
खूप लहानपणी आणि अयोग्य वयात स्क्रीनचा वापर किती धोकादायक असतो आणि पुढच्या निकोप वाढीसाठी तो कसे प्रश्न निर्माण करतो ते आपण पाहिले. प्राथमिक शाळेत जाणाऱ्या मुलांचा विचार या लेखात करूया.
मुले, पालक आणि इंटरनेट!
- डॉ. भूषण शुक्ल
खूप लहानपणी आणि अयोग्य वयात स्क्रीनचा वापर किती धोकादायक असतो आणि पुढच्या निकोप वाढीसाठी तो कसे प्रश्न निर्माण करतो ते आपण पाहिले. प्राथमिक शाळेत जाणाऱ्या मुलांचा विचार या लेखात करूया.
स्क्रीन आणि उपयोग
शाळा आणि क्लासेस या सक्तीच्या शिक्षणासाठी.
एखाद्या विषयात स्वतःच्या मर्जीने जास्त शिकण्यासाठी.
मनोरंजन.
इतरांशी संवाद.
सृजन-कला, लेखन इत्यादीसाठी.
आर्थिक व्यवहार, खरेदी वगैरेसाठी.
हे नक्की तपासा...
आपले मूल यापैकी कशासाठी आणि किती वेळ इंटरनेटवर घालवते, याचे पालकांना भान असावे. पालकांच्या, आजी-आजोबांच्या, इतरांच्या आणि स्वतःच्या साधनाचा (गॅजेट) वापर करून मुल काय आणि किती काळ करते आहे हे पालकांना निश्चितपणे माहिती पाहिजे.
सर्व ऑपरेटिंग सिस्टिम म्हणजे - अँड्रॉइड, आयओएस (ॲपल) आणि मायक्रोसॉफ्ट (विंडोज) - पालकांना ही सर्व माहिती देते. शिवाय त्या गॅजेट्सवरून काय करता येईल आणि किती वेळ हेसुद्धा पालकांना ठरवण्याची सोय पासवर्ड वापरून करता येते. हा अधिकार पालकांच्या हातात असतो.
मुलांच्या हातात पडणार नाही अशा पद्धतीने स्वतःचा पासवर्ड जपणे ही पालकांची प्राथमिक जबाबदारी आहे.
मुलांच्या हातात स्क्रीन आणि इंटरनेट देण्याआधीच ही सर्व सोय करून ठेवा. तुमची मुले लहान असतील, आई-वडिलांचे ऐकायच्या वयात असतील तर हे ताबडतोब शिकून घ्या आणि वापरायला लागा.
पालकांनो, खंबीर राहा
योग्य आणि आधी ठरलेल्या वेळेस स्क्रीन बंद करता येणे ही या युगातील ताकदवान सिद्धी आहे. आपल्या मुलांना ती आपणच मिळवून देऊ शकतो.
४-५ वर्षांचे मूल काहीतरी करमणुकीचे कार्यक्रम बघत असल्यास तो स्क्रीन पूर्व नियोजित वेळेप्रमाणे १५ मिनिटांत स्वतःहून बंद झाला की, ‘अजून फक्त पाच मिनिटे’ या नावाने सुरू होणारा घोडेबाजार मुळातच टाळला जातो. मुलाला - ‘तमाशा चालू ठेवला तर पुढचे दोन दिवस स्क्रीन पूर्णपणे बंद राहील,’ असे खंबीरपणे सांगून ते अमलात आणण्याची धमक पालकांना दाखवावी. आपण न चिडता, शांतपणे असे वागून दाखवणे हे पालकत्वाचा आवाका आल्याचे लक्षण आहे. गेम्स आणि साधने पालकांनी नेटाने आवरली नाहीत, तर गावोगावी मुलांसाठी ‘व्यसनमुक्ती केंद्र’ उघडावी लागतील. शिकण्याच्या नावाखाली तासनतास यू-ट्यूबवर व्हिडिओ बघत बसणे आणि पालकांना राजरोसपणे टोपी घालण्याचे उद्योग करणे हे मुलांना सहज जमते. या व्हिडिओचा उपयोग मनोरंजन आहे. ते रोज किती चालू ठेवायचे हे पालकांनी आपल्या कुटुंबासाठी ठरवावे. तो त्यांचा अधिकार आणि जबाबदारी सुद्धा आहे. मित्रमंडळींशी ‘कनेक्ट’ होण्यासाठी वापरले जाणारे सोशल मीडियासुद्धा याच पद्धतीने पालकांना सांभाळावे लागते.
मुलांची योग्य वाढ आणि यश हे प्रत्यक्ष कृती आणि मेहनत यांमुळे हाती येते. तासनतास त्याच गोष्टी स्क्रीनवर बघून हे होऊ शकत नाही. तो भ्रम पालकांनी प्रथम स्वतःसाठी आणि नंतर मुलांसाठी तोडणे गरजेचे आहे.
मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्या आम्हा सर्वांना आता हे रोजचे काम होऊन बसले आहे. जागरूक आणि सुजाण पालक हे भूत मुळातूनच नष्ट करून आपल्या कुटुंबाची काळजी घेतील अशी आशा आहे. अर्थात, डोक्यावरून पाणी जाते आहे अशी दुर्दैवाने परिस्थिती आल्यास डॉक्टर आणि समुपदेशक निश्चितच मदत करू शकतील.