वसा आरोग्याचा : ज्वारीच्या भाकरीचे फायदे

ज्वारीची भाकरी थंड असते. ज्वारी रुक्षता देणारी असून, पचायला हलकी असते. ज्वारी खाल्ल्याने ऊर्जा मिळते.
sorghum
sorghumsakal

- डॉ. कोमल बोरसे

ज्वारीची भाकरी थंड असते. ज्वारी रुक्षता देणारी असून, पचायला हलकी असते. ज्वारी खाल्ल्याने ऊर्जा मिळते. वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तरीही ज्वारी खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. ज्वारी खाल्ल्यानंतर फार वेळ भूक लागत नाही. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. ज्वारीमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. परिणामी हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअमचा ज्वारी चांगला स्रोत असून, रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते. हिवाळ्यात ज्वारीचे सेवन करणे अधिक फायदेशीर असते. गव्हाची ॲलर्जी असल्यास ज्वारीचे सेवन फायदेशीर ठरू शकते. ज्वारीमध्ये भरपूर फायबर असते, त्यामुळे ते सहज पचते.

अत्यंत पौष्टिक आहार

बाजरी अत्यंत पौष्टिक आहे. ती गव्हाच्या चपाती किंवा फुलक्यासाठी योग्य पर्याय बनते. वजन कमी करण्यासाठी बाजरीची भाकरी उत्तम आहे. बाजरीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. फायबर तुमच्या आहाराला मोठ्या प्रमाणात फायद्याचा आहे; यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. बाजरी मधुमेही रुग्णांसाठी उत्तम पर्याय असून, ती रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. बाजरी कोलेस्ट्रॉलची पातळीही कमी करते.

बाजरीच्या भाकरीच्या सेवनाने अनेक आजारांचा धोका कमी होतो. आजकाल बाजरीची भाकरी लोकप्रिय आहे; कारण ती ग्लूटेन-फ्री आणि वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. बाजरीची भाकरी खाऊन तुम्हाला तृप्त वाटते आणि जास्त खाणे टाळता येते. बाजरी मॅग्नेशियमचा चांगला स्रोत असल्याने, हृदयाच्या रुग्णांनी आहारात बाजरीच्या भाकऱ्यांचा समावेश करणे चांगले आहे.

मॅग्नेशिअम रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या हृदयरोगाच्या जोखीम घटकांना प्रतिबंधित करण्यास सक्षम आहे. हिवाळ्यात बाजरीच्या भाकरीचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. नाचणी फायबर, कॅल्शिअमचा उत्तम स्रोत आहे. नाचणीतील फायबर तुम्हाला जास्त काळ पोटभर ठेवते. त्यामुळे वजन नियंत्रणासाठी उपयुक्त आहे.

एक ग्लास दूध आणि नाचणीची भाकरी यांच्यात तुलना केल्यास, नाचणीमध्ये ४५५ तर दुधात २९५ मिलिग्रॅम कॅल्शिअम. नाचणी मधुमेहींसाठीही उत्तम पर्याय आहे. नाचणीची भाकरी पचायला हलकी असते. ॲनिमियाचा त्रास असल्यास, अंगातील रक्त वाढवण्यासाठी नाचणीच्या भाकरीचा आहारात समावेश करावा.

ऋतूनुसार किंवा वेळेनुसार भाकरी किंवा चपातीचा योग्य प्रकार निवडावा. दोन वेळच्या जेवणापैकी एक वेळेला गव्हाची चपाती आणि एक वेळेला भाकरी असे नियोजन करता येऊ शकते. सकाळी चपाती किंवा फुलका; कारण ते

पचायला जड असते आणि डब्याला नेणे सोईस्कर असते. भाकरी कडक आणि पचायला हलकी असल्याने रात्री खावी. ज्वारीची भाकरी थंड असल्याने ती उन्हाळ्यात खाऊ शकतो. बाजरी उष्ण असते म्हणून हिवाळ्यात आणि पावसाळ्यात खाण्याला प्राधान्य द्यावे. नाचणीही शीत असते. ती आपण उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात योग्य प्रमाणात खाऊ शकतो.

ज्वारी आणि नाचणी पचायला हलकी असते. बाजरी पचायला थोडी जड असते. हिवाळ्यात कोणतीही भाकरी खात असल्यास त्यावर घरी बनवलेले पाच ग्रॅम शुद्ध देशी तूप घ्यावे, म्हणजे रुक्षता येणार नाही. एक चपाती म्हणजे दोन फुलके आणि अर्धी भाकरी असे प्रमाण ठरवले जाते. आपल्या पूर्वजांच्या खाद्यसंस्कृतीकडे परत जाण्याने आरोग्याच्या अनेक समस्या सुटतील.

रोटी आपल्या आहाराचा अविभाज्य भाग असला तरी वजन कमी करणे, मधुमेह, पीसीओडी किंवा अशा कोणत्याही आजारासाठी ते पूर्णपणे वगळण्याची गरज नाही. किरकोळ बदल घडवून आणल्यास त्याची मदत होऊ शकते. बाजरी, नाचणी, ओट्स, ज्वारी, बेसन यांसारखे पीठ एकत्रित केल्याने तुमच्या जेवणात नैसर्गिक शक्ती वाढते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com