

The Foundation of Life: Why Bone Health (Asthi Dhatu) is Critical for Longevity
Sakal
ताठ मानेने जगण्यासाठी केवळ नीतिपूर्ण वागणे किंवा स्वाभिमान व एकूण सर्वांवर प्रेम असणे या सर्व गोष्टींची आवश्यकता असते असे नाही तर यासाठी मानेतील मणक्यांची मदत तेवढीच महत्त्वाची ठरते. पाठीला पोक काढून चालले तर म्हाताऱ्यासारखा का चालतोस? असे विचारले जाते. मणक्यांची ताकद कमी झाली, दोन मणक्यांमध्ये असलेल्या गाद्या झिजल्या वा दबल्या गेल्या, मणक्यांची झीज झाली की हलके हलके पाठीला बाक येतो व पाठीला बाक येणे हे वृद्धत्वाचे लक्षण समजले जाते. सैन्यात सैनिकांनी ताठ उभे राहावे ही अपेक्षा असते म्हणजेच तारुण्य ही सैनिकाची सर्वांत महत्त्वाची आवश्यकता असते. एखाद्यासाठी हाडे झिजविणे, कंबर मोडणे, हाडाची काडे करणे वगैरे वाक्प्रचारांवरून एक गोष्ट लक्षात येते की हाडे हाच शरीराचा खरा आधार आहे. झाडाचे जसे खोड असते तसे शरीराचे हाड असते. झाडाच्या खोडावर जशा फांद्या, फळे, फुले किंवा एखादी बाहेरची वेल वाढत राहते त्याचप्रमाणे शरीरात असणाऱ्या हाडांच्या सांगाड्यावर संपूर्ण शरीराची म्हणजेच हात-पाय, नसा वगैरेंची जडण-घडण केलेली असते. ज्या प्रमाणे वेलींना झाडाचा आधार असतो तसा नसांनाही हाडांचा आधार असतो.