- डॉ. मानसी गोडबोले (घारपुरे), नेत्रतज्ज्ञ
मोतीबिंदू (Cataract) म्हणजे डोळ्याचे नैसर्गिक भिंग अपारदर्शक होणे. त्यामुळे दृष्टी अधू होते. त्यावर उपाय म्हणजे शस्रक्रिया करून मोतीबिंदू काढणे व कृत्रिम भिंगारोपण करणे. इतर कोणत्याही उपायांनी मोतीबिंदू बरा होत नाही.
मोतीबिंदूची कारणे
1) वय : वयोमानानुसार डोळ्याची नैसर्गिक लेन्स कमकुवत होते. त्याची पहिली पायरी म्हणजे चाळिशीचा चष्मा लागणे. यामध्ये भिंगाची लवचीकता, फोकस करण्याची क्षमता कमी होऊ लागते. दुसरी पायरी म्हणजे साधारणतः साठीच्या पुढे मोतीबिंदूचे बदल घडणे. वयाने घडणारे हे बदल टाळता येत नाहीत.
2) मधुमेह, डोळ्याला मोठा चष्मा नंबर असणे, आनुवंशिकता; धूम्रपान, मद्यपानाचे व्यसन आदी कारणांमुळे मोतीबिंदू लवकर होण्याचा संभव असतो.
3) डोळ्याला इजा (Trauma), वारंवार सूज येणे (Uveitis)
4) स्टिरॉइडचा कोणत्याही स्वरूपात (गोळ्या, मलम, डोळ्याचे ड्रॉप्स, इंजेक्शन) अतिवापर झाल्यास मोतीबिंदू होऊ शकतो.
5) जन्मजात (Congenital): काही मुलांना जन्मतः मोतिबिंदू असतो.
मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेपूर्वी केल्या जाणाऱ्या तपासण्या
रक्त व लघवी तपासणी : यामध्ये विशेषतः हिमोग्लोबिन व रक्तामधील पेशींची संख्या योग्य आहे ना, साखर प्रमाणाबाहेर नाही ना, व लघवीमध्ये इन्फेक्शन नाही ना, हे बघितले जाते.
ईसीजी व फिजिशियन डॉक्टरांचे फिटनेस सर्टिफिकेट
डोळ्यांच्या तपासण्या
अ.) बाहुली मोठी करून डोळ्याची आतली तपासणी : यामध्ये मोतीबिंदूची पूर्ण जागा तसेच मागचा पडदा तपासला जातो. नेहमीपेक्षा वेगळी परिस्थिती आढळल्यास (उदा. अती पिकलेला, जागेवरून हललेला मोतीबिंदू, लवचिक नसणारी बाहुली, रेटिनाला दुखापत) त्याप्रमाणे शस्त्रक्रियेच्या वेळी विशेष काळजी घेतली जाते. तसेच या इतर अडचणींमुळे शस्त्रक्रियेत काही बाधा आली तर दृष्टीत सुधारणा अपेक्षेपेक्षा कमी राहू शकते. याची पेशंटला आधीच कल्पना देता येते.
ब.) डोळ्याचा दाब मोजणे : हा प्रमाणाबाहेर वाढलेला असेल (काचबिंदू) तर तो औषधोपचाराने कमी करावा लागतो. मगच मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करणे सुरक्षित असते.
क.) A scan द्वारे कृत्रिम भिंगाचे माप घेणे.
ड.) OCT scan द्वारे मागच्या पडद्याच्या आरोग्याची अधिक माहिती मिळवणे. काही रेटिनाचे सूक्ष्म आजार जे तपासताना कळत नाहीत, ते हा scan अचूक दाखवतो.
(कृत्रिम भिंगारोपणाबद्दल माहिती पुढच्या भागात)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.