ढाली शरीराच्या

सृष्टीवर जीव वाढावेत व जीवन नांदावे असा उद्देश ठेवूनच मुळात सृष्टीची उत्पत्ती केली गेली आहे. छोट्यात छोटा जीव, अगदी कीटकसुद्धा, स्वतःचे संरक्षण कसे करायचे याचे ज्ञान घेऊनच जन्माला आलेला असतो.
ढाली शरीराच्या
ढाली शरीराच्याsakal

सृष्टीवर जीव वाढावेत व जीवन नांदावे असा उद्देश ठेवूनच मुळात सृष्टीची उत्पत्ती केली गेली आहे. छोट्यात छोटा जीव, अगदी कीटकसुद्धा, स्वतःचे संरक्षण कसे करायचे याचे ज्ञान घेऊनच जन्माला आलेला असतो. स्वसंरक्षणार्थ काही प्राण्यांच्या त्वचेचा रंग आजूबाजूच्या वातावरणाशी मिळताजुळता झालेला दिसतो, स्थानविशेषानुसार काहींचे डोळ्यांचे वा जबड्यांचे आकार वेगवेगळे झालेले दिसतात. अशा तऱ्हेने स्वसंरक्षणार्थ एक प्रतिकारयंत्रणा जीव स्वतःच तयार करत असतो. खूप खटपटीने एका विशिष्ट प्रकारचे शरीर तयार होऊन त्यात जीव राहू आणि जगू पाहात असतो, मृत्यूपासून संरक्षण होण्याच्या हेतूने अनेक योजना आखत असतो. अर्थात या योजना जिवाच्या पलीकडे असलेला आत्मा, म्हणजे परमेश्र्वरी अंशाच्या अंकित आणि जन्मजात संकल्पनेच्या स्वरूपात आलेल्या असतात.

सर्व प्रकारच्या संकटापासून संरक्षण होईल अशी यंत्रणा निसर्ग आतून उभारत असतो. मनुष्य मात्र असे काही वागत राहतो की तो मृत्यूला कवटाळण्यासाठी अधीर झालेला आहे की काय असे वाटावे. रोगामुळे व्यवहारातील आनंद घेण्यासाठी, जीवन नीटपणे जगता यावे व मृत्यू अकाली येऊ नये यासाठी शरीर आतून कार्यरत असते व ते रोगप्रतिकारशक्तीची यंत्रणा राबवत असते. लहान मूल रांगणार असल्यामुळे, सरपरटणार असल्यामुळे त्याची त्वचा सौम्य पण लवचिक ठेवलेली असते. साधे गिळत असताना जर अन्नाचा एखादा कण अन्ननलिकेऐवजी श्र्वासनलिकेत गेला तर लगेच ठसका लागण्याची व्यवस्था आतूनच केली जाते जेणेकरून चुकीच्या मार्गात जाणारा अन्नकण बाहेर फेकला जावा. चुकून विषारी अन्न खाण्यात आले असता उलट्या-जुलाब सुरू होऊन विषारी अन्न जास्तीत जास्ती प्रमाणात शरीरातून बाहेर फेकण्याचा प्रयत्न आपोआपच केला जातो.

शरीराबाहेरची कुठलीही वस्तू शरीरात राहू शकत नाही. त्यामुळे रोगजंतूंचा शरीरात प्रवेश झाला असता त्यांच्यावर हल्ला केला जाऊन नाश केला जातो, त्या जंतूंची वाढ होऊ नये याची योजना केलेली असते. शरीराची अंतर्गत व्यवस्था शक्तिमान असेल तरच या जंतूंविरुद्धच्या लढाईत शरीराच्या यंत्रणेचा विजय होऊन रोग होत नाही. परंतु शरीराच्या प्रत्येक अवस्थेत म्हणजे रस-रक्तापासून ते मज्जा-वीर्यापर्यंत किंवा वात-पित्त-कफादी त्रिदोषांचे संतुलन ठेवून मल-मूत्रादी नको असलेल्या सर्व द्रव्यांचा त्याग करून, शरीराचे संतुलन ठेवून व शरीर पूर्ण शक्तिमान असले तर रोगांची काय बिशाद? कारण अशा शरीरात रोगप्रतिकारयंत्रणा नीट बांधलेली व कार्यक्षम असते.

