
संवाद : व्हायरल फिव्हरवरील उपचार
- डॉ. संकेत काळे
लहान मुलांमध्ये चढ-उतार होणारा ताप, सर्दी-खोकला व अंगदुखी ही ‘व्हायरल फिव्हर’ची काही मुख्य लक्षणे आहेत. या लक्षणांवरून व क्वचित प्रसंगी चाचण्यांवरून ‘व्हायरल फिव्हर’चे निदान बालरोगतज्ज्ञ करतात. उपचार व घ्यावयाची काळजी याबद्दल पालकांच्या मनातील काही प्रश्नांची उत्तरे आपण आज जाणून घेऊयात.
कोणत्या प्रकारची औषधे द्यावी लागतात?
‘व्हायरल फिव्हर’मध्ये मुख्यतः लक्षणात्मक औषधे उपयोगी ठरतात. अँटी-व्हायरल औषधे काही ठराविक आजारांमध्येच वापरली जातात. बहुतांश मुलांना त्यांची गरज पडत नाही. अँटिबायोटिक औषधे फक्त जिवाणू विरुद्ध काम करत असल्यामुळे, सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शनचा अपवाद वगळता ‘व्हायरल फिव्हर’मध्ये त्यांचा उपयोग होत नाही.
तापामध्ये मुलांची काळजी कशी घ्यावी?
ताप कमी करण्यासाठी पॅरासिटामोल सारखे औषध बालरोगतज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणात द्या.
अंग कोमट पाण्याने पुसून घ्या.
मोकळे सुती कपडे घाला.
मुलांना हवेशीर खोलीत ठेवा.
तापाची तीव्रता, लघवीचे प्रमाण, दिलेली औषधे, घेतलेला आहार, इतर पथ्य-पाणी याची काटेकोरपणे नोंद ठेवा.
‘व्हायरल फिव्हर’ बरा होण्यासाठी किती दिवस लागतात? रुग्णालयात ॲडमिट करावे लागते का?
साधारणतः ३-५ दिवसात तापाचा जोर कमी होतो. सर्दी-खोकला बरा होण्यासाठी मात्र १-२ आठवडे लागू शकतात. योग्य खबरदारी घेतल्यास बहुतांश घरीच बरी होतात.
रुग्णालयात ॲडमिट करण्याची कारणे
मलूल पडणे, श्वास घेण्यास त्रास होणे, लघवी कमी होणे, डिहायड्रेशन, इतर धोक्याची लक्षणे
चाचण्यांच्या परिणाम, प्रकृती चिंताजनक असल्यास (उदा. न्यूमोनिया, डेंग्यू शॉक सिन्ड्रोम आदी)
सलाईनद्वारे औषधे द्यावी लागणार असल्यास काही क्लिष्ट चाचण्या कराव्या लागणार असल्यास ‘व्हायरल फिव्हर’मध्ये मुले नेहमीप्रमाणे जेवण करत नसल्यास त्यांच्या आहाराची काळजी कशी घ्यावी?
मुलांना दर १-२ तासांनी ‘चिऊचा-काऊचा’ घास द्या.
भरपूर द्रवपदार्थ द्या. उकळून थंड केलेले पाणी, नारळ पाणी, योग्य प्रमाणात तयार केलेले ओ.आर.एस (जलसंजीवनी) आदी.
पचायला हलके, पौष्टिक पदार्थ द्या. मऊ भात, खिचडी, भाताची पेज, व्हेजिटेबल सूप, इडली आदी.
घरी शिजवलेले जेवण द्या. बाजारात मिळणारे पाकिटातील सूप, टू मिनीट नूडल, फ्रूट ज्यूस टाळा
आजारपणात मुलांशी खूप गप्पा मारा, त्यांना गोष्टी सांगा, गाणी म्हणा, बैठे खेळ खेळा. यामुळे मुलांचा तणाव कमी होतो. टी.व्ही., मोबाईलचा अतिवापर टाळा. अशक्तपणा असल्यास मुलांना शाळेत पाठवण्याची गडबड करू नका. बरं वाटेपर्यंत विश्रांती घेऊ द्या.
काही मुले इतरांच्या तुलनेत वारंवार आजारी पडतात. त्यासाठी काही प्रतिबंधात्मक पाऊले उचलता येतील का? याबद्दल पुढील भागात चर्चा करूयात.
(लेखक बालरोगतज्ज्ञ आहेत.)