शरीरशास्त्र : चक्कर : कारणे आणि उपाय dr ajay kothari writes Dizziness Causes and remedies | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dizziness

शरीरशास्त्र : चक्कर : कारणे आणि उपाय

चक्कर येते अशी तक्रार घेऊन अनेक रुग्ण दररोज माझ्याकडे येत असतात. चक्कर येण्याची अनेक कारणे आहेत.

  • व्हर्ट्यागो - कानाच्या आतील भागात सूज येऊन किंवा त्यामध्ये खडे एका ठिकाणी एकत्रित होऊन फिरल्यासारखे वाटते. त्यामुळे उलटी, मळमळ होऊ शकते. योग्य व्यायाम केल्याने ही समस्या दूर होऊ शकते. कधीकधी त्याला औषधाची आवश्यकता लागत नाही. इस्टाड्रियन ट्युब ब्लॉकेजमुळे (कानात असलेली विशिष्ट नळी) चक्कर येते.

  • मानेतील नसांवर दाब येऊन पायात कमजोरी येऊ शकते. त्यामुळे तोल राहत नाही. तसेच उभे राहताना किंवा चालताना पडल्यासारखे वाटते. याला उपाय म्हणजे मानेचा बेल्ट आणि योग्य रीतीने व्यायाम. काही गंभीर दाबामध्ये दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता भासते.

  • हृदयाच्या किंवा रक्तदाबाच्या चढ-उतारामुळे तसेच उतारवयात झोपेतून अचानक उठल्याने मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. अशा वेळी चक्कर येते. यावर उपाय म्हणजे झोपेतून एकदम उठू नये. हळूहळू एका अंगावर होऊन मगच उठावे.

  • हृदयाचे ठोके अनियमित झाल्यास किंवा काही ठोके चुकल्यास चक्कर येऊ शकते. मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या मानेच्या रक्तवाहिनी ब्लॉक झाल्यामुळेही चक्कर येऊ शकते. अशावेळी हृदयरोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य सल्ला घेऊन उपाय करण्याची आवश्यकता असते. त्यासाठी पेसमेकरचे उपचार लागू होऊ शकतात.

  • काही मानसिक आजारांमध्येही चक्कर येणे हे एक लक्षण आहे. यामध्ये चक्कर येण्याबरोबर डोळ्यासमोर अंधारी येणे, कानात चित्रविचित्र आवाज येणे, डोके दुखणे ही सुद्धा लक्षणे असू शकतात.

  • कधी एखादी भयंकर परिस्थिती आल्यास किंवा दुःखद बातमी समजल्यास अचानक चक्कर येऊ शकते. अशावेळी रुग्णाला झोपविणे, पाय उचलणे, ग्लुकोज किंवा लिंबू पाणी दिले पाहिजे.

  • मिनिओर्स डिसीज - कानाच्या आतील भागास सूज आल्यास चक्कर येऊ शकते. त्यामुळे ऐकायला कमी येते. यासाठी कान-नाक-घसा तज्ज्ञाचा सल्ला घेतला पाहिजे. कॉफी, चहा, सोडा असे पदार्थ टाळावेत.

  • मेंदूत अतिरिक्त रक्तस्राव झाल्यास गाठ किंवा सूज येऊ शकते. अशावेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन तातडीने उपचार केले पाहिजेत.

  • अर्धशिशीमुळेही चक्कर येऊ शकते. यामध्ये डोकेदुखीचा त्रास होत असतो. त्यामुळेही चक्कर आल्यासारखे वाटत राहते.

  • काही औषधांमुळेही चक्कर येऊ शकते. उच्च रक्तदाबासाठी, मेंदू व मानसोपचार विकारावरील औषधांमुळेही क्वचितप्रसंगी चक्कर येऊ शकते.

(लेखक संचेती हॉस्पिटलमध्ये मणका तज्ज्ञ आहेत.)

टॅग्स :Remedieshealth