Swasthyam 2023 : पर्यावरण पूरक आयुष्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Global warming Environmental Supplemental Life recycling pensil education

ग्लोबल वॉर्मिंग... पर्यावरणाचा ऱ्हास होतोय... हे आपण रोज ऐकतोय. पर्यावरणपूरक आयुष्य जगायचं म्हणजे नेमकं काय करायचं? रिसायकलिंग करायचं.

Swasthyam 2023 : पर्यावरण पूरक आयुष्य

ग्लोबल वॉर्मिंग... पर्यावरणाचा ऱ्हास होतोय... हे आपण रोज ऐकतोय. पर्यावरणपूरक आयुष्य जगायचं म्हणजे नेमकं काय करायचं? रिसायकलिंग करायचं. ते सगळ्याच क्षेत्रात गरजेचं झालं आहे. अनेक टाकाऊ वस्तूंचं रूपांतर करून त्यांचा पुनर्वापर करण सहज शक्य आहे.

यातून लहान वयातच मुलांना पर्यावरण रक्षणाचे महत्त्व समजले. ‘नो स्क्रीन टाइम’मध्ये एक सोपा उपक्रम मुलांना सहज देता येईल. बहुतेक घरांमध्ये एकुलतं एक मूल आहे आणि त्यासाठी मग भरपूर प्रमाणात पेन, पेन्सिल, पेपर उपलब्ध करून दिले जातात.

साधी रोजच्या वापरातील पेन्सिल लाकडापासून तयार होते. यासाठी किती मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असेल. पेन्सिलींप्रमाणेच मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे बॉलपेन. ‘यूज ॲण्ड थ्रो’च्या जमान्यात प्लॅस्टिक पेन एकदा वापरले की फेकून दिले जातात.

त्यातून निर्माण होणारा मोठ्या प्रमाणावरचा प्लॅस्टिक कचरा ज्याचं विघटन होत नाही आणि पर्यावरणाला अत्यंत हानिकारक आहे. अशावेळी स्वतःच्या गरजेपुरते पेन पेन्सिल स्वतःच बनवले तर? यासाठी काही वेगळं प्रशिक्षण घेण्याची गरज नाही, की मोठ्या टेक्नॉलॉजीची.

घरातील जुने वर्तमानपत्र किंवा वापरून झालेली पाने आणि बाजारात सहज उपलब्ध असणारे लिड यांच्या साहाय्याने घरीच पेन्सिल, पेन बनवणे सहज शक्य आहे. कागदी पट्ट्या कापून मधोमध शिसे ठेवून कागदाची घट्ट गुंडाळी करायची. याचप्रमाणे रिफिल वापरून कागदी पेनही तयार करता येतील.

सुंदर रंगांमध्ये रंगवून त्यांना आकर्षक बनवता येईल. अशा कागदी पेन पेन्सिलच्या टोकाशी बिया भरून वापर करून झाल्यावर या पेन्सिली कुंडीत, बागेमध्ये फक्त मातीत पुरल्या, तरी त्यातील बिया रुजतील.

प्रत्येकाने स्वतःपुरतं पेन्सिल बनवण्याचं ठरविल्यास..

  • वृक्षतोड आपोआपच थांबेल.

  • प्लॅस्टिक कचरा कमी होईल.

  • जुन्या वर्तमानपत्रांचा पुनर्वापर होईल.

  • स्वतः काहीतरी बनवण्याचा आनंद मुलांना मिळेल.

  • आपण बनवलेली वस्तू जपून वापरण्याची सवय आपोआपच लागेल.

  • कागदी सुंदर पेन, पेन्सिल बनवून, छान छान रंगवून मित्र-मैत्रिणींना भेट देता येईल.

  • वाड्या-वस्तींवर राहणारे विद्यार्थी पेन्सिलीचा तुकडा अगदी शेवटपर्यंत वापरतात. त्यांना कागदी पेन, पेन्सिल भेट दिल्यास मुलांमध्ये सामाजिक भान आपोआपच रुजेल.

  • हे सगळे आनंदाने करताना मुले स्क्रीनपासून सहज दूर होतील.

टॅग्स :Health Departmenthealth