अतिरिक्त रक्तस्राव आणि जखम होत असल्यास सावध व्हा ! ही आहेत या आजाराची लक्षणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Immune thrombocytopenia

अतिरिक्त रक्तस्राव आणि जखम होत असल्यास सावध व्हा ! ही आहेत या आजाराची लक्षणे

मुंबई : जागतिक आयटीपी (Immune thrombocytopenia) जागरुकता महिन्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील अग्रगण्य आरोग्यकर्मींनी रक्तातील प्लेटलेट्सची संख्या खूप कमी झाल्याने उद्भवणा-या या रक्ताच्या या ऑटोइम्युन आजाराविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर भर देण्याची गरज आहे.

इम्युन थ्रॉम्बोसायोपीनिया (आयटीपी) या व्याधीचे प्रमाण दर १००,००० व्यक्तींमागे १.६ ते ३.९ इतके आहे. हा आजार होण्याची शक्यता वाढत्या वयासोबत वाढत जाते आणि स्त्रियांना तो होण्याची शक्यता काहीशी प्रबळ असते.

ही एक दुर्धर व्याधी आहे व त्यासाठी रुग्णाला आयुष्यभर औषधोपचार सुरू ठेवावे लागतात आणि म्हणूनच तज्ज्ञ या व्याधीच्या सुयोग्य व्यवस्थापनावर भर देतात. (Immune thrombocytopenia)

नवी मुंबई येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे कन्सल्टन्ट हिमॅटोलॉजिस्ट आणि हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट डॉ. प्रथमेश कुलकर्णी सांगतात, “ITP हा रक्ताचा एक ऑटोइम्युन प्रकारातील आजार आहे, ज्यात शरीराची रोगप्रतिकारयंत्रणा प्लेटलेट्सना नष्ट करते.

यामुळे प्लेटलेट्सची संख्या खूप कमी होते व परिणामी शरीराला जखमा होतात किंवा रक्तस्त्राव होतो. या आजारामध्ये रुग्णाला कुठे मार लागल्यास, आपटल्यास किंवा पडल्यास त्वचेखाली असलेल्या लहान लहान रक्तवाहिन्यांची हानी होते व ती जागा काळीनिळी पडल्यासारखी दिसते.

बरेचदा यात चिंता करण्यासारखे काही नसते. पण सहजासहजी जखम होत असेल किंवा कोणत्याही आघाताशिवाय जखम होत असेल तर मात्र रक्तामध्ये गुठळी होणे किंवा एखादा रक्तदोष असे एखादे कारण त्याच्या मुळाशी असू शकते.

लहान मुलांच्या बाबतीत आयटीपी हा सर्वसाधारणपणे एक सौम्य स्वरूपाचा आजार असतो व तो आपोआपच बरा होतो. प्रौढ व्यक्तींना मात्र गंभीर स्थितीमध्ये उपचारांची गरज भासू शकते. अशा व्यक्तींच्या बाबतीत एकतर हा आजार बरा होऊ शकतो किंवा गंभीर रूप धारण करू शकतो.

काही वेळा कोणतीही लक्षणे न जाणवणा-या व्यक्तीने रक्तघटकांची तपासणी करून घेतल्यावर प्लेटलेट्सची संख्या घसरल्याचे आढळून येऊ शकते. आजाराचे हे स्वरूप लक्षणविरहित असते. या आजाराच्या बाबतीत एक गोष्ट अनेकदा निदर्शनास येते, ती म्हणजे प्लेटलेट्सच्या सतत बदलत राहणा-या संख्येमुळे रुग्ण हवालदिल होऊन जातात.

रुग्ण सतत चाचण्या करून घेत राहतात आणि त्या चाचण्यांचे निष्कर्ष हाती आले की त्यानुसार स्वत: काहीबाही औषधे घेतात. यामुळे या स्थितीच्या व्यवस्थापनामध्ये बाधा येते, काही वेळा स्थिती आणखी बिघडू शकते.

