
आईची प्रेरणा
कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचे फार मोठे कार्य ‘मुरलीधर देविदास आमटे’ म्हणजेच ‘बाबा आमटे’ यांनी केले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातही त्यांचा सहभाग होता. महात्मा गांधीजींच्या विचाराचा त्यांच्यावर प्रभाव पडला.
एक दिवस मुसळधार पावसामध्ये एक कुष्ठरोगी रस्त्याच्या कडेला भिजत असलेला त्यांना दिसला आणि त्याला कुष्ठरोगी असल्यामुळे कोणीही मदत करत नव्हते. बाबांनी त्याला आपल्या घरी आणले आणि त्याची सेवा करायला सुरुवात केली.
वरोडा येथील जंगलात पत्नी साधनाताई, दोन मुले आणि एक गाय, तसेच सात कुष्ठरोग्यांना घेऊन बाबा आमटे यांनी ‘आनंदवना’ची स्थापना केली. वंचिताच्या जीवनात आनंद निर्माण केला. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी ‘भारत जोडो’ अभियान सुरू केले.
‘नर्मदा बचाव’ आंदोलनामध्ये आदिवासी कष्टकरी त्यांच्या बाजूने बाबांनी लढा दिला. कुष्ठरोगी, अंध, अपंग यांना माणूस म्हणून स्वाभिमानाने जगता यावे असा प्रयत्न केला. माणसांनी बहिष्कृत केलेल्या कुष्ठरोग्यांसाठी संत बनून ते पुढे आले.
बाबांमुळे भीक मागणारे हात श्रमाचे मळे फुलवू लागले. या त्यांच्या कार्यात साधनाताईंनी मोठे योगदान दिले. कुष्ठरोग्यांची सेवा करण्यातच आनंद मानला. बाबांच्या प्रत्येक कार्याला खंबीरपणे साथ दिली.
बाबा आमटे यांची आई शिक्षिका होती. ते लहान असताना कठीण विषय सोपा करून ती बाबांना समजावून सांगे. आईने त्यांना खेळण्यासाठी एक जपानी बाहुली दिली होती. बाहुली पडली की, लगेच ताबडतोब उठून उभा राहत असे.
मुरलीधर बाहुलीशी खेळत, ते थकून गेले तरी बाहुली तशीच उभा. यावेळी नेमकी आई आली, मुरलीधरच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली, ‘‘बाळ, जीवन हे असेच असते. आपल्याला एकसारखी आपटी खावी लागते.
मी कधीच पडणार नाही, पराभूत होणार नाही, अशी फुशारकी मारून चालणार नाही. पराभूत न होण्यात, खाली न पडण्यात मोठेपण आहे, असे नाही. तर पराभूत होऊन पुन्हा ताट उभे राहण्यातच खरा मोठेपणा आहे. पराभवाच्या तडाख्याने खचून न जाणे हेच जीवन.’’ आईचे शब्द पुढे अनंत अडचणीस सामोरे जाताना त्यांना प्रेरणा द्यायचे.