
कर्करोग पूर्णविराम नव्हे, अर्धविराम!
औरंगाबाद : कर्करोग म्हटले, की डोळ्यांसमोर उभा राहतो तो मृत्यू. त्यात ब्लड कॅन्सर (रक्ताचा कर्करोग) म्हटला, की कुटुंबच हतबल होते. पण, यात समाधानाची बाब अशी, की बालरुग्ण बरे होण्याचे प्रमाण तब्बल ८० टक्के आहे. त्यामुळे कर्करोग हा पूर्णविराम नव्हे तर अर्धविराम आहे. बालकांमधील रक्ताचा कर्करोग बरा होत असून रुग्ण सर्वसामान्यांसारखे जीवन जगू शकतो. याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. आत्मविश्वास आणि योग्य उपचारामुळे हे शक्य असल्याचे औरंगाबादेतील रक्तविकार व कर्करोगतज्ज्ञ डॉ. तुषार बालमुकुंद इधाटे यांनी सांगितले.
दारू आणि सिगारेट हे घटक कर्करोगाच्या काही कारणांपैकी मुख्य आहेत. विविध प्रकारच्या रक्ताच्या कर्करोगासाठी केवळ एकच असे कारण ज्ञात नाही. आनुवंशिक कारणांसह पर्यावरणातील प्रतिकूल घटकही त्याला कारणीभूत असतात. आता रक्ताच्या कर्करोगावर आधुनिक उपचार आहेत. त्यामुळे प्राथमिक काळात म्हणजे पहिल्या टप्प्यात जर बालकांमधील रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले, तर रुग्ण सात-आठ महिन्यांत उपचारानंतर पूर्णपणे बरा होऊन पुढील आयुष्य सर्व सामान्य व्यक्तींप्रमाणे निरोगी जगू शकतो. पुढे त्याच्या वैवाहिक आयुष्यातही काही अडथळा येत नाही. मोठ्या व्यक्तींच्या तुलनेत लहान मुलांमधील (शून्य ते अठरा वयोगटातील) कर्करोग बरा होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. योग्य उपचारानंतर ७० ते ८० टक्के बालके पूर्णपणे बरे होतात, अशी माहितीही डॉ. इधाटे यांनी दिली.
अनेक प्रकार
कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. त्यात प्रामुख्याने रक्ताच्या कर्करोगामध्ये ल्युकेमिया आणि लिम्फोमा हे दोन प्रमुख प्रकार आहेत. या व्यतिरिक्त मेंदूचा, मूत्रपिंडाचा, यकृताचा, हाडांचा असे इतर अवयवांचाही कर्करोग होऊ शकतो. लहान मुलांमध्ये रक्ताचे कर्करोग होण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. ही चिंताजनक बाब असली, तरी हा आजार पूर्णपणे बरा होतो.
कर्करोग म्हणजे नेमके काय?
आपल्या शरीरात पेशी तयार होतात आणि ठराविक कालावधीनंतर मृत पावतात. परंतु, काही बिघडलेल्या मूळ पेशी अनिर्बंध वाढत जातात, त्यालाच कर्करोग म्हणतात.
दरवर्षी १५० ते २०० नवीन रुग्ण
बालकांमधील रक्ताच्या कर्करोगावरील उपचारासाठी पूर्वी मुंबईला जावे लागायचे. मात्र, औरंगाबादेत शासकीय कर्करोग तसेच खासगी कर्करोग निदान आणि उपचाराचे दवाखाने सुरू झाल्यमुळे मराठवाड्यातील रुग्णांना उपचार मिळत आहेत. यात शासकीय कर्करोग रुग्णालयात वर्षभरात १०० तर खासगी रुग्णालयात १०० अशा एकूण दोनशे बालकांवर उपचार केले जातात. विशेष म्हणजे यात बरे होणाऱ्यांचे प्रमाण ८० टक्क्यांच्या जवळपास आहेत. या संदर्भात जनजागृती होणे गरजेचे आहेत, असेही डॉ. इधाटे यांनी नमूद केले.
बालकर्करोगाची ही आहेत लक्षणे
ताप येणे, वजन कमी होणे, रक्त कमी होणे, शरीरात गाठी येणे, लाल डाग येणे, पोट फुगणे, हाता-पायांवर काळे चट्टे दिसणे, सांधेदुखी अशी लक्षणे आढळून आल्यानंतर तात्काळ उपचारासाठी डॉक्टरांकडे जा, असे डॉ. इधाटे यांनी सांगितले.
कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यासाठी आता वैद्यकीय शास्त्रामधील आधुनिक उपचार आहेत. विशेषतः लहान मुलांचा कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे घाबरून जाऊ नये. डॉक्टरांवर विश्वास ठेवून त्यांच्या सल्ल्याने उपचार घ्यावे. मागील सहा वर्षांत अशी शेकडो बालके आमच्या टीमने बरी केली आहेत.
- डॉ. तुषार इधाटे, लहान मुलांचे रक्तविकार आणि कर्करोगतज्ज्ञ, औरंगाबाद.
माझी मुलगी दहावीत आहे. वर्षभरापूर्वी तिला रक्तकर्करोगाचे निदान झाले. सुरवातीला खूप भीती वाटली. सगळे संपले असे वाटले. पण, औरंगाबाद येथे उपचार घेतले. आज ती पूर्णपणे बरी झाली.
- एक पालक, कन्नड, जि. औरंगाबाद.
मी डॉक्टर आहे. माझ्या मुलाला आठ महिन्यांपूर्वी रक्ताचा कर्करोग झाल्याचे लक्षात आले. खचलो नाही. सुरुवातीला मुंबई-नाशिकमध्ये उपचार घ्यावे असा विचार होता. पण, डॉक्टर मित्रांच्या सल्ल्याने औरंगाबादमध्येच डॉ. इधाटे यांच्याकडे उपचार घेतले. आज मुलगा बरा झाला.
-एक पालक