measles disease : गोवंडी परिसरात गोवरचा संसर्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

health news measles disease 13 suspected patients Three children died mumbai

measles disease : गोवंडी परिसरात गोवरचा संसर्ग

मुंबई : गोवंडीतील रफीनगर झोपडपट्टीत गोवर आजाराचा उद्रेक झाला आहे. या परिसरात काही दिवसांपूर्वी ४८ तासांच्या कालावधीत तीन मुलांना मृत्यू झाला होता. प्राथमिक तपासणीत तिन्ही मुले गोवरचे संशयित असल्याचेही निष्पन्न झाले. आतापर्यंत परिसरात सहा रुग्णांची नोंद झाली असून १३ रुग्ण संशयित आहेत.

एम-पूर्व विभागात असलेल्या गोवंडीच्या रफीनगर झोपडपट्टीतील हसनैन खान (५), नुरीन खान (३) आणि फजल खान (१४ महिने) या तीन मुलांचा २६ आणि २७ ऑक्टोबरला मृत्यू झाला होता. ४८ तासांच्या अवधीत तीन बालकांचा मृत्यू झाल्याने महापालिकेने मुलांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला.

कुटुंबीयांशी बोलून मुलांचा वैद्यकीय इतिहास जाणून घेतला. यात हसनैन आणि नुरीन हे दोघे सख्खे भावंड आहेत. एकूण १० भावंडे असलेली ही मुले एकाच कुटुंबात वाढली; पण आठवे आणि नववे मूल कमी वजन आणि इतर आजारांनी त्रस्त होती. दोघांनाही ताप आला होता आणि शरीरावर पुरळ उठला होता. वैद्यकीय तपासणीत ते गोवरचे संशयित रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले.

केवळ एम-पूर्व वॉर्डातच नव्हे, तर इतर काही वॉर्डातही गोवरचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. आम्ही लक्ष ठेऊन आहोत. धारावीशिवाय मुंबईत जवळपास १२ ते १५ भागात गोवरचा प्रादुर्भाव आहे.

- डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, महापालिका

महापालिकेकडून रफीनगर, भाभानगर आणि इतर ठिकाणी लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे. यासाठी डॉक्टरांची नियुक्ती केली गेली आहे. शिवाय आशा आणि आरोग्यसेविका घरोघरी जाऊन मुलांचे लसीकरण करत आहेत.

- डॉ. उपालीमित्रा वाघमारे,वैद्यकीय अधिकारी, एम-पूर्व.