

Diet & Hydration Decoded: How Many Meals Do You Really Need?
Sakal
प्रश्न : अन्नाचे पचन नीट होण्यासाठी दिवसभरातून किती वेळा आहार घ्यावा? सोशल मीडियावर याबद्दल वेगवेगळी मते ऐकायला मिळतात. काही जण दर दोन तासांनी खाण्यास सांगतात, तर काही जण दिवसातून फक्त दोनच वेळा भोजन करण्यास सांगतात. तसेच, पाणी पिण्याचे प्रमाण किती असावे, हेही कृपया सांगावे.
- रेखा पांडे, सांगली.
उत्तर: अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यासाठी सर्वसाधारण व्यक्तीने दिवसभरातून तीन ते चार वेळा आहार घेणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, सकाळी एकदा गरम नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळी चहा आणि अल्पोपाहार (न्याहारी) आणि शेवटी रात्रीचे जेवण. रात्रीचे जेवण नेहमी हलके असावे आणि ते फार उशिरा घेऊ नये. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे भूक लागल्यावरच खाणे. ज्यांची पचनशक्ती उत्तम आहे आणि ज्यांना पित्त किंवा आम्लपित्ताचा (ॲसिडिटी) त्रास नाही, अशा व्यक्तींना दिवसातून दोन वेळा जेवणेही चालू शकते. आपल्याकडे म्हटले जाते की, ‘दिवसातून एकदा जेवणारा तो योगी’; त्यामुळे भूक लागल्यावर जेवणे आणि जेवणानंतर कोणताही त्रास होत नाही ना, याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. आजारपणात किंवा लहान मुलांच्या बाबतीत दर दोन तासांनी काहीतरी खाणे इष्ट ठरू शकते. थोडक्यात, स्वतःचे वय, प्रकृती आणि पचनशक्ती लक्षात घेऊन दिवसातून दोन ते तीन वेळा आहार घेणे योग्य ठरते. पाणी पिण्याचे प्रमाणही प्रकृती आणि वयावर अवलंबून असते. तरीही सामान्यतः दीड ते अडीच लिटर पाणी सर्वांना लागते. जेवताना मध्ये मध्ये घोट घोट पाणी पिणे पचनासाठी हितकारक ठरते.