वसा आरोग्याचा : बालकांचा आहार

सुरवातीच्या सहा महिन्यानंतर खालीलप्रमाणे आहार देण्यास सुरुवात करावी.
Baby food
Baby foodsakal

- डॉ. कोमल बोरसे

बालकांसाठी स्वच्छता अत्यंत आवश्यक बाब आहे. घरामध्ये फरशी स्वच्छ ठेवावी, मुलांचे कपडे वेगळे धुवावे मोठ्यांच्या कपड्यांमध्ये मिक्स करू नयेत.

सुरवातीच्या सहा महिन्यानंतर खालीलप्रमाणे आहार देण्यास सुरुवात करावी.

1) सगळ्यात आधी स्वच्छ पाणी द्यावे. त्यानंतर भाताचे वरचे पाणी, डाळीचे पाणी द्यावे. साळीच्या लाह्यांचे पीठ करून त्याची पानात पेज करून द्यावी. ती पचायला हलकी असते.

2) घरच्या घरी तांदूळ आणि मुगाच्या डाळीचा रवा काढून तो मऊ शिजवूनही अशी पेज बाळाला देता येईल. घरी बनविलेल्या तुपाचा (विशेषत- गाईच्या) थोडा वापर करू शकता.

3) अधून मधून भाज्यांचे उकडलेले पाणी गाळून द्यावे. सूप किंवा फळाचा रस, नारळ पाणी द्यावे. फळांचा रस देताना बिया त्यात नसतील याची काळजी घ्यावी.

प्रिझर्वेटिव्ह, रंग, वास व चवीसाठी फ्लेवर टाकलेले बाहेरचे पदार्थ टाळावेत. घरीच नाचणीचे सत्त्व बनवू शकतात. नाचणी भिजत घालून मोड आणायची व उन्हात सुकत ठेवायची मोड काढून टाकायचे व त्याचे पीठ बनवायचे पिठामध्ये विलायची जायफळ हे पदार्थ चवीसाठी टाकून शकतात साखरेऐवजी खजूर, मनुके याचा वापर करू शकता

८ ते ११ महिन्यापर्यंत वय असलेल्या बाळाचा आहार पुढीलप्रमाणे असावा.

बाळ साधारण ७ ते ८ महिन्यांचे झाल्यानंतर त्याच्या हालचाली त्याच्या आई वडिलांसाठी सुखद धक्का देणाऱ्या असतात. कारण या काळातच बाळ स्वत-च इवलसं शरीर उचलून तुमच्या हातातला चमचा हिसकावू पाहते. तेव्हा समाजायचे की त्याला आता नवीन आहार सुरू करायची हीच योग्य वेळ आहे. आता त्याला दिवसातून तीन वेळा तरी पूरक आहार दिला पाहिजे. त्यात एक तृणधान्य, एक भाजी आणि एक फळ यांचा समावेश करावा.

बाळाला नाष्टा म्हणून स्तन्यपान दिले तरी चालेल. नाष्टा झाल्यावर काही वेळाने परंतु जेवण्याआधी बाळाला उकडलेले गाजर कुस्करून घ्यावे.

  • जेवणामध्ये साधारण मऊसर तसेच गिळता येईल अशी मुगाच्या डाळीची खिचडी असावी.

  • रात्री एकदा पुन्हा शिजवलेले रताळे अथवा उकडलेला बटाटा द्यावा. झोपताना पुन्हा एकदा स्तन्यपान देवून बाळाला झोपावावे.

  • मऊ शिजणाऱ्या भाज्या आणि फळे यांचा शिजवून लगदा करून आहार म्हणून द्यावा.

  • सुरुवातीला पालक, भोपळा, कोहळा, रताळे, लाल भोपळा, गाजर अशा भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरून मऊ वाफवू द्याव्यात. हे शिजवताना त्यात पाणी मात्र घालू नये. किंवा वापरले तर पाणी फेकून देऊ नये. कारण त्यामध्ये जीवनसत्त्वे असतात

  • फळांमध्ये सफरचंद, पेरू, चिकू, केळी हे सुद्धा साल आणि बिया काढून वाफवून द्यावे. आणि लक्षात असुद्या, एकावेळी एकच भाजी किंवा फळ द्यायचे आहे.

आपल्या ८ ते ११ महिन्यांच्या मुलाचे असे साधारण आहाराचे वेळापत्रक असावे. बाळाच्या क्षमतेनुसार बाळाला कमी जास्त आहार करावा. म्हणजे बाळाला सायंकाळी खिचडी किंवा उकडलेला बटाटा दिला आणि बाळाचे पोट भरले असले तर स्तन्यपान देऊ नये. खिचडीच्या ऐवजी मऊसर भात तिखट नसलेली आमटी किंवा गव्हाच्या रवा मऊसर लापशी द्यावी. पुढील लेखात बाळाच्या आहाराची पुढील माहिती घेऊयात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com