छातीचं दुखणं हलक्यात घेऊ नका! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Do not ignore chest pain

छातीचं दुखणं हलक्यात घेऊ नका!

‘हृदयविकार’ हा शब्द जरी उच्चारला तरी धडकी भरते. होणारा त्रास, कुटुंबीयांसमोर उभ्या राहणाऱ्या अडचणी, आर्थिक ओढाताण, जीवाशी झालेला खेळ आणि भीतीचे सावट...हे टाळण्यासाठी...किंवा हा प्रसंग येऊच नये यासाठी थोडी काळजी घ्यावी...छातीचे कोणतेही दुखणे दुर्लक्षित करू नये...खर्चाची चिंता न करता तातडीने रुग्णालय गाठावे...वेळेत गेल्यास धोका नक्की टाळता येईल आणि जगणं सुरक्षित करता येऊ शकेल...सीपीआरचा लाखमोलाचा आधार अनेकांना लाभला आहे.

- शिवाजी यादव

अरुण रात्रपाळी करून घरी येऊन झोपी गेला. पहाटे चारच्या सुमारास छातीत दुखू लागले. तातडीने आयजीएम रुग्णालय गाठले. जाताना पत्नीने शिधापत्रिका, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला सोबत घेतला. रुग्णालयात पोहोचताच इसीजी काढला. हृदयविकाराची गंभीर लक्षणे दिसल्याने तेथील डॉक्टरांनी अरुणला सीपीआरला पाठवले. सीपीआरच्या हृदयशस्त्रक्रिया विभागातील डॉक्टरांनी तपासण्या केल्या, तेव्हा हृदयविकाराचा झटक्याची लक्षणे दिसली. तातडीने ॲन्जिओप्लास्टीची तयारी सुरू केली. अरुणची आर्थिक परस्‍थिती बेताची.... खर्चाच्या चिंतेने अरुण हवालदिल झाला. पण पत्नीने केसरी शिधापत्रिका, आधार कार्ड व गेल्याच महिन्यात काढलेला उत्पन्नाचा ताजा दाखला दाखवला...कागदपत्रांचे सोपस्कर संपताच महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोफत शस्त्रक्रिया व उपचार सुरू झाले... त्याच अरुणला सीपीआर हृदयशस्त्रक्रिया विभागातून परवा डिस्चार्ज मिळाला...पत्नीच्या चेहऱ्यावर कुंकू बळकट राहिल्याचं समाधान फुललं...

तणाव अन्‌ कागदांची जमवाजमव

सीपीआरमधील हृदयशस्त्रक्रिया विभागात परवा सकाळी अरुणच्या रुपाने दिसलेले एक यशस्वी प्रातिनिधिक उदाहरण. या उलट अनेकजण उपचार... खर्चाची भीती मनात बाळगून तेथे आलेले...छातीतील वेदनांकडे दुर्लक्ष करत राहिलेले... अचानक वेदना तीव्र झाल्यानंतर धावपळ करत रुग्णालय गाठलेले...तेथे पोहोचल्यानंतर कागपत्रांची त्यांची जुळवाजुळव सुरू होती आणि आत त्यांच्या रुग्णावर उपचार सुरू होते... तर नातेवाईंकांची फोनवरून चर्चा सुरू होती....कागदपत्रांचा शोध सुरू... उपचारासाठी योजनेचा लाभ घेताना त्यांची कसरत सुरू होती... तर काहींनी उपचार खर्चासाठी पैशांची जमवाजमव सुरू केली होती...रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची घालमेल... कागदपत्र घरात जमवून ठेवणे...ती अपडेट ठेवणे किती गरजेचे आहे ही बाब अधोरेखीत करत होते... अशा रुग्णांसाठी अरुणच्या पत्नीने दाखवलेली कर्तव्य तत्परता शब्दशः मार्गदर्शक ठरत होती...

