Breast cancer : स्तनाच्या कर्करोगावर नवी उपचार पद्धती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Breast cancer treatment methods for breast cancer kolhapur

Breast cancer : स्तनाच्या कर्करोगावर नवी उपचार पद्धती

कोल्हापूर : लवकर निदान झालेल्या स्तनाच्या कर्करोगात रुग्णांना शस्त्रक्रियेपूर्वी गाठीच्या आसपास सर्व बाजूने भूल दिल्यास त्याचे उत्तम परिणाम पाहायला मिळत असल्याचे संशोधनाअंती आढळले आहे. गेल्या अकरा वर्षांच्या कालावधीत ११ रुग्णालयांनी रुग्णांवर केलेल्या संशोधनावरील अभ्यासाचे निष्कर्ष टाटा मेमोरियल सेंटरतर्फे पॅरिस येथे झालेल्या युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कॉलॉजी (ESMO) वैद्यकीय परिषदमध्ये सादर करण्यात आले. यात कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे चेअरमन डॉ. सूरज पवार यांचा मोलाचा वाटा आहे.

टाटा मेमोरियल सेंटरचे डायरेक्टर डॉ. राजेंद्र बडवे यांनी संशोधन सादर केले. या संदर्भात ते म्हणाले, ‘‘संशोधनामध्ये एकूण १६०० पैकी ८०० महिला रुग्णांवर नवीन उपचार पद्धतीने शस्त्रक्रिया केली. उर्वरित ८०० महिलांवर जुन्या पद्धतीने शस्त्रक्रिया झाली. या सर्व रुग्णांच्या प्रकृतीचा सलग ११ वर्षे पाठपुरावा करण्यात आला. त्या अभ्यासातून आशादायक निष्कर्ष पुढे आले आहेत. या पुढे स्तनाच्या कर्करोगामध्ये याच पद्धतीने शस्त्रक्रिया केल्या जाव्यात, यासाठी नियमावली तयार करण्यात येणार आहे.’’

या संशोधनांतर्गत टाटा मेमोरियल सेंटरच्या खालोखाल कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये १२६ रुग्णांवर उपचार केले. या सेंटरमध्ये क्लिनिकल रिसर्च विभाग गेली ११ वर्ष कार्यरत आहे. तेथे विविध प्रकारच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्लिनिकल ट्रायल केल्या जातात. कोल्हापूर कॅन्सर सेन्टरचे चेअरमन डॉ. सूरज पवार हेच प्रिंसिपल इन्वेस्टिगेटर म्हणून क्लिनिकल रिसर्च विभागामध्ये कार्यरत आहेत.

नवीन उपचार पद्धती काय आहे

कर्करोगाच्या गाठीवरील शस्त्रक्रिया करीत असताना रुग्णाला भूल दिली जाते; मात्र नवीन पद्धतीमध्ये संपूर्ण भूल देण्याबरोबरच गाठीच्या आसपास सर्व बाजूने इंजेक्शनने भूल देऊन गाठीतील पेशींचे विभाजन व हालचाल थांबवली जाते. भुलीचे इंजेक्शन दिल्यानंतर पाच मिनिटे थांबून मग शस्त्रक्रिया केली जाते. हा छोटासा प्रयोग चांगला प्रभावी उपाय असल्याचे आढळून आले आहे. जागतिकस्तरावर अशाप्रकारचा पहिलाच अभ्यास आहे. या प्रयोगामुळे कर्करोग पुन्हा होण्याचे प्रमाण चार टक्क्यांनी कमी झाले आहे. मृत्यूचा धोकादेखील कमी झाला आहे.

दृष्टिक्षेपात

० भारतात दरवर्षी सुमारे एक लाख ८० हजार नवे स्तनाचे कर्करोग रुग्ण

० यात सर्वाधिक महिला रुग्णांचा समावेश

० दर एक लाख महिलांमागे २६ महिलांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका

गेल्या ११ वर्षांच्या कालावधीत स्तनाच्या कर्करोगाचे निदान लवकर झालेल्या १६०० महिलांवर पद्धतीचा प्रयोग केला. मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरसह भारतात निवडक ११ कर्करोग केंद्रांवर संशोधकांनी हे संशोधन केले आहे. या ११ सेंटरपैकी कोल्हापूर कॅन्सर सेंटर हे अग्रगण्य सेंटर आहे.

- डॉ. सूरज पवार, कोल्हापूर कॅन्सर सेंटर

या संस्थांमध्ये संशोधन

टाटा मेमोरियल सेंटर (मुंबई), कोल्हापूर कॅन्सर सेंटर (कोल्हापूर), मॅक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल (न्यू दिल्ली), बी. बोरोह कॅन्सर इन्स्टिट्यूट (गुवाहाटी), बसवतरकम इंडो-अमेरिकन कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च (हैदराबाद), गुजरात कॅन्सर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (अहमदाबाद), मलबार कॅन्सर सेंटर कोदेरी थलॅरसी (कन्नूर ), सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल (मिरज), स्टर्लिंग मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (पुणे), नॉर्थ ईस्टर्न इंदिरा गांधी रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड मेडिकल सायन्स (शिलाँग), ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (न्यू दिल्ली).

स्वस्तात उपचार पद्धती

कर्करोगावरील सर्व उपचार केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेतून मोफत केले जातात. नव्या उपचार पद्धतीसाठी केवळ १०० रुपये खर्च येतो. इतर सर्व उपचार पद्धती मोफत केल्या जात असल्याचे डॉ. सूरज पवार यांनी सांगितले.

Web Title: Breast Cancer Treatment Methods For Breast Cancer Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..