
दगडी सहाणेवर थोडे तूप व मध घेऊन त्यात शुद्ध २४ कॅरट सोने उगाळून बाळाला जन्मानंतर लगेच द्यायला त्यांनी सांगितलेले आहे.
- डॉ. मालविका तांबे
आयुर्वेदशास्त्राचे कार्य, प्रयोजन जेव्हा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा लक्षात येते की कुठल्या आजाराला कोणते औषध द्यावे यापेक्षा अधिक महत्त्व आरोग्याची काळजी घेण्याकरता दिलेले आहे, कुठलाही आजार होऊ नये यासाठी कोणते प्रतिबंधात्मक उपाय करावे याबद्दल विस्तृत माहिती आयुर्वेदात मिळते. यात सर्वांत अधिक महत्त्व दिले आहे ते रसायनांना.
‘दीर्घमायुः स्मृतिंमेधाम् आरोग्यं तरुणंवयः। देहेन्द्रियबलंकान्तिंनरोविन्देत्रसायनात्।।... योगरत्नाकर’ शरीरात रसधातूची पुष्टी करून शरीराचे स्वास्थ्य टिकवून ठेवायला मदत करून शरीराला व्यवस्थित पोषण देणे, वय स्थापन करणे म्हणजे मनुष्याला वृद्धत्वापासून दूर ठेवणे, शरीरातील ओज वाढवणे ज्यामुळे शरीर कुठल्याही आजाराशी सामना करायला सक्षम होईल, त्वचेची कांती सुधारणे, शरीरातील त्रिदोषांचे संतुलन वाढवणे, इंद्रियांची कार्यक्षमता वाढवणे, मानसिकता सकारात्मक ठेवणे आणि शरीरातील चयापचयादी क्रिया सुधारायला मदत करते ते रसायन असे सर्व आचार्यांचे म्हणणे आहे.
रसायनांमध्ये काही वनस्पती, काही खनिजे इत्यादी वापरली जातात, उदा. शतावरी, अश्र्वगंधा, ब्राह्मी, शंखपुष्पी, गाईचे तूप, मध तसेच वेगवेगळे सुवर्णयोग रसायनांच्या संकल्पनेत दिसतात. सुवर्ण हे रसायनांमध्ये सर्वांत महत्त्वाचे ठरते. हे घ्यायला सोपे असते व अतिशय कमी प्रमाणात घ्यावे लागते. आयुर्वेदशास्त्राने जन्म झाल्याबरोबर बालकाला सुवर्णाचे रसायन वापरायला द्यायला
सांगितलेले आहे. यावरून सुवर्णरसायन किती सुरक्षित आहे हे आपण समजू शकतो. सुवर्ण हे रसायन तर आहेच आणि ते वाजीकरसुद्धा आहे म्हणजे सुवर्ण शरीरामध्ये बल सुद्धा वाढवते. त्यामुळे बाळ व्हावे अशी इच्छा असणाऱ्यांनी गर्भधारणा होण्यापूर्वी सोन्याचा रसायन म्हणून उपयोग करायला सांगितलेले आहे. पुंसवन विधीसाठी जेणेकरून गर्भाशयाला ताकद मिळावी, गर्भाला ताकद मिळावी, पुरुषांचे वीर्य ताकदवान व्हावे यासाठी सुवर्णाचा संस्कार सांगितलेला आहे. इतकेच नव्हे तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सुवर्णप्राशनाचे महत्त्व आयुर्वेदात सांगितलेले आहे.
सुवर्णप्राशन हि इतर मेधाग्निबलवर्धनम्।
आयुष्यं मंगलम पुण्यं वृष्यं ग्रहापहम् ।।
मासात् परममेधावी क्याधिर्भिनर च धृष्यते ।
षडभिर्मासै: श्रुतधर: सुवर्णप्राशनाद भवेत्।।
- काश्यप संहिता
आचार्य काश्यप यांनी बाळाला सुवर्णप्राशन लेहनाच्यास्वरूपात करायला सांगितलेले आहे. दगडी सहाणेवर थोडे तूप व मध घेऊन त्यात शुद्ध २४ कॅरट सोने उगाळून बाळाला जन्मानंतर लगेच द्यायला त्यांनी सांगितलेले आहे. असे सोने दिल्याने बाळाची बुद्धिमत्ता वाढते, पचन सुधारते, चयापचय क्रिया व्यवस्थित होते, बाळाला बल मिळते, दीर्घायुष्याचा लाभ होतो, बालक समृद्ध व ताकदवान होते व ते कुठल्याही नकारात्मकतेपासून लांब राहते. नियमित एक महिना बालकाला असे सुवर्णप्राशन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि असे सुवर्णप्राशन सहा महिने केल्यास बाळ एकदा ऐकलेले सगळे लक्षात ठेवते.
