Weight Gain Reasons: लठ्ठपणाची ५ प्रमुख कारणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Obesity and weight gain reasons

Weight Gain Reasons: लठ्ठपणाची ५ प्रमुख कारणे

आपल्या सर्वांनाच प्रमाणबद्ध व निरोगी शरीर हवे असते व त्यादृष्टीने आपण प्रयत्न करीत असतो. परंतु, तरीही कित्येकदा वजन आटोक्यात राहत नाही. वजनावर नियंत्रण ठेवायचे असेल, तर आधी वजन वाढीची कारणे समजून घ्यावी लागतील.

तरच आपण वजन नियंत्रण करण्यात यशस्वी होऊ. एखादी व्यक्ती लठ्ठ आहे असं दिसलं की सामान्यतः एक प्रतिक्रिया दिली जाते की हा सगळा अतिखाण्याचा व आळशीपणाचा परिणाम आहे! पण केवळ अतिखाणे हे एकच कारण वजन वाढीसाठी कारणीभूत नसते, तर वजन वाढण्यामागे अनेक कारणे असतात. ती कोणती? आता आपण पाहू...

चुकीची जीवनशैली : आधुनिक जीवनशैलीमध्ये शारीरिक श्रमांचा अभाव आणि चुकीची आहार पद्धती यामुळे वजन वाढत राहते. अतिप्रमाणात साखर आणि चरबीयुक्त पदार्थ खाणे, रोजच्या खाण्यांमध्ये जंक फूडचा जास्त वापर, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, अशा कारणांमुळे शरीरातील चरबीचे प्रमाण वाढत जाते.

मेडिकल कंडिशन्स : काही प्रकारच्या आजारांमध्ये शरीरात चरबीचे प्रमाण वाढते. चयापचयाचा वेग कमी होऊन वजन वाढत राहते. हायपोथायरॉईड या ग्रंथीच्या आजारात व्यक्तीचे वजन वाढत जाते.

संधिवात, सांधेदुखी यासारख्या आजारांमध्ये शारीरिक हालचाल कमी होऊन वजन वाढते. अपघातामुळे, तसेच शस्त्रक्रियेमुळे शारीरिक हालचालींवर बंधने येतात आणि वजन वाढते.

आनुवंशिकता : काही कुटुंबांमध्ये लठ्ठपणा हा आनुवंशिक असतो.

झोपेचा अभाव : झोप कमी घेतल्यामुळे शरीरातील चयापचय आणि हार्मोन्स यावर विपरीत परिणाम होऊन खाण्याची इच्छा वाढते व त्याचा परिणाम वजन वाढीवर होतो.

औषधे : स्टिरॉईड्स, अँटी सायकोटिक, अँटी डिप्रेशन औषधे यांच्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.

स्त्रियांमध्ये होणारे हार्मोन्समधील बदल : गरोदरपणा, पी.सी.ओ.डी., पी.सी.ओ.एस., रजोनिवृत्ती, यामुळे स्त्रियांच्या शरीरात हार्मोन्सचे प्रमाण बदलत राहते, परिणामी वजन वाढते.