या आजारात प्लेटलेट्सची संख्या कमी-जास्त होत राहते आणि त्यातील किरकोळ बदलांची काळजी करण्याची गरज नाही ही गोष्ट ITP च्या रुग्णांनी ध्यानात घेतली पाहिजे. त्याऐवजी त्यांनी सांगितलेल्या उपचारपद्धतीचे काटेकोर पालन केले पाहिजे आणि आपल्यावर उपचार करणा-या फिजिशियन्सशी चर्चा करूनच चाचणी करून घेतली पाहिजे.”

ग्लोबल हॉस्पिटल, मुंबई येथील कन्सल्टन्ट हिमॅटोलॉजी अँड बोन मॅरो ट्रान्स्प्लान्ट (BMT) डॉ. श्रीनाथ क्षीरसागर सांगतात, “आयटीपी हा एक दीर्घकाळ बरा न होणारा आजार आहे, ज्यात रुग्णाला आयुष्यभर उपचार घेत रहावे लागतात. रक्तघटकांच्या प्रमाणाचे नियमितपणे मूल्यमापन केल्यास रुग्णाच्या स्थितीचा आढावा घेणे शक्य होते आणि त्याला सर्वोत्तम उपचारपद्धती सुचवता येते.

काही रुग्णांच्या बाबतीत इतर लक्षणांच्या तुलनेत काही विशिष्ट लक्षणे अधिक तीव्र प्रमाणात आढळून येतात आणि आजाराचे व्यवस्थापन करताना संबंधित रुग्णावर उपचार करणा-या फिजिशियन्सनी ही बाब विचारात घेणे महत्त्वाचे आहे.

प्लेटलेट्सची संख्या जितकी कमी तितकाच रक्तस्त्रावाचा धोका अधिक असतो. याखेरीज रुग्णांना जांभळट व्रण दिसणे (Purpura) चट्ट्यासारखे दिसणारे छोटे लहान ठिपके दिसणे, मासिक पाळीमध्ये खूप रक्त जाणे, थकवा आणि नाकातून रक्त येणे यांसारखी काही वेगळी लक्षणेही जाणवू शकतात.

तसेच या स्थितीची काही लक्षणे ही इतर आजारांच्या लक्षणांसारखीही दिसू शकतात. आणि म्हणूनच योग्य निदानासाटी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरते. काही रुग्णांच्या बाबतीत यातील काही लक्षणांची तीव्रता अधिक असू शकतो आणि अशावेळी उपचार करणा-या डॉक्टरांनी आजाराच्‍या व्यवस्थापनासाठी ही बाब लक्षात घेतली पाहिजे.”

सर्वसाधारणपणे आयटीपीवरील उपचारांमध्ये तोंडावाटे घ्यायच्या औषधांचा समावेश होतो. गंभीर प्रकरणांमध्ये प्लेटलेट्स चढवावे लागतात आणि त्यांना इन्ट्राव्हेनस इम्युन ग्लोब्युलिन (IVIG) देण्याचा सल्ला दिला जातो.

तसे पहायला गेले तर आयटीपी ही काही प्राणघातक स्थिती नाही आणि या आजाराचे बहुतांश रुग्ण सर्वसामान्य आयुष्य जगतात. जीवनशैलीत काही बदल करून आणि योग्य उपचार घेऊन या आजाराचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करता येते.

काही प्रकरणांमध्ये रुग्णांना प्लेटलेट्सवर परिणाम करणारी काही विशिष्ट औषधे टाळण्याचा सल्ला दिला जातो. काही सौम्य प्रकरणांमध्ये केवळ नियमित देखरेख ठेवली जाते व लगेचच उपचार सुरू केले जात नाहीत.

Web Title: Be Careful If There Is Additional Bleeding And Bruising These Are The Symptoms Of Immune Thrombocytopenia Disease

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..