
नांदेड : सध्या सणासुदीचे दिवस असून गणेशोत्सवास बुधवारपासून सुरूवात होत आहे. त्यामुळे भाविकांनी मिठाई, खाद्य पदार्थ खरेदी करताना काळजी घ्यावी. तसेच गणेशोत्सवानिमित्त विविध मंडळातर्फे भंडारा, प्रसाद, अन्नदान इत्यादी कार्यक्रम ठेवण्यात येतात. त्या अनुषंगाने सार्वजनिक धार्मिक उत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि प्रसाद उत्पादन व वितरण करणारे अन्न व्यवसायिक यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदाच्या तरतुदींचे पालन करणे बंधनकारक राहील, असे आवाहन नांदेडच्या अन्न व औषध प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्याचबरोबर घरोघरी गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यामुळे प्रसाद म्हणून खरेदी करत असताना मिठाई, खाद्यपदार्थांची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
मिठाई घेताना काय काळजी घ्याल
ग्राहकांनी स्वीट मार्टमधून मिठाई घेताना त्या मिठाईच्या बाजूला बेस्ट बिफोरचा बोर्ड आहे किंवा नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. हा बोर्ड पाहिल्याशिवाय वेगवेगळे गोड पदार्थ खरेदी करू नयेत मिठाई कधी बनवली आहे, याचा अंदाज येत नसेल तर खरेदी न करणे योग्य होईल.
एफडीएने केलेल्या काही सूचना
अ) व्यावसायिकांसाठी सूचना
मिठाईच्या ट्रे वर दर्शनी भागात पदार्थ किती तारखेपर्यंत वापरायचा आहे, याची माहिती देणे बंधनकारक आहे.
कच्चे अन्न पदार्थ, दूध, खवा, खाद्य तेल, वनस्पती तेल इत्यादी हे परवानाधारक अथवा नोंदणीधारक व्यावसायिकांकडून खरेदी करण्यात यावेत.
अन्नपदार्थ तयार करण्यासाठी स्वच्छ शुद्ध पाणी वापरावे तसेच अन्न पदार्थ स्वच्छ व सुरक्षित ठिकाणी साठवावे.
त्वचा, संसर्गजन्य आजाराच्या संदर्भात कामगारांची तपासणी करावी.
दुग्धजन्य पदार्थाची मिठाई ही आठ ते दहा तासांच्या आत खाण्याबाबत पॅकेटवर निर्देश देण्यात यावेत.
ब) ग्राहकांसाठी सूचना
मिठाई, दूध व दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना नोंदणीधारक अथवा परवानाधारक अस्थापनांकडून खरेदी करावी.
वापर योग्य तारखेची नोंद पाहूनच खरेदी करावी.
मिठाईवर बुरशी आढळल्यास त्याचे सेवन करू नये.
अनेक दुकानदार मिठाईची विक्री झाली नाही तर ती तशीच काचेच्या रॅकमध्ये ठेवतात. शिळी मिठाई खाण्यात गेल्यास विषबाधेचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे सजग राहून नागरिकांनी मिठाई खरेदी केली पाहिजे. गणेशोत्सव तसेच आगामी काळात येणाऱ्या विविध उत्सव काळात प्रशासनामार्फत जिल्ह्यातील अन्न अस्थापनेच्या तपासणी करण्यात येणार असून नमुने घेण्यात येणार आहेत. व्यवसायिकांनी अन्न परवाना अथवा नोंदणी घेऊनच व्यवसाय करावा.
- रा. दि. कोकडवार, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, नांदेड.