
बालमित्रांनो कालच्या भागात आपण ध्वनिप्रदूषणाची माहिती घेतली. आपण आज आवाजाची पातळी म्हणजे काय हे पाहणार आहोत.
हाक वसुंधरेची : आवाजाची पातळी
- अशोक तातुगडे
बालमित्रांनो कालच्या भागात आपण ध्वनिप्रदूषणाची माहिती घेतली. आपण आज आवाजाची पातळी म्हणजे काय हे पाहणार आहोत.
आवाजाची पातळी डेसिबल या एककामध्ये मोजतात. या निर्देशित सुरक्षित पातळ्या अशा आहेत..
औद्योगिक क्षेत्र - ७०-७५
व्यावसायिक क्षेत्र - ५५-६५
निवासी क्षेत्र - ४५-५५
शांतता क्षेत्र ( हॉस्पिटल शाळा आदी) - ४०-५०
या पातळ्यांवरील आवाज धोकादायक आहेत. काही धोकादायक आवाज असे आहेत. लाउड स्पीकर १२० डेसिबल, जेट विमान १४० डेसिबल, अग्निबाण सोडतानाचा आवाज १८० डेसिबल. आवाजाच्या ध्वनी प्रदूषणामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतात. हे आता संशोधनाने सिद्ध झाले आहे. व्यक्तीचा स्वभाव चिडचिडा होणे, रात्री झोप न लागणे, डोकेदुखीची व्यथा उत्पन्न होणे, मनोबलावर परिणाम होणे, निराशा वाटणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, या बरोबरच रक्तदाब वाढणे, हृदयरोग निर्माण होणे, कामातील कार्यक्षमता कमी होणे या दुष्परिणांची नोंद झालेली आहे.
आता आपण ध्वनी प्रदूषणाचे स्रोत कुठले आहेत ते पाहू या...
1) नैसर्गिक स्रोत - ढगांचा गडगडाट, वादळ, भूकंप, विजांचा कडकडाट आदी यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. परंतु अशावेळी शक्यतो कानावर हात ठेवून किंवा त्या आवाजापासून सुरक्षित वाटेल अशा ठिकाणी, म्हणजेच बंद खोलीत जाऊन आपण त्रास काही प्रमाणात नियंत्रित करू शकतो.
2) मानवनिर्मित स्रोत - कारखान्यातील मशिन्स, स्वयंचलित वाहने व त्यांचे विनाकारण वाजवलेले हॉर्न, मनोरंजनाचे साधने, लाऊड स्पीकर्स डीजे आदी. पुढील भागात ध्वनी प्रदूषण टाळण्याचे काही उपाय पाहूयात.