Health : स्वत:ला बदलणं, हेच वर्किंग वूमनचं स्ट्रेस मॅनेजमेंट! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Stress management

Health : स्वत:ला बदलणं, हेच वर्किंग वूमनचं स्ट्रेस मॅनेजमेंट!

सोलापूर : घरकाम करणाऱ्या महिलांच्या तुलनेत घर सांभाळून नोकरी करणाऱ्या महिलांना अधिक प्रमाणात ताणतणावाला सामोरे जावे लागते. प्रत्येकीच्या समस्या वेगवेगळ्या, ताण-तणावाचे प्रकारही वेगळे असू शकतात. अगदी घरी लघुउद्योग करण्यापासून ते मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या प्रत्येक वर्किंग वूमनला स्ट्रेस मॅनेजमेंट करावंच लागतं.

कामाच्या ठिकाणची परिस्थिती, वातावरण अथवा कोणाशी सल्लामसलत किंवा कोणाची तक्रार करून ताण कमी होत नाही, तर स्वत:ला बदलणं हेच वर्किंग वूमनचं स्ट्रेस मॅनेजमेंट असल्याचं महिला वर्गातून सांगण्यात आले.

ताण निर्माण होण्याची कारणे प्रत्येकासाठी वेगवेगळी असू शकतात. एखाद्याला ताण देणारे कारण हे दुसऱ्या एखाद्यासाठी अजिबात त्रासदायक असू शकत नाही. बाह्य आणि अंतर्गत असे ताणाचे दोन प्रकार असतात. बाह्य ताणाचा परिणाम शरीरावर आणि अंतर्गत ताणाचा परिणाम मनावर अशा दोन प्रकारांमध्ये त्याचा प्रभाव दिसून येतो.

बदलत्या जीवनशैलीत वाढत्या अपेक्षांमुळे या दोन्ही प्रकारचे ताण आरोग्यावर मोठे आघात करीत आहेत. त्रासदायक नाती, कौटुंबिक बेबनाव, भांडणे, कामाचा बोजा, वेळेची कमतरता, कामाच्या ठिकाणचे राजकारण तसेच घरकाम व नोकरी यांतील कसरत ही बाह्य कारणे आहेत. तर अंतर्गत कारणे ही बहुधा निराशा, रागावर नियंत्रण नसणे, प्रेम व स्वाभिमानाचा अभाव, अपयशाची भीती, एकलकोंडेपणा आणि पर्यायाने नकारात्मक भावना ही असतात.

केवळ ऑफिसमध्ये जाऊन काम, नोकरी करणाऱ्यांनाच तणाव असतो असे नाही, तर गृहिणींना देखील आजच्या वेगवान जगात घरकाम, कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या जबाबदाऱ्या, मुलांच्या शाळा, कॉलेज, ऑफिस यांची तयारी, त्यांची काळजी घेणे, पालकत्व या गोष्टी सुद्धा प्रचंड तणावाला जन्म देत असतात आणि त्यांच्यावर उपाय करणे हे तितकेच गरजेचे आहे. आणि ही आता घर-घर की कहानी आहे. प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या असतील परंतु आरोग्यावर परिणाम मात्र सारखाच असतो. आनंद हा तणावमुक्त आयुष्याची गुरुकिल्ली आहे. परिस्थिती प्रतिकूल असो वा अनुकूल, आहे त्या परिस्थितीत आनंदी राहण्यासाठी केलेले प्रयत्न हेच तणावमुक्त जीवनाची गुरुकिल्ली असणार आहे. तणावमुक्त जीवनासाठी स्वत:ला बदलणे हा एकमेव पर्याय आहे.

तणावाचे शरीरावर होणारे परिणाम

शारीरिक आणि मानसिक अशा दोन प्रकारात तणाव पाहायला मिळतात. शारीरिक लक्षणांत सारखा थकवा, सतत पोट बिघडणे, न बरी होणारी अंगदुखी, छातीची धडधड, झोप न लागणे, डोकेदुखी, लठ्ठपणा इत्यादींचा समावेश होतो. तर मानसिक लक्षणात चिडचिडेपणा, चिंता, पटकन राग येणे, गांगरणे, निराशा आदी समस्या उद्‌भवू शकतात.

तणावमुक्त जीवनासाठी ‘हे’ करा

आहार आणि व्यायाम यामध्ये सातत्य हवे जगाला बदलण्यापेक्षा बदलाची सुरवात स्वत:पासून करावी समस्या ही हर घर की कहानी आहे, त्यामुळे इतरांकडे बघून दुःखी होण्यापेक्षा आपल्याकडे उपलब्ध असलेल्या गोष्टींमध्ये समाधान मानण्याची वृत्ती मनात बाळगली पाहिजे. आपण ज्या क्षेत्रात काम करतो, त्या क्षेत्राशी निगडित जनसंवाद, ज्ञान वाढविण्यावर भर द्यावा आपल्या तत्त्वाविरुद्ध, मनाविरुद्ध काही गोष्टी घडत असतील तर त्या विषयावर आपल्या जवळच्या, विश्वासू व्यक्तींशी मनमोकळेपणाने बोलले पाहिजे.

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. श्रीकांत पाटणकर सांगतात, की एकविसाव्या शतकातही पुरुषप्रधान संस्कृतीचा प्रभाव आहे. नोकरदार महिलांना घरकाम आणि नोकरी या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. शिकलेल्या प्रत्येक महिलेचा अथवा कुटुंबीयांचा नोकरी केलीच पाहिजे, असा अट्टहास असू नये. आपल्या कौटुंबिक गरजा आणि जबाबदारी यांची योग्य सांगड घालून नोकरी, व्यवसाय अथवा इतर गोष्टी करायच्या असतील तर महिलांनी देखील स्वत:मध्ये बदल करून वाटचाल करावी. त्यामुळे तक्रारींचा ओघ कमी होतो.