आरोग्यमंत्र : त्वचेचे कुपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Malnutrition of the skin

‘मॅडम, त्वचा फार रुक्ष झाली आहे.’ ‘केस लवकर तुटतात. आखूड झालेत.’ ‘तळव्याच्या संवेदनाच नाहीशा झाल्यासारख्या वाटतात.’

आरोग्यमंत्र : त्वचेचे कुपोषण

- डॉ. तनुजा ताम्हनकर

‘मॅडम, त्वचा फार रुक्ष झाली आहे.’ ‘केस लवकर तुटतात. आखूड झालेत.’ ‘तळव्याच्या संवेदनाच नाहीशा झाल्यासारख्या वाटतात.’

असे अनेकविध प्रश्न रुग्ण मला विचारतात. बहुतांश वेळेला त्यांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याजवळच मिळतात. त्यांच्या वेगवान जीवनशैलीमुळे त्वचेचे पालनपोषण व्यवस्थित नसल्याने अशा समस्या उद्‍भवतात. याला त्वचेचे कुपोषण म्हणतात.

आपल्या अंतर्गत स्वास्थाच्या पोषणाचा त्वचा आरसा आहे. जेवणाच्या अनियमित वेळा, असंतुलित आहार, बाहेरचे खाणे, जंक फूडचा अतिरेक, फळे, पालेभाज्या, सुकामेवा यांचा अभाव ही त्याची प्रमुख कारणे आहेत. वेगवेगळ्या पोषणतत्त्वांच्या अभावाने वेगवेगळ्या समस्या उद्‍भवतात.

‘अ’ जीवनसत्त्वाचा अभाव

बीटा कॅरोटिन किंवा ‘अ’ जीवनसत्त्व त्वचेसाठी गुणकारी आहे.

  • कार्य - त्वचेचा मऊपणा जपणे. त्वचावार्धक्य रोखणे.

  • अभावामुळे होणारे परिणाम - त्वचेचा रुक्षपणा, त्वचेवर खवले येणे, नखे ठिसूळ होणे, यांस ‘मंडूकत्वचारोग’ किंवा ‘फ्रायनोडर्मा’ असे म्हणतात.

  • उपाय - हिरव्या पालेभाज्या, पपई, केळे, गाजर, मासे यांचे नित्य सेवन करावे. तीव्र लक्षणे असल्यास ‘अ’ जीवनसत्त्वांच्या गोळ्या त्वचाविकारतज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्याव्यात.

‘क’ जीवनसत्त्वाचा अभाव

‘क’ जीवनसत्त्व किंवा अ‍ॅस्कॉर्बिक अ‍ॅसिड त्वचेची संरक्षक ढाल समजली जाते.

  • कार्य - त्वचेतील नवनवीन संरचनात्मक प्रथिनतंतू बनविणे. (उदा. कोलॅजेन, इलॅस्टिन इ.) त्वचेचा लवचिकपणा तसेच रक्ताभिसरण जपणे.

  • अभावामुळे होणारे परिणाम - त्वचेला सहजपणे भेगा पडणे, त्यातून रक्तस्राव होणे, हिरड्या सुजणे, त्वचेखाली रक्तस्राव होऊन पुरळ (रॅश) येणे.

  • उपाय - आंबट पदार्थांचे नित्य सेवन महत्त्वाचे आहे. उदा. लिंबू, संत्रे, मोसंबी, आवळा, चिंच इ. तीव्र लक्षणे असल्यास ‘क’ जीवनसत्त्वाच्या गोळ्या तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्याव्यात.

‘ई’ जीवनसत्त्वाचा अभाव

‘ई’ जीवनसत्त्व/टोकोफेरॉल ही त्वचेची रोगप्रतिकार क्षमता आहे.

  • कार्य - त्वचेतील पेशींची उलाढाल नियंत्रित करणे, त्वचेची रोगप्रतिकारक्षमता वाढवणे, नखातील कॅरॅटिनची गुणवत्ता टिकवणे.

  • अभावामुळे होणारे परिणाम - त्वचा रुक्ष व निस्तेज होणे, केस आखूड, ठिसूळ होणे व गळणे, नखांवर भेगा पडणे, ती निस्तेज होणे.

  • उपाय - हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा, अंडी, मासे यांचे नियमित सेवन.

‘ब’ जीवनसत्त्वाचा अभाव

‘ब’ जीवनसत्त्वे त्वचेच्या सर्वांगीण स्वास्थासाठी महत्त्वाची आहेत.

  • कार्य - पेशींमधील जनुकांचे काम नियंत्रित करणे, त्वचापेशींचे आयुर्मान वाढविणे, तोंड व नाकाच्या ओलसर आवरणांचा मऊपणा जपणे.

  • अभावामुळे होणारे परिणाम - नायसिनचा अभाव. यास ‘पेलामा’ म्हणतात. अंगावर लालसर पुरळ उठणे, तोंडाला जर येणे, हातापायांच्या तळव्यांना भेगा पडणे, फोलिक अॅसिड व ‘ब-१२’ जीवनसत्त्वाचा अभाव. हातापायांच्या तळव्यांच्या संवेदना मंदावणे.

  • उपाय - हिरव्या पालेभाज्या, फळे, दूध, अंडी यांचे सेवन करावे.

‘झिंक’ची कमतरता

‘झिंक’ हे मूलद्रव्य ‘ई’ जीवनसत्त्वांसोबत काम करते. त्वचेच्या रक्षणासाठी ते महत्त्वाचे आहे.

  • कार्य - त्वचेतील प्रतिकारक्षम पेशी वाढविणे, त्वचापेशींची उलाढाल नियंत्रित करणे, त्वचा वार्धक्य रोखणे.

  • अभावामुळे होणारे परिणाम - रुक्ष त्वचा, हातपायांची त्वचा भेगाळणे, केस आखूड, पातळ व पांढरे होणे. गुदद्वाराभोवती भगेंद्र होणे.

  • उपाय - तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ‘झिंक’च्या गोळ्या घेणे.. फळे, सुका मेवा, दूध यांचे नित्य सेवन करावे.

लोहाची कमतरता

लोह हा त्वचेचा श्वासच आहे. त्यामुळे त्वचेमध्ये प्राणवायूचे सुयोग्य अभिसरण होते व रक्तवाढ होते.

  • अभावामुळे होणारे परिणाम - रक्तक्षय/पंडुरोग म्हणजेच ॲनिमिया होतो. त्वचा निस्तेज पडते. डोळ्यांभोवती काळी वर्तुळे होतात.

  • उपाय - हिरव्या पालेभाज्या, दूध, बीट, अंडी, मासे, सेंद्रिय गूळ त्यांचे नित्य सेवन करावे.

मेदाम्लांची कमतरता

मेदाम्ले (फॅटी अ‍ॅसिड्स) महत्त्वपूर्ण आहेत.

  • कार्य - ‘अ’, ‘ई’ जीवनसत्त्व व ‘झिंक’च्या कार्यात मदत करणे, पेशींभोवतीचे आवरण बनविणे.

  • अभावामुळे होणारे परिणाम - ‘अ’, ‘ई’ जीवनसत्त्व, ‘झिंक’च्या अभावासारखेच परिणाम दिसतात.

  • लक्षणे - एक चमचा तूप आहारात नित्य घ्यावे.

  • त्वचेचे कुपोषण सहजरित्या टाळण्यासारखे आहे. त्वचेच्या सुयोग्य पोषणामुळे आपण नानाविध त्वचाविकार सहजतेने टाळू शकतो.

टॅग्स :skinmalnutritionhealth