

- डॉ. पंकज बेंडाळे
सामान्य भाषेत काचबिंदूलाच काळा मोती असेही म्हटले जाते. जगातील अंधत्वाचे ते एक प्रमुख कारण आहे. आपल्या देशातही बहुतांश रुग्णांना यामुळेच अंधत्व येते. काचबिंदूच्या प्रत्येक सात रुग्णांपैकी एक रुग्ण उपचारांपूर्वीच अंध झालेला आढळून येतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे अंधत्व टाळता येण्यासारखे असते.
काचबिंदूबाबत जागृती, काळजीपूर्वक केलेली तपासणी आणि वेळच्या वेळी काटेकोरपणे घेतलेले उपचार या त्रिसूत्रीच्या आधारे काचबिंदूतून येणारे अंधत्व निश्चित टाळता येऊ शकते. त्यासाठी वयाची चाळिशी ओलांडलेल्या प्रत्येकाने तज्ज्ञांकडून डोळ्याची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे.
दबक्या पावलांनी येणारा आजार
काचबिंदूच्या रुग्णांना डोळ्यांचा कोणताच त्रास होत नाही. कारण, काचबिंदू हा दबक्या पावलाने येणारा आजार आहे. त्याची कोणतीच ठळक लक्षणे दिसत नाहीत. म्हणून, त्याचे निदान सर्वसाधारणपणे डोळ्यांची तपासणी करतानाच केले जाते.
काचबिंदूचे प्रकार
द्रव्य बाहेर टाकणाऱ्या नलिका कशा पद्धतीने बंद होतात, किंवा त्या अडथळे कसे निर्माण होतात, यावरून काचबिंदू कोणत्या प्रकारचा आहे, याचे निदान नेत्रतज्ज्ञांना होते. ‘ॲक्युदट अँगल क्लोजर ग्लॉकोमा’ आणि ‘ओपन अँगल ग्लॉकोमा’ असे काचबिंदूचे दोन प्रकार आहेत. काही रुग्णांना जन्मजात काचबिंदू असतो, तर काही रुग्णांमध्ये डोळ्याला झालेली इजा, स्टेरॉइडसारखी औषधे, डोळ्यातील गाठ, रक्तस्राव यामुळे डोळ्यातील दाब वाढू शकतो. त्याला ‘सेकंडरी ग्लॉकोमा’ म्हटले जाते.
असे होते निदान
काचबिंदूचे निदान लवकर होणे आवश्यक असते. काचबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी टोनोमीटरच्या साह्याने डोळ्याचा दाब तपासला जातो. ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी तपासणीतून डोळ्याच्या मागची नेत्रचेता पाहिली जाते. औषध टाकून मोठ्या केलेल्या डोळ्याच्या बाहुलीतून डोळ्याचा पडदा, नेत्रचेता याची रचना बघितली जाते.
पेरिमेट्रीच्या मदतीने दृष्टिक्षेत्राचे मूल्यांकन केले जाते. बाह्यवर्ती दृष्टिक्षेत्राला काचबिंदूमुळे सर्वांत हानी होते. गोनियोस्कापोतून डोळ्यातील निस्सारण नलिकेची तपासणी करतात. काचबिंदूवर औषधांनी, लेसर किंवा शस्त्रक्रियेद्वारे उपचार करता येऊ शकतात.
शक्यता केव्हा असते
कुटुंबात काचबिंदू आनुवंशिक असल्यास
रात्री दिसायला त्रास होत असल्यास
चष्म्याच्या नंबरमध्ये वारंवार बदल झाल्यास
प्रकाशाकडे बघितल्यानंतर रंगीत प्रभामंडळ दिसत असल्यास
चष्म्याचा नंबर जास्त असल्यास
(लेखक ‘एनआयओ‘मध्ये नेत्रतज्ज्ञ आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.