esakal | कोरोनाला हरवायचे आहे? या योगाभ्यासाची होईल मदत

बोलून बातमी शोधा

कोरोनाला हरवायचे आहे? या योगाभ्यासाची होईल मदत

कोरोनाला हरवायचे आहे? या योगाभ्यासाची होईल मदत

sakal_logo
By
नंदिनी नरेवाडी - पाटोळे

कोल्हापूर : श्‍वास आणि योग यांचा जवळचा संबंध आहे. योगाद्वारे श्‍वासावर नियंत्रण मिळवता येते. शास्त्रोक्त पद्धतीने योग केल्यास श्‍वसनक्रिया बळकट होते, असा पूर्वापार अनुभव योगतज्ज्ञांकडून व्यक्त केला जातो. कोरोना संसर्ग झाल्यास बऱ्याच रुग्णांमध्ये ऑक्‍सिजनची पातळी कमी होते. फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढल्यास ऑक्‍सिजनची पातळी योग्य राहते.

कोरोना काळातही तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या औषधोपचारांसोबत योगाची जोड दिल्यास श्‍वसनक्रिया सक्षम होऊन फुफ्फुस अधिक कार्यक्षम होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे कोरोना काळात काही विशिष्ट योगासनांचा वापर महत्त्वाचा ठरत आहे, असे मत योगतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. जलनेती, भ्रामरी, भस्तिका, कपालभाती व अनुलोम विलोम यांसारखे प्राणायाम म्हणजेच शुद्धीक्रिया श्‍वसनाचे विकार दूर ठेवण्यास मदत करतात; मात्र या शुद्धीक्रिया करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

अनुलोम विलोम

जमिनीवर पद्मासनाच्या स्थितीत दोन मिनिटे त्याच स्थितीत येऊन मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. एका हाताचा अंगठा नाकाच्या एका बाजूच्या नाकपुडीच्या बाजूस ठेवून, तर बोटांनी दुसऱ्या बाजूच्या नाकपुडीस बंद करा. यावेळी एक नाकपुडी बंद व दुसरी खुली राहील. हात खांद्याच्या खालीच ठेवा. खुल्या नासिकेने श्‍वास घेऊन दुसऱ्या बंद नासिकेस श्‍वास सोडण्यास खुले करा. हे पहिले चक्र पूर्ण होईल. ही क्रिया पाच-दहा वेळा करत सराव करा. हा व्यायाम तीन मिनिटांपासून पंधरा मिनिटांपर्यंत वाढवत जावा.

भ्रामरी प्राणायाम

यावेळी पद्मासनात बसावे. सामान्य गतीस श्‍वास घेत शरीरास तयार करावे. तोंड बंद ठेवून दातांच्या मध्ये थोडी जागा ठेवावी. तर्जनी बोटांनी दोन्ही कान बंद करावेत व बाकी बोटे डोळ्यांवर ठेवावीत. हलका दीर्घ श्‍वास घ्या आणि फुफ्फुसात श्‍वास भरून घ्या. नंतर हळूहळू श्‍वास सोडा. गळ्यातून मधमाश्‍यांसारखा आवाज काढण्याचा प्रयत्न करा. डोक्‍यात हा आवाज गुंजू द्या. त्या आवाजावर लक्ष केंद्रित करत मन एकाग्र करा. किमान दहा मिनिटे हा व्यायाम करावा.

भस्तिका प्राणायाम

पद्मासनात बसून मान व शरीर ताठ ठेवून तोंड बंद ठेवावे. नंतर जलदगतीने श्‍वास आत-बाहेर करत पोट संकुचित करून त्याचा भाग वाढवावा. असे करताना नाकातून श्‍वासोच्छ्वासाचा आवाज यावा. श्‍वास घेताना व सोडताना चांगल्या गतीने घ्यावा व सोडावा. पहिल्यांदा 10 वेळा करून पाहावे. पुढे याचे प्रमाण वाढवावे.

कपालभाती

बसताना पाठीचा कणा ताठ ठेवावा व हाताचे तळवे आकाशाच्या दिशेला उघडून ठेवावेत. श्‍वास घ्यावा. श्‍वास सोडता सोडता पोट आत घ्यावे. नाभीलाही पाठीच्या कण्याकडे ओढून घ्यावे. हे सहज शक्‍य होईल तेवढेच करावे. पोटाच्या स्नायूंची हालचाल जाणवावी म्हणून उजवा हात नाभीवर ठेवावा व नाभी आतल्या बाजूस ओढून घ्यावी. जसे ओटीपोट आणि नाभीकडचा भाग सैल सोडावा. फुफ्फुसात हवा शिरेल. अशा प्रकारे वीस वेळा केल्याने एक चरण पूर्ण होते.

जलनेती

पाणी कोमट करा. ते "जलनेती' पात्रात भरा. मान थोडी उजव्या बाजूला वळवा. उजव्या नाकपुडीजवळ जलनेती पात्र न्या. या नाकपुडीतून तुम्हाला पाणी आत घ्यायचे आहे. उजव्या नाकपुडीने श्‍वास आत घेताना पाणीही नाकात घ्या. यावेळी तोंड उघडे ठेवा म्हणजे तोंडाने श्‍वास घेऊ शकाल. हळूहळू उजव्या नाकपुडीत पाणी ओतत राहा. हे पाणी डाव्या नाकपुडीतून आपोआपच बाहेर पडेल. हा प्रयोग पुन्हा डाव्या नाकपुडीने करावा. जलनेती केल्यानंतर कपालभातीही अवश्‍य करावे. त्यामुळे नाकात राहिलेले पाणी बाहेर पडण्यास मदत होईल.

योग साधनेचे फायदे

*रोगप्रतिकारकशक्ती वाढते

*मन शांत आणि एकाग्र होते

*व्याधींचा त्रास कमी होतो

*फुफ्फुसाची क्षमता सुधारते

*रक्तात अधिक ऑक्‍सिजनचा पुरवठा

*शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत

*सकारात्मक विचार वाढतात

*आत्मविश्‍वास वाढतो

*चिडचिड कमी होते

*शरीराला अल्पावधीत पुरेशी विश्रांती

*काम करण्याचा उत्साह व क्षमता वाढते

*रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकार,

श्‍वसनाचे विकार दूर होण्यास मदत

कोरोनाबाधित रुग्णांना प्राणायामचा लाभ होऊ शकतो. झालेल्या संक्रमणाशी लढण्यासाठी शरीरातील अंतर्गत सुरक्षाप्रणाली यामुळे कार्यान्वित होते. ताप असताना, श्‍वास घेताना अडचण, सर्दी, खोकला, अंगदुखी, थकवा अशी लक्षणे असल्यास प्राणायाम करू नये.

- वसंत पाटील, योग अभ्यासक

प्राणायाम म्हणजे श्‍वसनाचे व्यायाम. भस्तिका, भ्रामरी, अनुलोम विलोम यांसारख्या व्यायामांमुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. शरीरातील आठ चक्रे जागृत होतात. रक्तशुद्धीकरणही होते. शिवाय रोगप्रतिकारकशक्तीही वाढते.

-अणिमा दहीभाते, योग प्रशिक्षिका

Edited By- Archana Banage