एखाद्या किल्ल्याकडे लक्ष न दिल्यामुळे व त्याची देखभाल न केल्यामुळे बुरूज ढासळतात व त्या बाजूने शत्रू आक्रमण करू शकतो तसेच शरीराच्या बाबतीतही आहे. एखाद्या विशिष्ट इंद्रियाचे चोचले पुरवत राहिले तर त्या इंद्रियांच्या ठिकाणी रोगप्रतिकारयंत्रणा नीट राहात नाही. आयुर्वेदातील स्वस्थवृत्ताचे प्रयोजनही शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीच आहे. प्रकृतीचे परीक्षण करून व ऋतू-काळाचे भान ठेवून जेवणखाण घेतले तर खरोखरच शरीरयंत्रणा नीट काम करते व रोगाला फिरकू देत नाही. प्रत्येकाने दररोज मेहनत करावी हे खरे असले तरी मेहनतीला मर्यादा असावी लागते कारण अति थकण्यामुळे शरीरयंत्रणेवर ज्यादा ताण पडून रोगप्रतिकार व्यवस्थित होऊ शकत नाही. तसेच घाणीची ठिकाणे, उकिरडे वगैरे मोठ्या प्रमाणावर जंतूंचा वावर असेल अशा ठिकाणी कमी प्रतिकारशक्ती असणाऱ्यांनी जाऊ नये.

शरीरात रोग वाढण्यासाठी, शरीरात रोग घर करण्यासाठी आवश्‍यक असते अशुद्धी - घाण. शरीरात मलसंचय (आमसंचय) झाला की रोग वाढू शकतो. म्हणून रोगप्रतिकारयंत्रणा राबवत असताना मलनिवृत्ती पूर्ण होण्यासाठी शरीराने योजना केलेली असते. तेव्हा प्रत्येकाने यादृष्टीने शरीराला मदत होण्यासाठी रोज मलमूत्रविसर्जन नीट होण्याकडे लक्ष ठेवणे आवश्‍यक असते. तसेच १०-१५ दिवसांनी सौम्य विरेचनद्रव्य घेऊन पोट साफ होण्याकडे तसेच लघवी साफ होते आहे याकडे लक्ष ठेवणे आवश्‍यक असते. वर्ष-दोन वर्षांनी अंतर्स्नेहन, बहिर्स्नेहन अशा व्यवस्थित उपचारांनंतर विरेचन, वमन करून घेऊन शरीरातील मलनिवृती करून घेणे आवश्‍यक असते, जेणेकरून रोग वाढण्यासाठी कारणीभूत असलेला आमसंचय वा मलसंचय शरीरात होणार नाही. वीर्यधातू शरीरातील रोगप्रतिकारयंत्रणेला शक्ती पुरवत असतो. वीर्यामुळे असते ओज व जेथे तेज असते तेथे अंधार नसतो, तेजाच्या ठिकाणचे घाणीचे साम्राज्य नष्ट होते म्हणून रोगप्रतिकारयंत्रणा व्यवस्थित काम करावी या दृष्टीने वीर्यांश असलेले अन्न सेवन करणे, स्वतःच्या प्रकृतीला व ऋतूला अनुरूप आहार तसेच रसायनादी वस्तूचे सेवन करून वीर्यवर्धन होईल याकडे लक्ष ठेवणे प्रत्येकाला आवश्‍यक असते.

प्रत्येक कार्यासाठी वीर्य खर्च होत असते. ज्या प्रमाणात वीर्य खर्च होते त्या प्रमाणात ते तयार होण्यासाठी तसेच अकारण वीर्यनाश होणार नाही याकडे लक्ष ठेवणेही रोगप्रतिकारशक्ती चांगली राहाण्यासाठी योजलेले उपाय ठरू शकतात. साथीचे रोग असल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढविणे व रोगाचा प्रार्दुभाव होऊ शकेल अशा ठिकाणी जाणे टाळणे आवश्‍यक असते. रोगप्रतिकारयंत्रणा शरीराद्वारे राबविण्याची निसर्गाने योजना केलेली असली तरी प्रत्येकाने स्वतःची रोगप्रतिकारशक्ती निसर्गाला वाढविण्यासाठी मदत करणे आवश्‍यक असते.

शरीराची एकूण रचना अति अद्भुत असून स्तंभित करणारी आहे. साधा एखादा धुळीचा कण डोळ्याच्या बुबुळावर आला तर लगेच पापण्या फडफडतात व धुळीचा कण बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला जातो. शरीर व त्यात असणारा आत्मा हे दोन्ही सतत जागृत असतात व ते रोगप्रतिकारयंत्रणा राबवून मृत्यूला जवळपास फिरकू न देता शरीर सुदृढ करून जीवनाचा आनंद कसा घेता येईल याबद्दल प्रयत्नशील असतात. आवश्‍यकता आहे ती फक्त माणसाने स्वतःकडून या यंत्रणेला अधिकाधिक साह्य करण्याची !!!

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com