
कोरडा खोकला, चालल्यावर दम लागणे आणि त्याचबरोबर ऑक्सिजनची कमतरता जाणवणे ही फुफ्फुसाच्या आजाराची लक्षणे आहेत.
आरोग्यशास्त्र : फुफ्फुसाचा आजार आणि उपचार
- डॉ. स्नेहा तिरपुडे
कोरडा खोकला, चालल्यावर दम लागणे आणि त्याचबरोबर ऑक्सिजनची कमतरता जाणवणे ही फुफ्फुसाच्या आजाराची लक्षणे आहेत.
कोणाला होतो?
काही लोकांना संधीवाताच्या आजारामुळे फुफ्फुसाला हा आजार सुरू होतो. प्रामुख्याने अनेक वर्ष धुराचा सामना करावा लागल्याने ही व्याधी जडण्याची शक्यता वाढते. वयानुसारही या आजाराची लक्षणे दिसतात.
कोणत्या भागात त्रास होतो?
आपली श्वासनलिका फुफ्फुसामध्ये विभाजित होऊन छोटी श्वासनलिका तयार होऊन अंतिमतः वायू कोषामध्ये संपते. त्याच्याभोवतीची रक्तवाहिनी ऑक्सिजन खेचत असते. त्यातून पूर्ण शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. फुफ्फुसाचा आजारामुळे श्वसनलिकेला सूज येते. त्यामुळे रक्तवाहिनी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन खेचू शकत नाही. त्यातून शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि दम लागतो. आपल्या फुफ्फुसामध्ये अनेक वायूकोष असतात, त्यामुळे आजार लगेच लक्षात येत नाही. एक एक करून वायू कोष सुजतो. त्यातून हा आजार बळावत जातो.
सूज कशी बरी होईल?
सूज कोणत्या कारणामुळे आली आहे, त्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. चांगल्या प्रतिकारशक्तीमुळे फुफ्फुसांच्या व्याधीवरील उपचारांना योग्य प्रतिसाद मिळतो. योग्य औषधोपचारामुळे व्याधी बळाविण्याचा वेग कमी होतो, परंतु तो तात्पुरता दिलासा असतो.
कोणती तपासणी केली जाते?
छातीचा HRCT स्कॅन करून इंटरस्टिशिअल फुफ्फुसाचा रोग आहे की नाही हे समजू शकते. या आजाराचे उपप्रकार जसे की, इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस (IPF) किंवा नॉन स्पेसिफिक इंटरस्टिशियल फायब्रोसिस (NSIP) किंवा सार्कोआडोसिस हे सिटी स्कॅनच्या तपासणीनंतरच निश्चित केले जाऊ शकतात. कधीकधी इंटरस्टिशियल फुफ्फुसाच्या व्याधीचा प्रकार निश्चित करण्यासाठी बायोप्सीचीही आवश्यक असते. त्यानंतर रक्ताचीही तपासणी करावी लागते. पल्मोनरी फंक्शन टेस्ट आणि कार्बन मोनॉक्साईडमुळे आयएलडीचा फुफ्फुसातील प्रसार समजतो.
सहा मिनिटे चालण्याची चाचणी - प्रगतीचा वेग आणि उपचारांना प्रतिसाद पाहण्यासाठी.
मॅनटॉक्स चाचणी - उपचार सुरू करण्यापूर्वी क्षयरोगाचा कोणताही सुप्त संसर्ग नाही, हे तपासणे आवश्यक असते. त्यावर आधी उपचार करणे आवश्यक आहे.
२ डी इको - फुफ्फुसातील उच्च रक्तदाब शोधणे आणि त्याचे निरीक्षण करणे.
उपचार
इम्युनोसप्रेसिव्ह औषधे व्याधीच्या वाढीचा वेग कमी करतात. ते लक्षणेही नियंत्रणात ठेवतात.
सुप्त क्षयरोग संसर्ग असल्यास उपचार करणे आवश्यक आहे.
उपचाराशी संबंधित ऑस्टिओपोरोसिस टाळण्यासाठी कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डीचे सेवन आवश्यक आहे.
त्यासाठी हाडांची घनता तपासणे.
फुफ्फुसाच्या कोणत्याही गंभीर संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण आवश्यकच आहे.
प्रतिसाद न मिळाल्यास फुफ्फुस प्रत्यारोपणाचा पर्याय तपासला जातो.
आयएलडीचे योग्य प्रकाराचे वर्गीकरण करण्यासाठी रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट आणि पल्मोनोलॉजिस्ट यांची संयुक्त चर्चा आवश्यक आहे.
(लेखिका क्षयरोगतज्ज्ञ आहेत.)