Health : कोरोनाचा हृदयावरील परिणाम शोधण्यात यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

Health : कोरोनाचा हृदयावरील परिणाम शोधण्यात यश

मेलबोर्न : कोरोनानंतर हृदयविकारामध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. कोरोना विषाणू हद्याच्या ऊतींचे नक्की कसे नुकसान करतो, हे शोधण्यात संशोधकांना यश आले. त्यामुळे, कोरोनाशी संबंधित हृदयविकारावरील अधिक चांगल्या उपचाराला दिशा मिळू शकते. याबाबत ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलॅंड विद्यापीठातील संशोधकांनी संशोधन केले. या संशोधनाचे निष्कर्ष इम्युनॉलॉजी या नियतकालिकात प्रसिद्ध झाले.

कोरोनाच्या हृदयावरील परिणामांबाबत यापूर्वीही संशोधन झाले असले तरी त्यांचा डेटा शारीरिक मापनापुरता मर्यादित होता. ब्राझीलमधील कोरोनाच्या सात रुग्णांच्या तसेच इन्फ्लूएंझाच्या दोन रुग्णांच्या हृदयाच्या ऊतीचे नमुने संशोधकांनी तपासले. यावेळी इतर विषाणूंच्या तुलनेत कोरोना शरीरावर कसा परिणाम करतो, याचा संशोधकांनी अभ्यास केला.

संशोधक अरुता कुलसिंगे म्हणाले, की २००९ मध्ये पसरलेल्या फ्लूच्या साथीच्या तुलनेत कोरोनाच्या साथीत हृदयावर दीर्घकालीन व अधिक गंभीर परिणाम झाले. मात्र, हृदयावर कशामुळे परिणाम होत आहे, हे अद्याप सूक्ष्म स्तरावर माहीत नव्हते. संशोधनादरम्यान कोरोना रुग्णांच्या हृदयाच्या ऊतींमधील विषाणुचे अवशेष सापडले नाहीत. मात्र, हदयांच्या ऊतीमधील बदलाचा संबंध ‘डीएनए’चे नुकसान व दुरुस्तीशी असल्याचे आढळले. ‘डीएनए’मधील ही नुकसान व दुरुस्तीची प्रक्रिया मधुमेह, धमनीकाठिण्य व इतर आजारांशी संबंधित आहे. त्यामुळे, रुग्णांच्या डीएनएबाबत काय घडत आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.

कोरोना, इन्फ्लूएंझाचा परिणाम वेगळा

कोरोना संसर्ग झालेल्या एका छोट्या गटातील रुग्णांच्या हृदयाच्या ऊतीचे कोरोनाने नुकसान झाल्याचे आढळले. मात्र, नेहमीच्या फ्लू झालेल्या रुग्णांच्या हृदयाचे असे कोणतेही नुकसान झाले नव्हते. कोरोना आणि इन्फ्लूएंझा हे दोन्ही श्वसनाच्या गंभीर आजाराचे विषाणू असले तरीही त्यांचा हृदयाच्या ऊतीवर होणारा परिणाम वेगळा असल्याचेही संशोधकांनी नमूद केले.

इन्फ्लूएंझा रुग्णांच्या हृदयाच्या ऊतीचे नमुने आम्ही तपासले तेव्हा ते जळजळ होण्यास कारणीभूत असल्याचे आढळले. मात्र, कोरोना विषाणुने हृदयाच्या डीएनएवर हल्ला केल्याचे आढळले. त्याचप्रमाणे, इन्फ्लूएंझाप्रमाणे ती केवळ हृदयातील अतिरिक्त जळजळ नसल्याचेही लक्षात आले. कोरोना हा फ्लूच्या इतर विषाणुंसारखा नसल्याचेही स्पष्टपणे दाखविले. या संशोधनामुळे कोरोनाचा हृदयावर नेमका कसा परिणाम होतो, हे समजण्यास मदत झाली. त्यामुळे, उपचाराची दिशाही स्पष्ट होऊ शकते.

- प्रा.जॉन फ्रेझर, संशोधक