फिटनेस आणि आरोग्य

फिटनेस आणि आरोग्य हे जीवनाचे वेगवेगळे पैलू आहेत.
Fitness and Health
Fitness and Healthsakal
Updated on

- महेंद्र गोखले, फिटनेसविषयक प्रशिक्षक

फिटनेस आणि आरोग्य हे जीवनाचे वेगवेगळे पैलू आहेत. आपण फिटनेसकडे वरवर पाहता आपल्याला असे वाटते, की फिटनेस म्हणजे एखादी व्यक्ती बारीक किंवा सुडौल बांध्याची असेल तर ती फिट असेल.

परंतु फिटनेसचा खरा अर्थ म्हणजे ‘कोणत्याही प्रकारच्या मानसिक किंवा शारीरिक ताणतणावाला तोंड देण्याची आणि कोणत्याही रोगापासून, आजारापासून दूर राहून नियमित ॲक्टिव्हिटी करण्याची क्षमता.’ योग्य आहार आणि नियमित दैनंदिन व्यायाम आणि पुरेशी झोप हे चांगल्या आरोग्याचा पाया आहेत.

चांगल्या आरोग्यामध्ये

  • शारीरिक आरोग्य : शरीराची स्थिती आणि दीर्घकालीन आजाराची अनुपस्थिती.

  • मानसिक आरोग्य : भावनिक आणि मानसिक सुदृढता ज्यामध्ये ताण, चिंता आणि नैराश्य यासारख्या घटकांचा समावेश आहे.

  • सामाजिक आरोग्य : समाधानकारक परस्पर संबंध निर्माण करण्याची आणि सामाजिक परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता.

निरोगी जीवनशैलीची दिशा

आपल्या शरीराला काय देत आहोत याकडे लक्ष द्या : हा ‘निरोगी जीवनशैली’चा सर्वांत सोपा भाग आहे. चांगले आणि निरोगी अन्न खाणे ही गुरुकिल्ली आहे. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती, चयापचय आणि योग्य वाढ ही काही महत्त्वाच्या घटकांवर अवलंबून असते, जसे की प्रथिने, जीवनसत्त्वे, कर्बोदके, फॅट, मिनरल्स (खनिजे) इत्यादींचा योग्य पुरवठा. आपण आपले दिवसभराचे खाद्य (जेवण) साधारण चार-पाच जेवणात विभागून घ्यावे.

यामुळे वजन वाढणार नाही आणि सगळे अन्न शरीरात वापरले जाईल. दुग्धजन्य पदार्थ, भाज्या, फळे आणि हलके मांस तुमच्या आहाराचा भाग असले पाहिजे. थोड्या-थोड्या वेळाने पाणी पीत राहा. शरीराला दररोज किती पाण्याची आवश्यकता आहे ते तपासा. जंक फूड, साखर आणि कोल्ड्रिंक्स टाळा. तुम्ही नियमितपणे सिगारेट, तंबाखू, अल्कोहोल इत्यादींचे सेवन करत असाल तर ते थांबवा.

जिम करणे आवश्यक नाही; पण महत्त्वाचे आहे : लोक फिटनेस म्हणजे वजन कमी करणे, बारीक होणे, अशा समजुतीमध्ये असतात; परंतु ते खरे नाही. वेट ट्रेनिंगमुळे (वेट लिफ्टिंग नाही) शरीरातील अवयव चांगल्या पद्धतीने कार्य करतात, त्यांचे टोनिंग होते, त्यांची कार्यक्षमता वाढते आणि दीर्घकाळ ते कार्यरत राहू शकतात.

तुमच्या आठवड्याच्या व्यायामाच्या दिनचर्येत स्ट्रेंथ ट्रेनिंग समाविष्ट नसेल, तर आयुष्याच्या उत्तरार्धात समस्या निर्माण होतील, कारण दरवर्षी शरीराचे वय वाढते, तेव्हा स्नायूची क्षमता कमी होते आणि व्यक्ती नाजूक बनते. असे ट्रेनिंग रोज करण्याची गरज नाही; पण आठवड्यातून दोन-तीन वेळा तरी हे करावे. वेट ट्रेनिंग शरीराला तरुण ठेवते, चयापचय वाढवते, ज्यामुळे फॅट बर्न होतात आणि शरीर सुडौल आणि कणखर होते.

शांत झोप : झोपेची वेळ आणि उठायची वेळ योग्य आणि नियमित ठेवा. झोप ही आपल्यासाठी एक देणगी आहे- कारण झोपेमध्ये आपले शरीर वाढते, शरीराचे तापमान कमी होते, हृदयाचे ठोके कमी होतात आणि प्रत्येक भाग विश्रांती घेतो. जणू काही नवीन दिवसाची तयारी करतो. दिवसातून किमान सहा तास झोपा. तुमच्या झोपेच्या सायकलवर लक्ष ठेवा. जास्त झोपणे देखील चांगले नाही.

दिनचर्येत बदल करून ताण कमी करा : आपली दिनचर्या यंत्रवत बनवू नका. मनाला आनंद आणि समाधान देणाऱ्या गोष्टी करत राहा. नवीन गोष्टींची आपल्या दिनचर्येत भर घाला, बदल करा. यामुळे मनावरील ताण हलका होईल. शरीराची आणि मनाची बॅटरी रिचार्ज करण्यासाठी आठवड्यातून किमान एकदातरी स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे.

शरीराच्या गरजा ओळखा आणि जागरूक राहा : एकाच्या शरीरासाठी जे योग्य आहे ते दुसऱ्यासाठी असेलच असे नाही. कोणासारखे करायला जाऊ नका. त्याऐवजी आपण स्वतःसाठी एक दिनचर्या बनवू शकतो. आपण काय खातो, पितो आणि किती प्रमाणात या बाबत जागरूक रहा. कोणत्या पदार्थांचा आपल्या शरीरावर नकारात्मक परिणाम होतो त्याचे निरीक्षण करा.

आरोग्य आणि फिटनेस साध्य करणे आणि त्याचे व्यवस्थापन करणे खूप सोपे आहे; परंतु आपल्या मनात दोन्ही संकल्पनांबाबत बरेच गैरसमज आहेत. आपण विदेशी आहार आणि जीवनशैली पाळतो; आपण आपली मुळे, आपल्या खाण्याच्या पद्धती, खाण्याच्या सवयी, जीवनशैलीच्या सवयी विसरलो आहोत. आपण नैसर्गिक काय आहे हे विसरलो आहोत.

आपण जे काही नैसर्गिक आहे असे म्हणतो ते सर्वात अनैसर्गिक असते आणि आपल्यासमोर देखील सर्वांत अनैसर्गिक स्वरूपात सादर केले जाते. हा एक मार्केटिंगचा खेळ आहे. शुद्ध आणि नैसर्गिक अन्नाला जाहिरातीची आवश्यकता नसते. कोणतेही अन्न पदार्थ विकत घेताना त्यातील घटक वाचा. आपण आपल्या शरीराला गृहीत धरले आहे आणि आपल्या शरीराचा इतका गैरवापर केला आहे की ते आजारपणाच्या रूपात प्रतिक्रिया देते.

काळजी करू नका, काळजी घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com