शरीरशास्त्र : मणक्याची काळजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Spine Care

डिस्क म्हणजे दोन मणक्‍यामध्ये असणारी एक गादी आहे. त्याला इंटरव्हरटेबल डिस्क किंवा मणक्‍यातील गादी असे संबोधले जाते.

शरीरशास्त्र : मणक्याची काळजी

डिस्क म्हणजे दोन मणक्‍यामध्ये असणारी एक गादी आहे. त्याला इंटरव्हरटेबल डिस्क किंवा मणक्‍यातील गादी असे संबोधले जाते.

ॲनाटॉमी ऑफ डिस्क - डिस्कची शरीर रचना

ॲन्युलस फायब्रोसिस - हे गादीच्या बाहेरील आवरण आहे. ते गादीला मजबूत करते.

न्युक्लिअस पल्पोसस - हे आतील स्त्राव आहे. ते मणक्‍याला धक्के पोहचू देत नाही. म्हणजे ‘शॉक ॲब्झॉरबर्ग’चे काम करते. या गादीमुळेच शरीर लवचिक राहते.

स्लीप डिस्क म्हणजे काय?

दोन मणक्‍यातील गादी मागे सरकून नसांवर दबाव देते तेव्हा कमरेपासून खाली पायात किंवा मानेपासून हातात प्रचंड वेदना जातात. त्याला स्लीप डिस्क किंवा सायटिका असेही म्हटले जाते. त्याचे चार टप्पे आहेत.

1) टप्पा

डिस्क डिजनरेशन - यामध्ये स्त्राव कमी होते. मणक्‍यातील गादीवर (कुशनिंगवर) परिणाम होतो.

2) टप्पा

डिस्क प्रोलॅप्स - यामध्ये गादी फुटून त्यातील स्राव बाहेर येऊन नसांवर दबाव द्यायला सुरवात करते.

3) टप्पा

एक्स्ट्रुशन - यामध्येही गादी फुटून त्यातील स्त्राव बाहेर येतो नसांवर थेट दाब पडतो.

4) टप्पा

डिस्क सेक्युइस्ट्रेशन - यामध्ये स्लीप डिस्कचा तुकडा मुख्य डिस्कपासून विभक्त होऊन नसांवर दबाव द्यायला सुरुवात करतो.

आजच्या युगात डिस्क कमकुवत होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषत- तरुणांमध्ये लक्षणीय वाढ बघायला मिळते.

कोणती कारणे?

 • बैठी जीवनशैली

 • लठ्ठपणा

 • व्हिटॅमिनची कमतरता (B१२, D३ आणि C)

 • धूम्रपान, मद्यपान, तंबाखू सेवन

 • फास्ट फूड/पॅकबंद आहार

 • बसायची चुकीची पद्धत

 • व्यायाम करताना एखादी दुखापत

 • मोबाईल, कॉम्प्युटरचा अति वापर करणे.

 • व्यायामाची कमतरता

कोणती लक्षणे?

 • मान/कंबर दुखणे

 • कमरेचे दुखणे पायात जाणे

 • मानेचे दुखणे हातात जाणे

 • हाताला/पायाला मुंग्या येणे/बधिरता जाणवणे

 • संडास, लघवीचा ताबा सुटणे.

आजाराचे निदान

 • तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करणे.

 • एक्स रे, एमआरआय तपासणी

 • रक्त आणि व्हिटॅमिन कमरतेची तपासणी

उपचार पद्धती

 • बहुतांश स्लीप डिस्कचे रुग्ण शस्त्रक्रियेशिवाय बरे होऊ शकतात.

 • तीव्र वेदना होत असताना संपूर्ण विश्रांती घेणे आवश्यक आहे.

 • नियमित व्यायाम - भुजंगासन, पोहणे, पोहण्याच्या तलावात चालणे, शरीराची ठेवण सुधारावी.

 • ट्रॅक्शन आणि बेल्ट - आधुनिक उपचार पद्धतीत याची महत्त्वाची भूमिका नाही.

 • पेन ब्लॉक थेरपी - ही विना शस्त्रक्रिया इंजेक्शनद्वारे होणारी उपचार पद्धती आहे. नस अडकली आहे, तिथे औषध सोडून त्या नस आणि गादीवरील सूज कमी करण्यात येते. शस्त्रक्रिया टाळण्यासाठी ही उपचार पद्धती उपयोगाची आहे.

टॅग्स :health