

Ayurvedic wellness tips
esakal
डॉ. मालविका तांबे
मराठी भाषेमध्ये तंत्र या शब्दाचे अनेक अर्थ असतात. सध्याच्या काळात टेक्नॉलॉजी अर्थात तंत्रज्ञान हा शब्द सगळ्यांना जास्त परिचयाचा आहे. खरंतर तंत्र म्हणजे कुठल्याही कार्याला करण्याची पद्धत किंवा विशिष्ट विधी. ही पद्धत किंवा कार्यप्रणाली त्या कार्याला व्यवस्थित करण्याचं एक एसओपी (SOP) असतं. देशाची कार्यप्रणाली व्यवस्थित राहावी, सगळं सुचारू रूपाने चालावे, त्याच्याकरिता गणतंत्र असतं. तसंच शरीराचं व मनाचं आरोग्य व्यवस्थित राहावं, त्याच्याकरिता आरोग्याचं तंत्रसुद्धा समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे.
आयुर्वेदामध्ये स्वस्थ वृत्त, दिनचर्या, आहाराचे, औषधाचे नियम अशा अनेक वेगवेगळ्या पद्धतीने आरोग्य कसे जपावे याबद्दल मार्गदर्शन केलेले आढळते. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुर्वेद हे आयुष्याचे शास्त्र असल्यामुळे फक्त स्वतःचं शारीरिक आरोग्य कसे जपावे, याबद्दलच मार्गदर्शन नसून मानसिक आरोग्य, आपल्याशी संबंधित असलेल्या लोकांचे मानसिक आरोग्य व तसेच सामाजिक सुव्यवस्था व सामाजिक स्वास्थ्य कसे जपावे याबद्दलही आपल्याला आयुर्वेद शास्त्रात मार्गदर्शन सापडतं.