
डॉ. बालाजी तांबे
भारताचा २६ जानेवारी हा गणतंत्र दिवस. भारत देश स्वतंत्र झाल्यावर सर्व लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीद्वारा म्हणजेच लोकांनी लोकांसाठी लोकांचे राज्य चालविण्यासाठी आवश्यक असणारी घटना ज्या दिवशी प्रत्यक्षात आली, तो दिवस म्हणजे गणतंत्र दिवस किंवा प्रजासत्ताक दिवस. लोकशाहीमध्ये सर्वांनी एकमेकांच्या सहयोगाने काम करायचे असते आणि देशाची अंतर्गत व्यवस्था, परराष्ट्रांबरोबरचे संबंध सुधारत नेत देशाला, देशातील लोकांना प्रगत करायचे असते. आपले शरीरही याच तत्त्वावर चालत असते. म्हणून आयुर्वेदाने शरीराची व्याख्या केली ती अशी,
तत्र शरीरं नाम चेतनाधिष्ठानभूतं पञ्चमहाभूतविकारसमुदायात्मकं समयोग वाहि च।
चैतन्यतत्त्व अर्थात आत्मा, त्याच्या आधाराने असणारे मन, बुद्धी, अहंकार, इंद्रिये ही सूक्ष्म तत्त्वे आणि पंचमहाभूतांपासून तयार झालेले स्थूल शरीर यांच्या समुदायाला, यांच्यातील समयोगाला, यांच्यातील सुसंवादाला ‘शरीर’ असे म्हणतात. कोणत्याही कारणामुळे यांच्यातील सुसंवाद बिघडला, तुटला तर शरीराचे तंत्र बिघडते, शरीराच्या अस्तित्वावरही गदा येऊ शकते.