घडण-मंत्र : अवघड जागी दुखणे... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Internet Use by Children

इंटरनेट या विषयाची चर्चा केल्याशिवाय आपण पालकत्वाचा प्रवास सुरू सुद्धा करू शकत नाही. संपवणे तर दूरची गोष्ट आहे.

घडण-मंत्र : अवघड जागी दुखणे...

- डॉ. भूषण शुक्ल

इंटरनेट या विषयाची चर्चा केल्याशिवाय आपण पालकत्वाचा प्रवास सुरू सुद्धा करू शकत नाही. संपवणे तर दूरची गोष्ट आहे. कोणत्याही कारणाने मला भेटायला येणाऱ्या कुटुंबांमध्ये इंटरनेटचा वापर हा एक वादाचा मुद्दा असतोच. वेळ वाया जाणे ही प्रमुख तक्रार. अभ्यास, खेळ, व्यायाम, कामे याकडे दुर्लक्ष होणे ही उप-तक्रार असे याचे स्वरूप असते. रात्रीची झोप कमी होणे, चिडचिड होणे, तब्येतीच्या तक्रारी निर्माण होणे हे सुद्धा वारंवार ऐकायला मिळते. मानसोपचातज्ज्ञ म्हणून माझ्या दृष्टीने काही जास्त मूलभूत बदल दिसताहेत. त्याबद्दल यावेळेस बोलूया. उपाययोजना पुढच्या लेखात.

मूलभूत बदल

1) दूर आणि आभासी जगाशी घट्ट मैत्री - आपल्या आजूबाजूला दिसणारी मंडळी ही फारशी महत्त्वाची राहिली नाहीयेत. साता समुद्रापार असलेल्या तरुण, आकर्षक आणि कमालीच्या श्रीमंत मंडळींचे विचार, आचार हे जास्त महत्त्वाचे आहेत. यात अतिधार्मिक आणि अतिरेकी विचारसरणीचासुद्धा एक प्रवाह आहे. या जगाचा भाग होण्याचा सतत प्रयत्न करणे हा अनेक मुलांचा दिवसभराचा उद्योग होऊन बसला आहे. त्याप्रकारचे कपडे, केशभूषा अगदी अन्न सुद्धा तसेच खाणे (सध्या k-popच्या निमित्ताने कोरियन अन्नाची चलती आहे) असा टोकाचा आग्रह दिसतो.

2) व्हर्च्युअल मैत्री - प्रत्यक्षात ज्यांना भेटता येत नाही, असे मित्र-मैत्रिणी बन‌णे. ते खरेच आपल्या वयाचे आहे का? त्यांच्या प्रोफाईलवर दिल्याप्रमाणे त्यांचे वय, लिंग, शिक्षण आणि राहण्याचे स्थान खरे आहे का? याचा कोणताही विचार न करता त्या व्यक्तीला स्वतःबद्दल सर्व सांगणे, स्वतःचे फोटोसुद्धा पाठवणे. त्यांच्या पूर्णपणे कह्यात जाणे हे अनेक मुलांबाबत घडते आहे.

काल्पनिक विश्‍वाची भूरळ

म्हणजे, आपण ज्या घरात राहतो, ज्या कुटुंबाचा आणि समाजाचा भाग आहोत ते बंध तुटून कोणत्यातरी अर्धकाल्पनिक जगात जगणे सुरू होते आणि त्या प्रकारे जगणारे इतर लोकच फक्त हवेसे वाटतात. सध्याची शाळा, अभ्यासक्रम, कुटुंब आणि समाज याबद्दल तिटकारा आणि टोकाची नाराजी हा प्रकारसुद्धा अनेकदा दिसतो. आई-वडिलांना नव्या जगाची माहिती नाही आणि ते फक्त जुनाट (!) विचारात अडकून पडल्याचा त्रागा पुनःपुन्हा व्यक्त करणे हे या प्रकारचा बदल खूप खोलवर गेल्याचे चिन्ह आहे.

आपल्या जगाबद्दल समाधान नसणे, रूढींनी घातलेली अन्यायकारक बंधने तोडणे हे तरुण पिढीचे काम आहे, यात काही शंका नाही. त्यांची स्व-प्रतिमा प्रकट करण्याची माध्यमे वेगळी असणार यातही शंका नाही. पण प्रत्यक्ष जगाशी संपर्क तुटून एका आभासी जगात वावरच त्यांना खरा आणि प्राणप्रिय वाटत असल्यास समस्या गंभीर बनते. कारण कितीही कटू वाटले, तरी पालकांच्या जिवावरच या सर्व उड्या चालू असतात आणि स्वकर्तृत्व जवळपास शून्य असते, हे भयाण वास्तव टाळता येत नाही.

असल्या रस्त्यावर आपली मुले फार पुढे जाऊ नयेत आणि परत आणता यावीत, याचा प्रवास पुढच्या लेखात बघू या.