याची वेळ वा तापमानाचा काही निश्र्चित नियम नसतो, साधारणपणे संध्याकाळी ताप वाढतो असे दिसते, शरीरात सगळीकडे रुक्षता येते, वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना जाणवतात, घसा कोरडा पडतो, झोप येत नाही, कानात हलकेपणा जाणवतो, आवाज सहन होत नाही, झोप येत नाही, खूप थंडी वाजते, सतत उष्णता हवी अशी इच्छा होते.

पित्तदोषामुळे आलेल्या ज्वरात ताप एकदम खूप वाढतो, अंगावर रॅशेस येतात, खूप जास्त प्रमाणात तहान लागते, उलट्या-जुलाब होतात, संपूर्ण शरीराचा आग आग होते आहे असे जाणवते, डोळ्यांची जळजळ होते, थंड पदार्थ खाण्याची इच्छा होते.

कफदोषामुळे आलेल्या ज्वरात अंग जड झाल्यासारखे वाटते, ताप एका नियमित अंतराने येतो, खूप झोप येते, संपूर्ण शरीर ओल्या वस्त्रात गुंडाळून ठेवले आहे अशी भावना रुग्णाला येते, फार प्रमाणात थंडी वाजते, अन्नावरच रुची निघून जाते, सर्दी-खोकला असल्यास मोठ्या प्रमाणावर कफ बाहेर पडतो.

त्यामुळे ज्वराची आयुर्वेदिक चिकित्सा करत असताना मूळ रोगाबरोबर दोषसंलग्नतेचा विचारही करावा लागतो.

तापावरचे उपाय

कुठल्याही तापामध्ये विश्रांती घेणे गरजेचे असते. प्रत्यक्षातही आपल्या पाहण्यात येते की ताप उतरला व लगेच श्रम केले तर ताप उलटतो. त्यामुळे किमान ताप असेपर्यंत आराम केलेलाच बरा.

तुळशीची १-२ पाने दिवसभरात २-३ वेळा चावून खाणे हे सुद्धा तापामध्ये मदत करू शकते.

ताप आल्यावर जडान्न पूर्णपणे वर्ज्य करावे. शक्यतो आले व मीठ घालून लाल तांदळाची पेज, साळीच्या लाह्यांची पेज, तांदूळ व मुगाची मऊ खिचडी खाण्यात ठेवावी. या सगळ्यांत साजूक तूप घालून खाल्ल्यास पचनशक्ती सुधारायला मदत मिळते.

तापात शक्यतो षडंगोदक (नागरमोथा, वाळा, रक्तचंदन वगैरेंबरोबर तयार केलेले जलसंतुलन घालून उकळलेले पाणी) पिणे जास्त उत्तम. पित्ताशी संबंधित लक्षणे असणाऱ्यांनी उकळलेले पाणी सामान्य तापमानाचे झाल्यावर प्यावे.

धणे, तुळस, सुंठ प्रत्येकी अर्धा अर्धा चमचा चार ग्लास पाण्यात घालून पाच मिनिटे उकळावे. नंतर गाळून घेऊन प्यावे. हे पाणी सुद्धा तापात उत्तम ठरते.

तोंडात चव नसली, तोंडात खूप कडवटपणा जाणवत असला, भूक लागत नसली तर तुळशीच्या पानांचा रस चवीपुरते मध घालून सकाळ-संध्याकाळ घेण्याने तापात फायदा मिळतो.

मोसंबी, डाळिंब, द्राक्षे, मनुका ही फळे तापात घेतली तर चालू शकतात.

तापात खूप तहान लागत असल्यास डाळिंबाचा रस एक एक घोट थोड्या थोड्या वेळाने घेण्याचा फायदा होतो.

त्रासाप्रमाणे गरज असल्यास सॅन अमृत काढा, किंवा फॉर्म्युला क२ पासून बनविलेला काढा घेता येतो.

ज्वर असताना तुळस, निर्गुडी, ओवा यांचा काढा करून त्यात पाय बुडवावेत. तसे शक्य नसल्यास कोमट पाण्यात पाय बुडवून १०-१२ मिनिटे बसले (तापमान नियंत्रित करण्यासाठी त्यात थोडेथोडे गरम पाणी घालावे) तरी ताप उतरायला मदत मिळते.

पोटात, डोक्यावर दाह जाणवत असला तर चंदनाच्या पेस्टचा लेप करावा.

तापात अंगावर पित्त उठत असल्यास त्यावर शतधौतघृत लावण्याची, हळद मिसळून कोरफडीचा गर लावण्याची, कडुनिंबाच्या पानांचा कल्क लावण्याची मदत होऊ शकते.

तापामध्ये स्नान निषिद्ध असले तरी कोमट पाण्याने स्पंजिंग नियमित करावे. यामुळे घाम यायला मदत मिळते. रिठा पाण्यात उकळून त्या पाण्याने स्पंजिंग करावे.

रोज न चुकता संतुलन पादाभ्यंग घृत लावून काशाच्या वाटीने पादाभ्यंग करावा.

गुडूची ही वनस्पती तापात गुणकारी ठरते, तिचा वापर नक्की करावा.

ताप जास्त प्रमाणात चढला असला तर डोक्यावर, पोटावर, बगलेत सामान्य तापमानाच्या पाण्यात बुडविलेल्या पट्ट्या ठेवाव्या. या पाण्यात थोडे मीठ घातले तरी चालू शकते. ओली पट्टी तेथील भागाची उष्णता शोषून घेते, त्यामुळे ताप कमी व्हायला मदत मिळते.

ज्या कारणामुळे ताप आला आहे त्या मूळ कारणावरही काम करणे गरजेचे असते. तापामुळे खूप थकवा येत असल्यामुळे गोळी घेऊन ताप लगेच उतरवावा असा समज सध्या प्रचलित आहे. शरीरात काहीतरी चुकीचे होते आहे हे निदर्शनास आणून देणाऱ्या तापाचे आपण कधीतरी तोंड बंद करून टाकतो. ताप हे रोगाचे एक लक्षण आहे. कधीतरी ताप समोरच्या जंतूंशी लढण्यासाठी गरजेचा असतो. त्यामुळे आलेल्या तापाचा ‘ताप’ न घेता त्यावर विचारपूर्वक औषधोपचार केले तर जास्त उत्तम ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com