सध्या आपण वेगवेगळ्या प्रकारचे संक्रामक आजार वाढत चाललेले आहेत असे अनुभवतो आहोत. कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडलो आहोत असे आपल्याला वाटत होते, पण पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याच्या बातम्या कानावर येऊ लागल्या आहेत. एकूणच आपल्या सर्वांनाच प्रतिकारशक्ती वाढविण्याची गरज आहे. त्यातल्या त्यात लहान मुलांची प्रतिकारशक्ती तर बरीच कमकुवत असते. लहान मुलांच्या प्रतिकारशक्तीवर काम करण्याच्या दृष्टीने अशा प्रकारचा सुवर्णयोग घेणे उत्तम ठरु शकेल. सध्या अकाली प्रसूती होण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा मुलांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना बरेच त्रास होताना दिसतात. सुर्वणप्राशन यावर किती व कशी मदत करू शकेल यावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे.
लहान मुलांना सुवर्णप्राशन करताना खालील गोष्टी लक्षात ठेवणे फार महत्त्वाचे असते. सर्वप्रथम सुवर्णाची शुद्धता महत्त्वाची आहे. ते २४ कॅरटचे असावे. सोन्याची मात्रा (dose) महत्त्वाची असते. सुवर्णप्राशन योगाचे घटकही महत्त्वाचे असतात, जसे काही विशिष्ट वनस्पती, मध इ. संतुलन बालामृतमधील मुख्य घटक आहे शुद्ध सोने तसेच त्यात शुद्ध काश्मिरी केशर व बालकाच्या स्वास्थ्यासाठी उत्तम असलेल्या अन्य वनस्पतीही असतात. मुख्य म्हणजे उपरोक्त तिन्ही निकषांचे पालन यामध्ये व्यवस्थितपणे केलेले असते. सुवर्णप्राशनाबद्दल काही गैरसमजुती असलेल्या दिसतात.
- एक महिना सुवर्णप्राशन करणे पुरेसे असते अशी अनेकांची समजूत असते. पण सुवर्णप्राशन हे संपूर्ण आयुष्यभर करणे योग्य ठरते. वयाच्या बारा-सोळा वर्षांपर्यंत मुलांचा विकास होत असतो. किमान या वयापर्यंत कुठल्या ना कुठल्या स्वरूपात सुवर्णप्राशन व्हायलाच पाहिजे.
- आपल्या शास्त्रांमध्ये, वेदांमध्ये पुष्य नक्षत्राला महत्त्व दिलेले दिसते. पुष्य नक्षत्र शुभ असल्यामुळे या नक्षत्रावर नवीन गोष्टी सुरू केल्या जातात. सोने विकत घेण्यासाठी गुरुपुष्ययोग महत्त्वाचा समजला जातो. म्हणूनच की काय, सुवर्णप्राशन पुष्य नक्षत्रावर करावे असा समज पसरलेला आहे. पण सुवर्णप्राशन ही नियमित करायची गोष्ट आहे. घरच्या घरी रोज नियमितपणे सुवर्णप्राशन घेणे उत्तम असते.
आयुर्वेदात सोने हे सुवर्णवर्ख, सुवर्णाचे चूर्ण, सुवर्णभस्म इ. स्वरुपात घ्यायला सांगितलेले आहे. सोने हे मध व तुपाबरोबर शरीरात गेले तर ते अधिक व्यवस्थितपणे शोषले जाऊ शकते व त्याचे कार्य अधिक व्यवस्थितपणे होऊ शकेल. म्हणून श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे अमृतशर्करायुक्त पंचामृत (दूध, तूप, दही, मध व अमृतशर्करा) घेण्याचा आग्रह धरत असत.
लहान वयापासून अमृतशर्करायुक्त पंचामृत दिले तर रसायनाचे वर सांगितलेले सर्व फायदे मिळू शकतात. तसेच सुवर्णप्राशनाचा छोटेखानी प्रयोग म्हणता येईल असे सुवर्णसंस्कारित जल प्रत्येक घरी करायला हरकत नाही. सुवर्णसंस्कारित जल करताना वापरलेल्या सोन्याचे वजन कमी होत नाही, त्याचा पाण्यावर फक्त संस्कार होतो. सुवर्णसंस्कारित जल पचायला चांगले असते व त्यामुळे सोन्याचे फायदे काही प्रमाणात तरी मिळू शकतात.
सध्या सोन्यावर बऱ्याच प्रकारचे संशोधन सुरू आहे जसे की सोने प्रतिकारशक्ती वाढवते, बुद्धिवर्धनासाठी, पोषणासाठी व एकूणच संपूर्ण स्वास्थ्याच्या दृष्टीने उपयोगी कसे असते. सुवर्ण हे नोबल मेटल आहे म्हणजे ते कधी खराब होत नाही, त्याला गंज लागत नाही. आपल्या संस्कृतीत सोन्याचे दागिने घालण्याला खूप महत्त्व दिलेले आहे.
पिढ्यान् पिढ्या आपण हे दागिने वापरत असतो. या महिन्यात आपण अक्षयतृतीया साजरी करतो, या दिवशी सोने विकत घेण्याला महत्त्व आहे. सोन्याचा अक्षयपणा आपल्या शरीरात सामावून आपण आपले आरोग्यही अक्षय ठेवू शकू. याचसाठी कदाचित सुवर्णयोगाची कल्पना आपल्या आयुर्वेदासारख्या शास्त्रामधून आली आहे. अशा प्रकारचे उत्तम कवच आपल्या बाळासाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी वापरणे उत्तम.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.