Mental Health : भावना, संभ्रम आणि योग्य निर्णय

Relationship Counseling : प्रसिद्ध समुपदेशक डॉ. स्मिता जोशी यांनी वैवाहिक आयुष्यातील शारीरिक जवळीकीचा अभाव आणि तरुण वयातील प्रेमसंबंधांतून निर्माण होणारी गुंतागुंत यांवर मार्गदर्शन केले. संवाद, व्यावसायिक मदत आणि भावनिक परिपक्वता या त्रिसूत्रीद्वारे नात्यातील समस्या सोडवण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
Relationship Counseling

Relationship Counseling

sakal

Updated on

डॉ. स्मिता प्रकाश जोशी समुपदेशक

प्रश्‍न : माझे वय २८ वर्षे आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये माझे लग्न झाले. परंतु आमच्या दोघांत अद्यापही शारीरिक संबंध प्रस्थापित झालेले नाहीत. माझा पती याबाबत कोणताही पुढाकार घेत नाही आणि मी हा विषय काढला तर तो टाळाटाळ करतो. मला काय करावे ते समजत नाही. मी माझ्या किंवा त्याच्या घरी याविषयी बोलायला हवे का? मला योग्य मार्गदर्शन करावे.

उत्तर : तुमचा प्रश्‍न अतिशय संवेदनशील आहे. लग्नानंतर शारीरिक जवळीक न होणे ही गोष्ट मनाला अस्वस्थ करणारी असू शकते. समाजमान्य पद्धतीने शारीरिक संबंध प्रस्थापित करणे हा लग्नाचा एक महत्त्वाचा उद्देशही असतो. परंतु ही समस्या अनेक जोडप्यांमध्ये दिसून येत आहे. ती असामान्य नाही, पण दुर्लक्षितही ठेवू नये.

लग्नानंतर पती-पत्नीत बरेच दिवस शारीरिक संबंध न होण्याची अनेक कारणे असू शकतात. लग्नाचा निर्णय व स्वीकार मनापासून झालेला नसणे, लैंगिक भीती (परफॉर्मन्स अँग्झायटी), शारीरिक अडचण, हॉर्मोनल समस्या, ताणतणाव, मानसिक दडपण, पूर्वानुभव किंवा कधी कधी लैंगिक अभिमुखतेबाबतचा (सेक्शुअल ओरिएंटेशन) गोंधळही.

यांपैकी कोणतेही कारण असू शकते. तुमचा पती पुढाकार घेत नाही आणि विषय टाळतो, याचे नक्की कोणते कारण आहे हे शोधणे महत्त्वाचे आहे. यासाठी त्याच्याशी शांतपणे संवाद साधणे आवश्यक आहे. आरोप न करता व दोष न देता. तुमच्या नात्यात जवळीक नसल्यामुळे तुम्हाला भावनिकदृष्ट्या एकटे वाटते, हे त्यांना जरूर सांगा. तुमच्या भावनिक आणि शारीरिक गरजा योग्य आहेत. त्याबद्दल अपराधी वाटून घेऊ नका.

गरज भासल्यास पुरुषरोग तज्ञ/ ‘एंडोक्रायनोलॉजिस्ट’ यांच्याकडून तपासणीही उपयुक्त ठरू शकते. जर पती पुन्हा विषय टाळत असेल, तर जोडप्यांसाठीचे समुपदेशन किंवा ‘सेक्स थेरपिस्ट’ची मदत सुचवा. अनेकदा व्यावसायिक मदतीने प्रश्‍न सुटतो.

हा अत्यंत खासगी प्रश्‍न असल्यामुळे तो सुरुवातीला दोघांमध्येच सोडवण्याचा प्रयत्न करा. थेट दोन्ही घरांत सांगितल्यास परिस्थिती ताणली जाऊ शकते. परंतु जर पती काहीच ऐकून घेत नसेल आणि याबाबत बोलतच नसेल, तर समुपदेशकाच्या माध्यमातून चर्चा करण्याचा विचार करू शकता. लक्षात ठेवा, तुमची समस्या लपवून ठेवण्यापेक्षा योग्य मार्गाने हाताळली तर नाते अधिक मजबूत होऊ शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com