
मंकीपॉक्सचे ५० मिनिटांत निदान
नवी दिल्ली - मंकीपॉक्स विकाराचे ५० मिनिटांत निदान करणारा चाचणीसंच भारतामधील कंपनीने विकसित केला आहे. गुरुग्राममधील जीन्स२मी असे या कंपनीचे नाव आहे. आरटी-पीसीआर स्वरूपाच्या चाचणीच्या या संचाद्वारे मंकीपॉक्स विषाणूचे निदान होऊ शकते. कंपनीने एक निवेदन जारी केले आहे. त्यानुसार मंकीपॉक्स आणि चिकनपॉक्स (कांजिण्या) या विकारांचा फरकही चाचणीमुळे स्पष्ट होऊ शकतो.
कांजिण्याचा विकार व्हॅरीसेला झोस्टर या विषाणूमुळे होतो. सध्या हा संच केवळ संशोधनासाठी उपलब्ध आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या (आयसीएमआर) मान्यतेची प्रतिक्षा असून त्यानंतर संच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल.
कंपनीचे संस्थापक आणि सीइओ नीरज गुप्ता यांनी सांगितले की, सध्याच्या अभूतपूर्व परिस्थितीत आरोग्य सुरक्षेसाठी निदानाचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. मंकीपॉक्स विषाणूच्या बाबतीत आम्हाला काळाच्या पुढे तयारी करायची होती. चाचणीसाठी कोरड्या स्वॅबचा नमुना घेता येतो. तसेच स्वॅब काचेच्या विशिष्ट नळीतही (व्हीटीएम) साठविता येतो.
दोन प्रकारचे संच
चाचणी संच दोन प्रकारांत उपलब्ध आहे. एक संच प्रमाणित स्वरूपाचा आहे. दुसऱ्या संच रुग्णालये, विमानतळ, प्रयोगशाळा, शिबिरे अशा अनेक ठिकाणी वापरता येतो. यास पॉइंट-ऑफ-केअर असे संबोधले जाते.
Web Title: Diagnosis Of Monkeypox In 50 Minutes
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..