

The article explains the Ayurvedic significance of ‘Divyachi Avas’, highlighting how lamp worship, meditation, fasting and disciplined living are believed to help maintain the body's internal ‘Agni’ or hormonal balance during the monsoon season.
Sakal
आषाढ महिन्यात येणारी अमावस्या ‘दिव्याची अवस’ म्हणून ओळखली जाते. भारतीय परंपरेचे, भारतीय संस्कारांचे महत्त्व पाहता ज्या ऋषीमुनींनी व भारतीय समाजाने संस्कारांची जपणूक केली, त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. या अमावस्येच्या दिवशी ग्रीष्म ऋतू संपतो आणि नंतर येणारे श्रावण, भाद्रपद हे वर्षाऋतूचे पहिले दोन महिने असतात. ग्रीष्माच्या शेवटच्या दिवसात पावसाळा सुरू झालेलाच असतो, पण वर्षाऋतूचा खरा ओलावा, खरा दमटपणा, थंडी ही श्रावण, भाद्रपदात प्रत्ययाला येते. या दोन महिन्यांत भिजलेले कपडे लवकर वाळत नाहीत, सगळीकडे ओलावा भरलेला असतो, भिंतीत ओलावा असतो, घरात कुठे गळत असले तर जमिनीतही ओलावा असतो. साहजिकच, पिंड-ब्रह्मांड न्यायाप्रमाणे या महिन्यांमधल्या बाहेरच्या ऋतुमानाचा परिणाम शरीरातही जाणवतो. म्हणूनच या काळात शरीरात थंडावा, ओलावा जाणवला, वातवृद्धी झाली तर नवल नाही. या काळात सुखद मंद वारा नसतो तर तो वादळी वारा असतो. त्यामुळे या काळात शरीरातील अग्नी अतिशय मंद होऊ शकतो. आयुर्वेदिक तत्त्वानुसार ज्याला अग्नी म्हटले जाते त्याची तुलना आधुनिक विज्ञानातील हॉर्मोन्सशी करता येऊ शकते. तेव्हा या दोन महिन्यांमध्ये संपूर्ण शरीराची हॉर्मोनल व्यवस्था म्हणजे अग्नी संतुलित ठेवणे फार गरजेचे असते, त्यातल्या त्यात सर्व अग्नींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व पचनासाठी लागणाऱ्या जाठराग्नीला विशेष सांभाळावे लागते.