बुब्बुळातील दोषांची सुधारणा

निसर्गतः डोळ्याच्या बुब्बुळांचा आकार गोलाकार असतो; पण काही व्यक्तींच्या बुब्बुळाच्या रचनेमध्ये बदल होऊन एक प्रकारचा फुगवटा येतो.
Eye Health Solution
Eye Health Solutionsakal
Updated on

- डॉ. आदित्य केळकर, नेत्रतज्ज्ञ, एनआयओ, पुणे

निसर्गतः डोळ्याच्या बुब्बुळांचा आकार गोलाकार असतो; पण काही व्यक्तींच्या बुब्बुळाच्या रचनेमध्ये बदल होऊन एक प्रकारचा फुगवटा येतो. त्यांचा आकार शंकूप्रमाणे (कोन) होतो. यालाच केरॅटोकोनस असे म्हणतात.

केरॅटोकोनसची कारणे

डोळ्यांमध्ये कोलॅजन नामक तंतू असतात. त्यामुळे बुब्बुळाचा आकार स्थिर राहतो आणि त्याला फुगवटा येत नाही; पण हे तंतू नाजूक झाले, की त्यांना बुब्बुळाचा आकार सांभाळून ठेवणे शक्य होत नाही आणि त्याचा आकार शंकूप्रमाणे होत जातो. केरॅटोकोनस एखाद्या कुटुंबात आनुवंशिकतेने आढळून येतो. आपल्या कुटुंबात ही समस्या असल्यास वयाच्या दहाव्या वर्षापासून आपल्या मुलाच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला जातो. अशी स्थिती डोळ्यांच्या काही ॲलर्जिक समस्यांमुळेही उद्‍भवू शकते. याचा संबंध वारंवार डोळे चोळण्याशीदेखील असू शकतो.

केरॅटोकोनसची लक्षणे

सुरुवातीच्या लक्षणांमध्ये दृष्टी धूसर होणे, वारंवार चष्म्याच्या नंबरमध्ये बदल होत असल्याचे जाणवणे यांचा समावेश असतो. कधी कधी दृष्टीत असा बदल घडून येतो, ज्यात दृष्टी चष्म्याच्या नंबरनेदेखील सुधारता येत नाही. केरॅटोकोनसची लक्षणे किशोर वयाच्या अखेरीस किंवा विसाव्या वयाच्या सुरुवातीला जाणवू लागतात.

विशिष्ट तपासण्या

कॉर्नियल टोपोग्राफी : यामध्ये संगणकाच्या साह्याने बुब्बुळाची त्रिमितीय छायाचित्रे काढली जातात. त्याद्वारे बुब्बुळाची वक्रता मोजता येते. कॉर्नियल टोपोग्राफीमुळे केरॅटोकोनसचे निदान करणे सहज शक्य झाले असून, समस्या बळावण्याचे प्रमाणदेखील अचूकपणे समजू शकते. शिवाय डोळ्यांच्या अन्य समस्या आणि केरॅटोकोनस यांमधील फरकदेखील सहज लक्षात येऊ शकतो.

पॅकिमेट्री : या तपासणीद्वारे बुबुळाची जाडी मोजता येते. केरॅटोकोनस असलेल्या रुग्णांमध्ये बुबुळाची जाडी कमी असते.

केरॅटोकोनसवरील उपचार

चष्मा लावणे : सुरुवातीच्या टप्प्यात दृष्टी सुधारण्याकरिता चष्म्याचा वापर केला जाऊ शकतो.

कॉन्टॅक्ट लेन्स : त्रास वाढत गेल्यावर बुब्बुळाच्या पातळ होण्याने आणि फुगण्याने दृष्टिदोष वाढत जातो. चष्म्याच्या मदतीने दृष्टी सुधारली नाही, तर रिजिड कॉन्टॅक्ट लेन्सच्या मदतीने दृष्टी तात्पुरती येते.

कॉर्नियल कोलॅजन क्रॉस लिंकिंग विथ रायबोफ्लेविन : हा एक साधा उपचार आहे. बुब्बुळातील कोलॅजन तंतू रायबोफ्लेविन (व्हिटॅमिन बी २) नामक जीवनसत्त्व आणि अल्ट्राव्हायोलेट (यूव्ही) प्रकाशकिरणांच्या मदतीने अनुबंधित केले जातात आणि बुब्बुळाची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. याद्वारे समस्या बळावण्यावर नियंत्रण ठेवले जाते.

इंट्राकॉर्नियल रिंग्ज : जेव्हा चष्मा किंवा लेन्सने नजर सुधारत नाही आणि ही समस्या बळावत जाते, तेव्हा इंट्राकॉर्नियल रिंग्ज फेम्टो लेसरच्या मदतीने बसविल्या जातात. त्यामुळे बुब्बुळाचा आकार सुधारून दृष्टीत सुधारणा होऊ शकते.

बुबुळाचे प्रत्यारोपण : वरीलपैकी कोणतेही उपाय उपयोगी ठरत नसतील, किंवा बुब्बुळाबर फूल पडल्यास, बुब्बुळ बदलता येऊ शकते. त्यातही आजकाल फेम्टो लेसर तंत्रज्ञानाचा उपयोग करता येऊ शकतो.

केरॅटोकोनसचे निदान

  • डोळ्यांच्या तपासणीच्या वेळेला नेत्रतज्ज्ञांना दिसलेल्या लक्षणांवरून त्याचे निदान करता येते.

  • बुब्बुळ पातळ होणे

  • फ्लेशर्स रिंग (शंकूच्या भोवताली लोहाच्या रंगाची कडी दिसणे)

  • वॉट्स स्ट्राय (बुब्बुळ पातळ झाल्याने त्यावर ताण येऊन रेषा उठणे)

  • बुब्बुळावर पांढरा डाग असणे

इतर लक्षणे

  • प्रकाशास संवेदनशीलता

  • रात्री गाडी चालविण्यास त्रास होणे

  • डोकेदुखी व डोळ्यांत वेदना

  • डोळे जास्त प्रमाणात चोळणे

  • बुब्बुळांवर पांढरा डाग (फूल) पडणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com