भीती, विचार आणि गांगरलेपण

सीपीआरच्या हृदयशस्त्रक्रिया विभागात दुपारी दोनपर्यंत दहा ते बारा हृदयरुग्ण आले होते. सर्वांची तपासणी व उपचार प्रक्रिया सुरू होती... त्यातील निम्म्या रुग्णांची केवळ कागदपत्रे नसल्याने गडबड सुरू होती.... काहीजण भीतीनेच गांगरून गेले होते...छातीत वेदना... म्हणजे थेट हृदयचा झटकाच, शस्त्रक्रियेचा लाखोंचा खर्च... आयुष्यभराचा अधूपणा...घरादाराची ओढताण...असे एक ना अनेक प्रश्‍न सतावताना दिसले...काहीजण गैरसमजामुळे हवालदिल... त्यांना डॉक्टर समजावून सांगत होते...हे चित्र अस्वस्थ करणारे होते...दिवसभरात येथे बारा रुग्णांवर शस्त्रक्रिया झाली, काहींवर विनाछेद शस्त्रक्रियाही झाल्या तर एका रुग्णाला पेस मेकरही बसविण्यात आला...

सुविधा आहेत...भीती नको...

स्टेनी इंडिया उपक्रमांतर्गत शासकीय रुग्णालयात इसीजी काढण्याची सुविधा आहे. ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात म्हणजे प्रत्येक तालुक्यात ही सेवा आहे. हृदय रुग्णांना त्याचा लाभ होतो. त्यामुळे छातीत वेदना जाणवताच...त्याकडे दुर्लक्ष करू नये... तातडीने शासकीय रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना दाखवावे...ईसीजी काढून घ्यावा...रुग्णाची लक्षणे पाहून गंभीर रुग्णांना सीपीआरला पुढील उपचारसाठी पाठवले जाते... रुग्ण सीपीआरमध्ये आल्याबरोबर त्याची तपासणी केली जाते... ऑनकॉलचे डॉक्टर दुसरा ईसीजी काढून बघतात. हृदयविकाराचा झटका असल्यास ॲन्जिओग्राफी केली जाते. ॲन्जिओग्राफीमध्ये ब्लॉकेज दिसल्यास गरजेनुसार विनाछेद किंवा खुल्या शस्त्रक्रियेची तयारी केली जाते. रुग्‍णाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यास योजनेतून उपचार केले जातात. त्यामुळे खर्चांची चिंता करण्यापेक्षा छातीत वेदना होताच तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा...

जीवाचा धोका टाळू शकता

हृदयविकाराची लक्षणे दिसताच काय करावे...हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अक्षय बाफना म्हणाले,‘‘छातीत येणाऱ्या वेदना १०९ कारणांनी येतात. प्रत्येक वेदना ही हृदयविकाराची असेल असे नाही; मात्र ती कशामुळे आली हे तपासणे हिताचे आहे. त्यामध्ये हृदय विकाराची लक्षणे दिसल्यापासून ३० मिनिटांत रुग्णाने दवाखान्यात पोहचावे. दहा ते वीस मिनिटात इसीजी व्हावा. ९० मिनिटांपर्यंत गरजेनुसार रक्त पातळ होण्याचे इंजक्‍शन दिले जावे...अशी अपेक्षा आहे. यातून ९० टक्के धोका टळण्यास मदत होते. काही व्यक्ती छातीत वेदना येऊनही त्या सोसत राहतात... त्यानंतर दहा-बारा तासानंतर उपचाराला येतात... तेव्हा जीवाचा धोका ८० टक्क्यांनी वाढलेला असतो. त्यामुळे लक्षणे दिसल्यापासून एक ते दीड तासांच्या ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार सुरू झाल्यास जीव वाचू शकतो. ’’

काही महत्त्‍वाची निरीक्षणे

  • गेल्या काही वर्षांत ३५ ते ४० वयोगटातही हृदयविकाराची लक्षणे काहींमध्ये दिसतात.

  • चाळीशी ओलांडल्यानंतर वर्षातून एकदा तरी हृदयतपासणी करून घ्यावी.

  • रात्री बारा ते सकाळी ८ या कालावधीत तीव्र हृदयविकाराचा झटका येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ

  • आई, वडील, आजी, आजोबा यांना उच्चरक्त दाब, हृदयविकार आहे अशांनी तपासणी करणे आवश्यक.

  • तंबाखू सेवन, मद्यपान आदी व्यसने यातच रक्तदाब मधुमेहविकार असणाऱ्यांना धोका वाढत आहे अशांनी छातीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नये

सीपीआर दररोज

एन्जिओग्राफी

रोज ५ ते ८ रुग्णांवर

ॲन्जिओप्लास्टी

रोज २ ते ३ रुग्णांची

हृदयविकाराशी संबंधित येणारे अन्य रुग्ण : १० ते २०

Web Title: Do Not Ignore Chest Pain Get To Hospital Immediately Cpr

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top