
आपल्या हृदयामध्ये चार कप्पे असतात. त्यात दोन उजव्या बाजूला आणि दोन डाव्या बाजूला असतात. हृदयाची डावी बाजू ही शुद्ध रक्ताच्या पंपिंगचे काम बघते. उजवी बाजू ही अशुद्ध रक्तामध्ये काम करते. दोन्ही बाजूला वरचा (ॲट्रियम) आणि खालच्या बाजूचे (व्हेंट्रीकल) असे दोन छोटे कप्पे असतात. या सर्व कप्प्यांमधून रक्ताचा प्रवास सुरळीतपणे व्हावा आणि एकदा पंप केलेले रक्त परत माघारी येऊ नये यासाठी चार झडपा असतात. या झडपांचे काम आहे, की एकदा पुढे गेलेले रख्य हे परत मागे येऊ ना देणे.
मायट्रल, ट्रायकस्पिड, पल्मोनरी आणि ॲऑर्टिक नावाच्या या चार झडपा आहेत. या झडपांना त्यांच्या प्रकाराप्रमाणे काही पाती असतात- जी हृदय आकुंचन पावल्यावर उघडतात आणि रक्ताला पुढील वाट करून देतात. दोन ठोक्यांच्यामध्ये ही पाती बंद होतात. ही पाती उघडणे आणि बंद होण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण झाला, तर हृदयावर आणि पर्यायाने फुप्फुसावर जास्त ताण वाढू शकतो.
हृदयाच्या झडपेच्या आजारांचे प्रकार
साधारणपणे दोन प्रकारचे आजार झडपांना होऊ शकतात.
झडप गळकी होणे (रेगुरजिटेशन) : यामध्ये झडपांची पाती पूर्णपणे बंद होत नाहीत आणि पुढे गेलेले रक्त त्याच कप्प्यात परत येते. यामुळे हृदयावर जास्त रक्त पंप करायला लागून ताण वाढतो.
झडप छोटी अथवा आकुंचित होणे (स्टेनोसिस) : यामध्ये झडप जाड होते आणि पाती एकमेकांना चिकटतात. पर्यायाने रक्त बाहेर जाण्यासाठी अडथळा निर्माण होतो आणि हृदयाच्या कप्प्यामधील दाब वाढतो. ॲऑर्टिक झडप आणि मायट्रल झडप हे सर्वांत जास्त प्रमाणामध्ये छोटे होतात. यामुळे शरीराला होणारा रक्तपुरवठा कमी होतो. दुर्मीळरित्या कधी कधी नवजात अर्भकांमध्ये झडप तयारच होत नाही. याला ‘अटरेसिया’ म्हणतात.
झडपांच्या आजाराची कारणे
आपल्या देशामध्ये ‘ऱ्हुमॅटिक फिव्हर’ नावाच्या आजाराने झडपेचे ९० टक्के आजार होतात. लहानपणी घास दुखून ताप येतो आणि सांधे सुजतात व संधिवात होतो. यालाच ‘ऱ्हुमॅटिक फिव्हर’ असे म्हणतात. हा ताप वेळीच बरा केला नाही, तर या जंतूंमुळे हृदयाची झडप जाड होऊन ती छोटी होते किंवा गळकी होते. झडपेचा आजार आणि ‘ऱ्हुमॅटिक फिव्हर’ यामध्ये कित्येक वर्षांचे अंतर असू शकते. आजकाल अँटिबायोटिक्सच्या वापरामुळे या आजाराचे प्रमाण हे कमी होत चालले आहे. या आवाजामुळे मुख्यत्वेकरून मायट्रल झडप हे खराब होते आणि आकुंचित पावते. त्यालाच आपण ‘मायट्रल स्टेनोसिस’ म्हणतो. ॲऑर्टिक झडप ही वृद्धांमध्ये झीज होऊन आणि त्यावर कॅल्शिअमचा प्रादुर्भाव होऊन बारीक होते- ज्याला आम्ही ‘ॲऑर्टिक स्टेनोसिस’ असे म्हणतो. हा आजार साधारणपणे साठी आणि सत्तरीमध्ये होऊ शकतो. कधी कधी हार्ट ॲटॅकनंतरदेखील झडप खराब होऊन गळकी होऊ शकते. काही वेळा जन्मतःच झडपांमध्ये दोष असू शकतो.
झडपांच्या आजाराची लक्षणे
ही लक्षणे लहानपणापासूनसुद्धा दिसू शकतात. यामध्ये सर्वांत प्रमुख लक्षण आहे ते म्हणजे चालल्यावर दम लागणे. कधीकधी आडवे झोपल्यावर दम लागतो आणि रात्री झोपेतून दम लागून जाग येते. आपल्याला कमी प्रमाणात चालल्यावर अथवा झोपल्यावर दम लागत असेल, तर त्वरेने डॉक्टरांना संपर्क करावा. कधी कधी छातीत दुखणे, पायावर सूज येणे, डोळ्यापुढे अंधारी येऊन चक्कर येणे इत्यादी लक्षणेही दिसू शकतात. काही वेळेला हृदयाचे ठोके अनियमित होऊन आणि त्यांची गती वाढल्यामुळे (ॲट्रिअल फिब्रिलेशन) स्ट्रोक/ पॅरालिसिस होण्याची शक्यता असते. आपण वेळीच आपल्या डॉक्टरांशी संपर्क करून उपचार केले नाहीत, तर गुंतागुंत वाढून जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. झडपेच्या आजारांचे निदान व त्यावर काय उपचार करायचे असतात, हे आपण पुढील भागात पाहू.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.