

Ayurvedic Garbha Sanskar combines Beej Sanskar, Panchakarma, nutrition, yoga, and positive lifestyle for healthy pregnancy and baby development.
Sakal
डॉ. मालविका तांबे
कुठल्याही आयुष्याची सुरुवात होते ते आई- वडिलांच्या बीजापासून अर्थात शुक्राणू (स्पर्म) आणि बीजांडापासून. स्त्री आणि पुरुष बीज हे होणाऱ्या बाळाचं संपूर्ण भवितव्य अर्थात त्याचे आयुर्मान, आरोग्य, त्याची मानसिकता, त्याचे व्यक्तिमत्त्व या सगळ्याचा महत्त्वाचा पाया असते. म्हणूनच आयुर्वेदामध्ये गर्भधारणेच्या आधी बीज संस्कारांना खूप महत्त्व दिलेलं आहे. गर्भ संस्काराची सुरुवातच बीज संस्कारातून होते. त्या बीजांमध्ये असलेल्या गुणवत्ता वाढवणं, संपन्नता वाढवणं. स्त्री पुरुषांमध्ये असलेले जे चांगले गुण आहेत त्याचा उत्कर्ष व्हावा व जे दोष आहेत ते कमी व्हावे किंवा कमीत कमी पुढच्या संततीमध्ये जावे याकरिता बीज संस्कारातून प्रयत्न करता येऊ शकतो. सध्याच्या काळामध्ये डिजायनर बेबी ही संकल्पना बऱ्याचशा नामवंत लोकांमध्ये दिसते आहे. ह्याच्यामध्ये जन्मापूर्वीच बाळाच्या जनुकीय रचनेमध्ये अशा प्रकारचे विशिष्ट बदल केले जातात. जेणेकरून एखादा गुण किंवा विशिष्ट लक्षण बाळामध्ये मिळावं. उदाहरणार्थ, निळे डोळे किंवा अानुवांशिक आजारांपासून वाचविण्यासाठीसुद्धा याच्यामध्ये कार्य केले जाते.